मंडळी भारताचा राष्ट्रीय खेळ असणाऱ्या हॉकीचे जादूगार म्हणून ध्यानचंद यांना ओळखले जाते. ध्यानचंद यांचा करिश्मा इतका जबरदस्त होता की १९३६ सालच्या ऑलंपिक स्पर्धेमध्ये जर्मनीच्या संघाला ८-१ ने धूळ चारल्यानंतर दस्तुरखुद्द जर्मनीचा हुकूमशहा हिटलरने ध्यानचंदांना त्यांच्या सैन्यात वरिष्ठ पदाची ऑफर दिली होती, जी त्यांनी नाकारली. मेजर ध्यानचंदांनंतर मात्र भारतीय हॉकीची दुर्दशा झाली. लोक क्रिकेटच्या नादाला लागले. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण हॉकीला विसरले.
भारतीय हॉकीला लागलेला हा विजनवास संपवण्याचे काम कुणी केले असेल तर पुण्याच्या खडकी येथे १६ जुलै १९६८ रोजी येथे जन्मलेल्या धनराज पिल्ले याने.. खडकीच्या ऑर्डीनन्स फॅक्टरीच्या हॉकी मैदानावर कामाला असणाऱ्या वडिलांसोबत धनराज लहानपणी तिथे जायचा. तिथे खेळणाऱ्या मुलांकडे पाहून धनराजला हॉकीविषयी आवड निर्माण झाली. योगायोगाने त्याचा भाऊ रमेश याचे मुंबईच्या एका हॉकी संघात सिलेक्शन झाले आणि धनराज मुंबईला आला. तिथेच त्याला हॉकीचे धडे मिळाले.
१९८९ सालच्या आशिया कप हॉकीमध्ये धनराजचे पदार्पण झाले. तिथून धनराजने मागे वळून पाहिले नाही. धनराज भारतीय हॉकी संघाचा कर्णधार बनला. चारशेपेक्षा जास्त सामने खेळला. दोनशेहून अधिक गोल केले. भारताकडून सर्वाधिक गोल करणारा खेळाडू बनला. धनराजला भारतीय संघातर्फे चार ऑलंपिक स्पर्धा, चार हॉकी वर्ल्डकप, चार चँपियन्स ट्रॉफी आणि चार आशियाई स्पर्धेत कर्णधार म्हणून खेळता आले. भारतीय हॉकीला जिवंत ठेवण्यासाठी धनराज झगडला.
जसा धनराजच्या नेतृत्वाखाली भारताने हॉकी संघाने २००२ चा आशिया कप जिंकला, तसे देशात सर्वत्र कौतुक झाले. राजकारण्यांनी खेळाडूंना अमुकतमुक देण्याची मोठमोठी आश्वासने दिली, पण ती आश्वासनेच राहिली. क्रिकेटसारखी हॉकीला थोडीच प्रतिष्ठा होती. परंतु धनराजने हार मानली नाही. धनराज एका नेत्याकडे गेला. त्याला आपल्या हॉकीच्या योगदानाविषयी माहिती सांगितली.
पण त्या नेत्याने धनराजला अत्यंत अपमानास्पद वागणूक दिली. “गरीब आहेस तर गरीबच राहा, तुला कोणीही मदत करणार नाही” असे बोल सुनावले. धनराजला हे जिव्हारी लागलं. तो रडतरडतच बाहेर आला. बाहेर माध्यमांना त्यांनी सर्व हकीकत सांगितली. त्यावेळी पुढारी वर्तमानपत्रात त्याची सविस्तर बातमी छापून आली.
त्यावेळी बाळासाहेब ठाकरे पुण्यात होते. त्यांना ही बातमी समजताच त्यांनी धनराजला निरोप पाठवून विमानतळावर बोलावून घेतले. त्याला घेऊन बाळासाहेब मुंबईला आले. मातोश्रीवर गेल्यानंतर बाळासाहेबांनी “कशाला त्या नेत्याकडे गेलता, माझ्याकडे का आला नाहीस ?” असे म्हणत धनराजची चांगलीच कानउघाडणी केली.
त्यानंतर बाळासाहेबांनी मातोश्रीवर पत्रकार परिषद घेऊन ४८ तासांच्या आत धनराजला घर मिळेल असा शब्द दिला. पण २४ तासांच्या आतच धनराजला महाराष्ट्र शासनाचे पत्र मिळाले, आणि लवकरात लवकर तुमच्या घराचा ताबा घ्या असे कळवले. बाळासाहेबांनी आपला शब्द खरा केला.