चंपा हे नाव सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणात गंमतीदार पद्धतीने वापरले जाते. राजकारणात टीका करताना कुणी कुणाबद्दल कशा पद्धतीने बोलावं हा ज्याचा त्याचा निर्णय आहे. आज आम्ही तुम्हाला ज्या चंपाबद्दल सांगणार आहोत तो राजकीय क्षेत्रातच आहे, पण त्या नावाला शिवसेनेच्या गोटात फार आदर आहे. ते नाव म्हणजे चंपासिंग थापा. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची सावली म्हणूनही त्यांना ओळखले जायचे. आज आपण त्यांच्याविषयीच जाणून घेणार आहोत.
चंपासिंग थापा हे तसे मूळचे नेपाळचे होते. साधारणपणे १०८० नंतर ते नेपाळवरुन मुंबईला आले. सुरुवातीला गोरेगाव भागात मिळेल ती छोटी मोठी कामे करुन त्यांनी पॉट भरायला सुरुवात केली. एके दिवशी शिवसेनेचे भांडुपमधील तत्कालीन नगरसेवक दिवंगत के.टी.थापा यांच्यासोबत ते मातोश्रीवर आले. बाळासाहेबांचे जेवण, औषधे अशा बारीकसारीक गोष्टीवर लक्ष ठेवण्यासाठी सावलीसारखं कुणीतरी सोबतीला हवं होतं. के.टी.थापांच्या शिफारशीवरुन बाळासाहेबांनी चंपासिंग थापांवर ती जबाबदारी दिली.
चंपासिंगानी बाळासाहेबांच्या प्रत्येक छोट्यामोठ्या गोष्टींची माहिती करुन घेतली. अल्पावधीतच ते बाळासाहेबांच्या गळ्यातील ताईत बनले. चंपासिंगांची सेवाभावी वृत्ती, काम करण्याची तत्परता यामुळे बाळासाहेब त्यांच्यावर मुलासारखे प्रेम करायचे.
त्यांनी मातोश्रीत आपल्या रुमशेजारीच चंपासिंगला छोटी खोली राहायला दिली होती. मीनाताईंच्या जाण्यानंतर खऱ्या अर्थाने चंपासिंगांनी बाळासाहेबांच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांची सेवा केली. बाळासाहेब सकाळी झोपेतून उठल्यापासून ते रात्री परत झोपेपर्यंत चंपासिंगांची धावपळ सुरु असायची. त्यांचे कुटुंब नेपाळमध्ये असले तरी त्यांचे सर्वस्व मातोश्रीत होते.
चंपासिंग यांचे बाळासाहेबांवर एवढे प्रेम होते की दरवर्षी बाळासाहेबांच्या वाढदिवसाला ते नेपाळवरुन रुद्राक्ष आणायचे आणि बाळासाहेबांची तुला करुन ते रुद्राक्ष लोकांमध्ये वाटायचे. बाळासाहेब बाहेर दौऱ्यावर निघाले की त्यांची बॅग भरण्यापासून ते बाळासाहेबांच्या आवडीची पुस्तके, पु.ल.देशपांडेंच्या एकपात्री प्रयोगाची आणि प्राचार्य शिवाजीराव भोसलेंच्या व्याख्यानांची कॅसेट्स घ्यायला ते कधीच चुकत नसत. बाळासाहेबांच्या सिक्युरिटी गार्डच्या निगराणीत चंपासिंगांचीही नजर फिरत असायची.
बाळासाहेबांच्या सेवेमुळे चंपासिंगांना वर्षातून एकदाच नेपाळला जायला मिळायचे. पण वर्षभरात बाळासाहेबांना भेटायला येणारे लोक चंपासिंगांनाही आवर्जून भेटवस्तू आणायचे. बाळासाहेबांचे निधन झाले त्यावेळी त्यांनी “थापा, मी आरती करायला जातोय” हे आपले शेवटचे शब्द चंपासिंगजवळच बोलले होते. आपली शेवटची इच्छा सांगताना बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना थापाला मातोश्रीवरच ठेवायला सांगितले होते. बाळासाहेबांनंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेही चंपासिंग थापा यांचा तितकाच मनापासून आदर करतात.