मागची काही वर्षे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत सर्वात वरच्या स्थानावर असलेले आणि आताच्या घडीला जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती असणारे बिल गेट्स हे आता शेतीत उतरले आहेत. मायक्रोसॉफ्ट सारखी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी स्थापन करुन आपल्या नावाचा बोलबाला निर्माण केल्यानंतर आता त्यांनी शेतीकडे आपली पावले वळवली आहेत. आजच्या तारखेला जगातील सर्वात मोठ्या शेतकऱ्यांची यादी केली तर बिल गेट्स त्यात सर्वात वरच्या स्थानावर असतील.
कसे बनले बिल गेट्स जगातील सर्वात मोठे शेतकरी ?
बिल गेट्स यांनी अमेरिकेच्या वेगवेगळ्या १८ राज्यांमध्ये जवळपास २ लाख ४२ हजार एकर जमीन खरेदी केली आहे. त्यांच्याकडे आता एकूण मिळून २ लाख ६८ हजार ९८४ एकर जमीन झाली आहे. बिल गेट्स यांच्याकडे लुसियानामध्ये ६९ हजार एकर, अर्कांसास येथे ४८ हजार एकर, एरिझोना येथे २५ हजार एकर, वॉशिंग्टन येथे १६ हजार एकर जमीन आहे. त्यांचे वॉशिंग्टन येथील फार्म तर अवकाशातूनही दिसते.
इतक्या मोठ्या जमिनीवर बिल गेट्स काय करणार आहेत ?
बिल गेट्स यांनी सन २००० पासूनच विकसनशील देशातील छोट्या शेतकऱ्यांना मदत म्हणून जमिनीत गुंतवणूक करायला सुरुवात केली होती. इतक्या मोठ्या प्रमाणावर जमीन खरेदी करुन बिल गेट्स त्याचे काय करणार आहेत याबद्दल त्यांनी काही माहिती दिली नाही. त्यांच्या लुसियानामधील जमिनीवर सोयाबीन, मका, कापूस आणि तांदूळ पिकवला जातो. त्यांच्या वॉशिंग्टन येथील जमिनीवर पिकवला जाणारा बटाटा मॅकडोनाल्डला सप्लाय केला जातो. एरिझोना येथील जमिनीवर स्मार्ट सिटी उभारण्याचा त्यांचा मानस आहे.