बॉक्सिंग खेळ म्हणलं तर अनेकांना त्यातील खेळाडूंची नावे सांगता येणार नाहीत, अपवाद फक्त एका नावाचा. ते नाव म्हणजे माइक टायसन ! हो तोच बॉक्सर ज्याला बॉक्सिंगच्या इतिहासामधील सर्वात भयंकर, क्रूर, खुंखार, खतरनाक, वगैरे म्हणून जे काही आहे असेल त्या विशेषणाने ओळखले जाते.
टायसनच्या नावामागे ही सगळी विशेषणे लागण्यामागचे कारण म्हणजे २८ जून १९९७ रोजीची इवांडर होलिफिल्ड या बॉक्सरविरुद्ध असणारी हेवीवेट चॅम्पियनशिप मॅच ! या मॅचमध्ये टायसनने इवांडरच्या डाव्या कानाला कडकडीत चावा घेतला आणि त्याचा तुकडा काढून जमिनीवर टाकला होता. आहे ना भयंकर ?
तर मंडळी हा टायसन नावाचा प्राणी लहानपणापासूनच असा होता. लहानपणी एका पोऱ्याने टायसनचे पाळलेले कबुतर मारले, तर ह्या बाबाने त्या पोऱ्याचा जबडाच तोडला होता. शाळेत कुणाशी भांडणं झाली तर हे बेणं रडायचं नाही, उलट एका बुक्कीत समोरच्याचे दात पाडायचा. असल्या गुणांमुळेच वयाच्या १३ व्या वर्षापर्यंत टायसनला तब्ब्ल ३८ वेळा पोलिसांनी अटक केली होती. एवढंच नाही, टायसन हा वयाच्या २० व्या वर्षापर्यंतच बॉक्सिंगमधील सर्व जागतिक चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकणारा सर्वात तरुण बॉक्सर बनला होता. एक काळ असा आला होता की टायसनसोबत लढायचं म्हणलं तरी प्रतिस्पर्धी थरथरा कापायचे.
बॉक्सिंग जगज्जेता बनल्यानंतर कमाईच्या बाबतीतही टायसन सर्वात श्रीमंत खेळाडू बनला. एवढे नाव आणि पैसा म्हणल्यावर हॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री रॉबिन गिबेन्सने टायसनसोबत लग्न केले. पण दोन वर्षातच टायसनची निम्मी प्रॉपर्टी घेऊन ही बया त्याला सोडून निघून गेली. त्यानंतर टायसन बाबा बिघडले. त्यांनी चक्क १८ वर्षांच्याच मिस ब्लॅक अर्थ मॉडेलवर अतिप्रसंग केला. त्याबद्दल त्यांना ६ वर्षांची शिक्षा झाली. तिथे त्याने इस्लाम धर्मही स्वीकारला. शिक्षा भोगून आल्यानंतर पुन्हा हा बाबा बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन बनला.
पुढे पुढे या टायसन बाबांना गांजाचा नाद लागला. त्यांचे हे प्रमाण इतके वाढले की आपल्या मित्रांसोबत त्यांना महिन्याला १० टन गांजा लागायचा. आपल्या भाषेत सांगायचे झाले तर महिन्याला नुसत्या २८ लाखाचा गांजा ओढणारा बाबा म्हणजे टायसन बाबा !
माइक टायसन आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प तात्या यांच्यात पहिल्यापासूनच चांगले संबंध होते. १९८८ मध्ये आपल्या ट्रम्प प्लाझा हॉटेल आणि कॅसिनोची जाहिरात करण्यासाठी ट्रम्प तात्यांनी टायसन-स्पिंक्स सामन्यासाठी ८१ कोटी रुपये घालवले होते, पण त्या सामन्यानंतर त्यांना १९२ कोटी रुपयांची कमाई देखील झाली होती.
या सामन्यानंतर टायसनने त्याच्या तत्कालीन आर्थिक सल्लागार बिल केटनला पदावरुन काढून टाकले आणि डोनाल्ड ट्रम्पला आपला आर्थिक सल्लागार नेमले. याचे वृत्त तत्कालीन न्यूयॉर्क टाइम्स मध्ये आले आहे. याशिवाय टायसनवर अतिप्रसंगाचे आरोप झाले होते त्यावेळी ट्रम्पतात्या त्याच्या समर्थनार्थ उतरले होते. पण टायसनने एकदा माझ्या पत्नीशी अनैतिक संबंध ठेवतोस काय म्हणून ट्रम्पतात्यांना दमदाटीही केली होती. आहे ना सगळंच मजेशीर…?