Sunday , May 28 2023
Breaking News
Home / जीवनशैली / भंगार विक्रेत्याच्या मुलाला नायब तहसीलदार होऊनही आज विकावं लागतंय भंगार !

भंगार विक्रेत्याच्या मुलाला नायब तहसीलदार होऊनही आज विकावं लागतंय भंगार !

स्पर्धा परीक्षा या नेहमीच चर्चेचा विषय असतात. स्पर्धा परीक्षा देऊन एखादं मोठं अधिकारी होण्याचं स्वप्न लाखो तरुण तरुणी बघत असतात. अगदी सामान्य घरातील अनेक जण मोठ्या अडचणींवर मात करून स्पर्धा परीक्षेतून मोठे अधिकारी झाल्याचे आज असंख्य उदाहरणं आहेत. अनेक वर्ष पुस्तकी कीडा होऊन राहणारे लाखो तरुण स्पर्धा परीक्षेतून यश मिळवण्याचं स्वप्न बघत असतात. स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी स्पर्धा परीक्षा हे मोठं साधन आहे. पण या स्पर्धा परीक्षा आज अनेक तरुणांना स्वप्न दाखवून पुन्हा संकटाच्या खाईत ढकलत आहेत. याचा प्रत्येय तुम्हाला या तरुणाची व्यथा वाचल्यानंतर येईल.

अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे राहणारे गडलिंग कुटुंब. कुटुंबप्रमुख बाबाराव गडलिंग हे ४० वर्षांपासून भंगार विकून कुटुंबाचा गाडा हाकतात. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आणि बिकट. बाबारावांचा भंगारासोबत रांगोळी विक्रीचा देखील व्यवसाय. बाबारावांचा मुलगा अक्षय हा अभ्यासात लहानपणीपासूनच अत्यंत हुशार होता. हा मुलगा मोठे होऊन कुटुंबाचे जीवन बदलवणार होता.

हुशार असलेल्या अक्षयला बाबारावांनी कधीच गरिबीची चणचण भासू दिली नाही. अक्षय हा अत्यंत ध्येयवेडा होता. शाळेमध्ये अभ्यासासह त्याने वक्तृत्व स्पर्धा वादविवाद स्पर्धेतून आपली चमक दाखवली. शाळेतून कॉलेजला गेल्यावरच अक्षय मोठे स्वप्न बघायला लागला. अक्षयला आपल्या स्वप्नांना गवसणी घालण्यासाठी स्पर्धा परीक्षा हा योग्य मार्ग वाटलं. त्याने हा मार्ग निवडत अधिकारी होण्याचं ठरवलं. घरची परिस्थिती अत्यंत बेताची असतानाही अक्षय खचला नाही. त्याने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरु केला.

अक्षयचं घर म्हणजे एक साधी झोपडी. त्याच झोपडीत रात्री दिवा लावून अक्षय उशिरापर्यंत अभ्यास करायचा. गरिबीचं कुठलंही भांडवल न करता अक्षय आपल्या स्वप्नांकडे वाटचाल करत होता. त्याच्या जिद्द चिकाटीसमोर सहाजिकच दारिद्र्यालाही झुकाव लागणार होतं. अन तसं झालंही. अक्षयने पीएसआय वन विभागाच्या परीक्षादेखील पास केल्या पण काही कारणामुळे तो जाऊ शकला नाही. तरीही त्याने न खचता पुढे अभ्यास सुरु ठेवला.

अखेर ध्येयवेड्या अक्षयचं स्वप्न पूर्ण होणार असं दिसलं मागच्या वर्षीच्या एमपीएससी परीक्षांच्या निकालामधून. जून २०२० मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. या परीक्षेत यश मिळवत वयाच्या २५ व्या वर्षी अक्षय बाबाराव गडलिंग हा नायब तहसीलदार झाला. अक्षयच्या या निकालानंतर कुटुंबाला सोन्याचे दिवस येतील असं वाटलं पण तसं काहीच झालं नाही. वडिलांप्रमाणे अक्षयही आज भंगार विकून स्वतःचं जीवन जगतोय.

आपल्याकडे असलेल्या यंत्रणा आणि धोरणांच्या कृपेने अक्षय हा बिनपगारी अन कागदावर फुल्ल अधिकारी झाला आहे. परीक्षेचा निकाल लागून एक वर्ष उलटलं तरीही अक्षयला अजून पोस्टिंग मिळालेली नाहीये. अक्षयला यामुळे मिळेल ते काम करून आणि भंगार विकून उपजीविका करावी लागत आहे. कोरोनामुळे आधीच संकट असताना अक्षयच्या आईची देखील मजुरी सुटली. तर वडिलांचा काही महिन्यांपूर्वी अपघात झाल्याने त्यांना देखील घरी बसून राहावं लागलं.

या सर्व परिस्थितीमुळे नायब तहसीलदार झालेल्या अक्षयला आज भंगार विकावं लागत आहे. सर्व कुटुंब आज अक्षयकडे आशा लावून बसलेलं आहे. सुखाचे दिवस येतील असं सर्वाना वाटलं होतं. पण असं काहीही झालं नाही. मोठ्या मेहनतीने परीक्षा पास होऊन अधिकारी होण्याचे स्वप्न बघणाऱ्या अक्षयवर हि वेळ आली आहे आपल्याकडे असलेल्या धोरणांमुळे. आशा करूया अक्षयला लवकरात लवकर पोस्टिंग मिळेल.

About Mamun

Check Also

आईच्या मृत्यूमुळे आतून तुटलेली अकाउंटंटची मुलगी दुसऱ्या प्रयत्नात टॉपर येत बनली IAS !

यश श्रीमंत किंवा गरीब किंवा लहान, मोठे पाहत नाही, जो योग्य दिशेने कठोर परिश्रम करतो, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *