नुकत्याच झालेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीची सर्वत्र खूप चर्चा झाली. या निवडणुकीला अनेक कारणांनी चर्चेत ठेवले. एकतर कोरोनाने थैमान घातले असताना सर्वच राजकीय पक्षांनी मोठ्या गर्दीच्या सभा घेऊन कोरोना पसरण्यास मदत केली. शिवाय मागील २ वर्षांपासून बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या झडपी देखील चर्चेचे कारण होत्या. भाजपने पूर्ण शक्ती लावून हि निवडणुक लढवली. पण शेवटी त्यांना अपयश आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी प्रचारात पूर्ण शक्तीने उडी घेतल्याने निवडणुकीला महत्व आले होते. पण ममता बॅनर्जी यांनी आपला किल्ला अबाधित ठेवत राज्यात सत्ता मिळवून हॅट्रिक केली.
या निवडणुकीत अनेक उमेदवारांची खूप चर्चा झाली. काही उमेदवार हे आपल्या गरिबीमुळे चर्चेत होते तर काही उमेदवार हे पक्षांतर करून निवडणूक लढवत होते. भाजपला इथे उमेदवार देण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली. भाजपने मागील २ वर्षांपासून यासाठी तयारी केल्याचं आपण बघितलंच आहे. यामध्ये विविध क्षेत्रातील दिग्गजांनी राजकारणात प्रवेश करून भाजपकडून निवडणुकीसाठी कंबर कसली होती. दरम्यान या निवडणुकीत क्रिकेटच्या मैदानात भारतीय संघात खेळलेले २ क्रिकेटर निवडून आले आहेत. एक क्रिकेटपटू भाजपकडून आमदार बनला आहे तर एक TMC च्या तिकिटावर विधानसभेत पोहचला आहे.
भारताचा माजी क्रिकेटपटू मनोज तिवारी हा तृणमूल काँग्रेसकडून मोठं मताधिक्य घेत आमदार बनला आहे तर भारताचाच माजी वेगवान गोलंदाज अशोक दिंडा हा भाजपच्या तिकिटावर आमदार बनला आहे. क्रिकेटच्या मैदानात सोबत खेळलेले हे २ दिग्गज आता एकमेकांविरुद्ध बंगालच्या विधानसभेत लढताना दिसणार आहेत. ३५ वर्षीय मनोज तिवारीने शिबपूर मतदारसंघातून ३२ हजार ६०३ मतांनी विजय मिळवला. तर अशोक दिंडाने मोयना मतदारसंघातून १२६० मतांनी विजय मिळवला.
हावडा मध्ये जन्मलेल्या मनोज तिवारीने भारतीय संघात २००८ मध्ये डेब्यू केला होता. त्याने भारतीय संघाकडून शेवटचा वनडे सामना जुलै २०१५ मध्ये खेळला होता. मनोज तिवारीने १२ वनडे, ३ टी २० सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. वनडे मध्ये त्याने २८७ धावा केल्या होत्या. मनोज तिवारीने बंगालच्या संघाकडून रणजी खेळताना धावांचा डोंगर उभा केला होता. त्याच्या नावावर अनेक रेकॉर्ड आहेत.
मनोज तिवारीने १२५ फर्स्ट क्लास मॅचमध्ये २७ शतक आणि ३७ अर्धशतकाच्या मदतीने ८९६५ धावा केल्या होत्या. त्याच्या नावावर फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये तिहेरी शतकाचा देखील रेकॉर्ड आहे. ज्यामध्ये त्याच एव्हरेज हे ५० च्या वर आहे. शिवाय १६३ लिस्ट ए मॅचमध्ये त्याने ४२ च्या सरासरीने ५४६६ धावा केल्या आहेत. यामध्ये ६ शतक आणि ४० अर्धशतकांचा समावेश आहे. मनोज तिवारीने भारतीय अंडर १९ आणि इंडिया ए चे नेतृत्व देखील केलं आहे. बंगालच्या संघाने त्याच्या नेतृत्वात अनेक ट्रॉफी जिंकल्या आहेत. शिवाय आयपीएलमध्ये तो कोलकाता नाइट राइडर्स, किंग्स इलेवन पंजाब आणि राइजिंग पुणे सुपरजाइंट्स या संघाकडून खेळला आहे.
३६ वर्षीय अशोक दिंडाने देखील भारतीय संघाकडून १३ वनडे आणि ९ टी २० सामने खेळले. दिंडाने २००९ मध्ये महेंद्रसिंग धोनी कर्णधार असताना भारतीय संघात पदार्पण केले होते. दिंडाला नागपूरमध्ये श्रीलंका विरुद्ध पहिला टी २० सामना खेळण्याची संधी मिळाली. त्यानंतर २०१० मध्ये तो झीम्बाब्वे विरुद्ध पहिला वनडे सामना खेळला. दिंडाने भारताकडून १२ वनडे आणि १७ टी २० विकेट घेतल्या. २०१३ मध्ये भारतीय संघातून बाहेर गेल्यानंतर तो पुनरागमन करू शकला नाही.
दिंडाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून बाहेर गेल्यानांतर रणजी सामन्यात चांगली कामगिरी केली. दिंडाने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये ४२० विकेट घेतल्या आहेत. तो बंगालकडून सर्वात जास्त विकेट घेणारा दुसरा गोलंदाज आहे. अशोक दिंडा आयपीएलमध्ये ५ संघाकडून खेळला. दिल्ली डेयरडेविल्स, कोलकाता नाइट राइडर्स, पुणे वॉरियर्स, राइजिंग पुणे सुपरजाइंट आणि रॉयल चैलेंजर्स बैंगलोर संघाकडून त्याने सामने खेळले. त्याने ७८ सामन्यात ६९ विकेट घेतल्या. आयपीएलमध्ये विराट कोहली त्याची पहिली विकेट होता.
हे भारतीय संघात खेळलेले मित्र आता विधानसभेत एकमेकांविरुद्ध लढताना दिसणार आहेत. मनोज तिवारी म्हणाला आम्ही वेगळ्या पक्षाकडून आमदार बनलो असलो तरी आमची मैत्री कायम राहील असं म्हणाला. या दोन्ही क्रिकेटपटूंना राजकारणातील या नव्या इनिंगसाठी शुभेच्छा.