भारतात एका सामान्य कुटुंबात जन्मलेला तो तरुण. कमी वयातच राजकारणात आला. गावच्या नगरपालिकेत २ वेळा नगरसेवक बनला. पण राजकारण सोडून ८ डॉलर घेऊन तो दुबईला गेला. ८ डॉलर म्हणजे आताची भारतीय किंमत ६०० च्या आसपास. तिथं एकेकाळी त्याने लोकांच्या घरी जाऊन गोळ्या औषधी विकायचं काम केलं. त्याच तरुणाने दुबईत एक स्वतःची गोळ्या औषधांची कंपनी चालू केली. जी कंपनी पुढे चालून १७० देशात पसरली. त्याचं साम्राज्य एवढं वाढलं कि त्याची एकूण संपत्ती ३० हजार कोटींपर्यंत पोहचली. पण त्याच्याकडून काही चुका झाल्या आणि त्याला आपली हजारो कोटींची कंपनी अवघ्या १ डॉलर मध्ये म्हणजे ७५ रुपयात विकावी लागली. जाणून घेऊया कोण आहे हा तरुण अन कसं उभारलं त्याने हे साम्राज्य..
बाबागुथु रघुराम शेट्टी म्हणजेच बी.आर. शेट्टी हा कर्नाटकमधील उडपी शहरात एका सामान्य घरात जन्मलेला तरुण. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. १ ऑगस्ट १९४२ रोजी शंभू आणि कुस्सुमा शेट्टींच्या पोटी त्यांचा जन्म झाला. शेट्टींनी भारतातच आपलं शिक्षण पूर्ण केल. १९७० मध्ये त्यांनी मणिपाल विश्वविद्यालयातून फार्मासिस्ट म्हणून डिग्री मिळवली. फार्मसीची डिग्री घेतल्यावर शेट्टीनी एका फार्मा कंपनीची डिस्ट्रिब्युटरशिप घेतली. शेट्टींच्या घरची परिस्थिती हलाखाची होती. त्यांना राजकारणाची देखील आवड होती. त्यामुळे आपल्या व्यवसायाकडे त्यांना जास्त लक्ष देता येत नसे.
शेट्टींना आपल्या बहिणीचे लग्न करण्यासाठी बँकेकडून कर्ज काढावे लागले. शेट्टींनी राजकारणात देखील जम बसवला होता. ते २६ वर्षाचे असतानाच त्यांना राजकारणात मोठी संधी मिळाली. ते जनसंघात त्यावेळी सक्रिय होते. त्यांना उडपी नगरपालिकेचे तिकीट देखील मिळाले. त्यांच्या प्रचारासाठी अटल बिहारी वाजपेयी त्याकाळी आले होते. तर १६ वर्षीय मोदींचा आणि शेट्टींचा देखील संबंध आला होता. शेट्टी त्याकाळी नगरपालिकेत २ वेळा निवडून गेले आणि नगरसेवक बनले. पण बहिणीच्या लग्नासाठी घेतलेल्या कर्जाच्या बोज्यामुळे ते चिंतीत होते. त्यांनी देशसोडून UAE मध्ये जाण्याचं ठरवलं.
शेट्टींनी दुबईत गेल्यावर तिथं मेडिकल रिप्रेझेन्टेटिव्ह म्हणून काम सुरु केलं. रोज ते मेडिकलच्या चकरा मारून मार्केटिंग करायला लागले. लोकांच्या घरी जाऊन देखील गोळ्या औषधी त्यांनी त्याकाळी विकल्या. अवघे ५०० रुपये घेऊन त्यांनी UAE गाठलं होतं. खूप नाजूक परिस्थिती होती. नोकरी करताना त्यांना एकच ड्रेस रात्री धुवून दुसऱ्या दिवशी घालावा लागे. खूप मेहनत करून पैसे कमावून शेट्टींनी आपलं कर्ज फेडलं. पुढे १९७५ मध्ये त्यांनी स्वतःची कंपनी सुरु केली. न्यू मेडिकल सेंटर (एनएमसी) निओ फार्मा हि कंपनी त्यांनी सुरु केली. मेडिकल सोबतच त्यांनी क्लीनिक देखील सुरु केलं. कारण पत्नी चंद्रकुमार रेड्डी या डॉक्टर होत्या.
त्यांच्या या छोट्या क्लीनिकचा विस्तार एवढा झाला कि त्यांच्याकडे २००० डॉक्टर सेवा द्यायला लागले. तर त्यांचे ४५ मोठे हॉस्पिटल देखील सुरु झाले. त्यांचा हा कारभार पुढे अनेक देशात पसरत गेला. २०१२ मध्ये लंडन स्टॉक एक्सचेंज मध्ये लिस्ट होणारी त्यांची UAE ची पहिली कंपनी बनली. १९८० मध्ये शेट्टींनी अमिरातचा सर्वात जुना रेमिंटेन्स बिजनेस युएई एक्सचेंजची सुरुवात करून फायनान्स क्षेत्रात देखील आपले पाऊल ठेवले. शेट्टींनी हळू हळू हेल्थकेअरनंतर हॉस्पिटेलिटी, फूड अँड बीवरेज, फार्मास्यूटिकल मैन्युफैक्चरिंग आणि रियल इस्टेट मध्ये देखील पाय रोवले.
युनीमनी म्हणून त्यांची सेवा लोक आपल्या मायदेशी पैसे पाठवण्यासाठी वापरत. ती सेवा त्याकाळी एवढी प्रसिद्ध झाली कि त्यांनी थोड्याच कालावधीत ३१ देशात ८०० पेक्षा अधीक शाखा उघडल्या. २०१४ मध्ये ब्रिटनची ट्रॅव्हलेक्स हि कंपनी त्यांनी विकत घेतले होते. फिनअब्लर आणि निओ फार्मा या कंपन्यांचा विस्तार त्यांनी १४५ देशात केला आहे. शेट्टींनी भारतात देखील अनेक रुग्णालय विकत घेतली आहेत. त्यांनी तेल आणि गॅस शोधणारी आसाम हि चहा उत्पादन कंपनी १००० कोटींमध्ये खरेदी केली होती. यासह त्याने करोडो रुपयांच्या अनेक मोठ्या खरेदी केल्या. जे त्यांच्यासाठी पुढे महागात पडले होते.
शेट्टींनी दुबईच्या बुर्ज खलिफा मध्ये २ मजलेच विकत घेतलेले आहेत. त्यांना महागड्या गाड्यांचा देखील मोठा शौक आहे. त्यांच्याकडे रोल्स रॉयस पासून प्रायव्हेट जेट पर्यंत अनेक महागड्या गाड्या आहेत. तुलु बंट या समाजाच्या बी आर शेट्टींनी आपली संपत्ती ३० हजार कोटींपर्यंत नेऊन पोहचवली. त्यांना UAE चा सर्वोच्च पुरस्कार आणि भारताचा पद्मश्री सन्मान देखील मिळाला होता.
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मड्डी वॉटर रिसर्चचे संस्थापक आणि लेखक कारसन ब्लॉक यांनी त्यांच्या एका अहवालामध्ये एनएमसीची पोलखोल केली आणि संपत्त्यांचा खोटा आकडा देणे, संपत्या ढापण्याचा आरोप लावला होता. त्यानंतर त्यांची कंपनी लंडन स्टॉक एक्सचेंज मधून काढून टाकण्यात आली होती. त्यानंतर एलएसई ने शेट्टी यांच्या कंपनीवर ४० हजार कोटींचं कर्ज असल्याचं घोषित केलं होतं.
शेट्टींवर आरोप झाल्यावर UAE च्या केंद्रीय बँकेने देखील त्यांची चौकशी सुरु केली. त्यांच्या एनएमसी हेल्थ आणि अमिरातीतल्या कंपन्यांविरोधात सरकारची फ सवणूक केल्याचा आरोप आहे. यामुळे शेट्टी काही महिन्यांपासून अमिरातमधून गायब झाले आहेत. त्यांच्या कंपन्यांविरोधात कमीतकमी पाच प्रकरणांवर चौकशी सुरु आहे. त्यांची फिनाब्लर हि कंपनी एक डॉलरला विकण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. इ स्रायलच्या प्रिझम ग्रुप एजीला कंपनी विकण्यात येणार आहे. कर्जाच्या ओझ्यामुळे ही कंपनी विकण्याची वेळ बीआर शेट्टी यांच्यावर आली आहे.