क्रिकेटच्या इतिहासात सनथ जयसूर्या हे नाव प्रतिस्पर्धी संघाच्या बॉलर्सची धूळधाण उडवणारा विस्फोटक बॅट्समन म्हणून परिचित आहे. ९० च्या दशकात एकदिवसीय क्रिकेटमध्ये जी काही वेगवान शतकं आणि अर्धशतकं होती, त्यातली जवळपास सर्वच जयसूर्याच्याच नावावर होती. श्रीलंका टीमचा सलामीवीर म्हणून खेळताना जयसूर्याने आपल्या आक्रमक खेळींच्या जोरावर वनडे क्रिकेटचा चेहराच बदलून टाकला होता. वनडे क्रिकेटमध्ये सुरुवातीच्या षटकांमध्ये पावरप्ले लागू असताना फटकेबाजी करण्याची पद्धत जयसूर्याने आणली.
सनथ जयसूर्या हा वनडे क्रिकेटमधील आजपर्यंतचा सर्वात उत्तम ऑलराउंडर होता. त्याने ४४५ वनडे सामन्यांमध्ये २८ शतके आणि ६८ अर्धशतकांसह १३४३० धावा केल्या, तर ३२३ विकेटही घेतल्या. भारताविरुद्ध तर जयसूर्याची बॅट चांगलीच तळपली. भारताविरुद्धच्या ८९ एकदिवसीय सामन्यांमध्ये २९०० धावा कुठल्या आहेत. तर १० कसोटी सामन्यांमध्ये ६७ च्या सरासरीने ९३८ धावा काढल्या. २०११ मध्ये जयसूर्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. पण त्याची इनिंग इथेच संपली नाही.
२०१० साली जयसूर्या श्रीलंकन संसदेत खासदार म्हणून निवडून आला. २०१३ साली तो श्रीलंकन सरकारमध्ये टपाल सेवा खात्याचा मंत्री झाला. २०१५ मध्ये स्थानिक शासन व ग्रामीण विकास मंत्री म्हणून त्याला बढतीही मिळाली. परंतु त्यानंतर गुडघ्याच्या आजाराने त्याला त्रासल्याने त्याने राजकारण सोडले.
गुडघ्याच्या उपचारासाठी त्याने जगातील चांगले चांगले डॉक्टर बघितले, पण कुणाचाच फरक पडेना. शेवटी भारताचा माजी कर्णधार महंमद अझहरुद्दीनच्या सल्ल्याने त्याने मध्यप्रदेशातील डॉ.प्रकाश टाटा नावाच्या आयुर्वेदिक डॉक्टरकडे झाडपाल्याचे उपचार घेतले, तेव्हा कुठे तो आपल्या पायावर पुन्हा उभे राहू शकला.
श्रीलंकन क्रिकेट टीममध्ये खेळत असतानाच उतारकाळातील तजवीज म्हणून नेत्यांकडे वशिला लावून जयसूर्याने सुपारीच्या व्यापाराचे लायसन्स मिळवले होते. भारत हा जगातील सर्वात मोठा सुपारी उत्पादक देश आहे. परंतु मागच्या काही कालावधीत महाराष्ट्रातील नागपूर शहर सडक्या सुपारीची मोठी बाजारपेठ म्हणून उदयाला आली आहे.
चांगल्या दर्जाच्या सुपारीमध्ये निकृष्ट दर्जाच्या सुपारीची भेसळ करुन विकली जाते. इंडोनेशियातून भारतात सडक्या सुपारी आयात करताना त्यावर जवळपास १०८ टक्के आयात शुल्क लागते. परंतु भारत आणि श्रीलंका हे सार्क सदस्य राष्ट्र असल्याने त्यांच्यातील व्यापारात आयात शुल्क लागत नाही.
व्यापारातील या सवलतीचा फायदा घेण्यासाठी श्रीलंकेचे सुपारी व्यापारी २५ टक्के दरानेच भारतात सडक्या सुपारी विकतात. २०१८ साली नागपूरमध्ये सडक्या सुपारीच्या गोदामावर महसूल इंटेलिजन्स विभागाने धड टाकली असता एका व्यापाऱ्याला अटक केली. त्याच्याकडे कसून चौकशी केली असतं ही सुपारी श्रीलंकेतून सनथ जयसूर्याच्या कंपनीकडून आयात केल्याचे त्याने सांगितले. सुपारी तस्करीच्या या प्रकरणात इंटेलिजन्सच्या पथकाने जयसूर्याला मुंबईत बोलावून त्याची कसून चौकशी केली. पण जयसूर्याने “तो मी नव्हेच” असा पवित्र घेऊन आपल्यावरील आरोप फेटाळले.