झहीर खान ने आपल्या जबरदस्त गोलंदाजीच्या बळावर भारतीय संघाला अनेक विजय मिळवून दिले. आपल्या घटक गोलंदाजीच्या बळावर झहीर विरोधी संघातील फलंदाजीचे कंबरडे मोडत असे. झहीर खान हा भारतीय संघाने २०११ साली जिंकलेल्या आयसीसी वर्ल्डकपचा एक प्रमुख शिलेदार होता. आपल्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक रेकॉर्ड करणाऱ्या झहीर खानने २०१५ मध्ये सन्यास घेतला. झहीर कपिलदेव नंतरचा भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे.
झहीर खान हा आपल्या महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेला मराठमोळा खेळाडू आहे. झहीर खानचा जन्म नगर जिल्ह्यातील श्रीरामपूरचा. एका मध्यमवर्गीय कुटुंबात झहीर खानचा जन्म झाला. झहीर खानचे वडील बख्ख्तीयार खान हे फोटोग्राफर तर आई झकिया खान शिक्षिका होती. वडिलांना देखील क्रिकेटची आवड होत. झहीरचे नावच पाकिस्तानचा क्रिकेटपटू झहीर अब्बास याच्या नावावरून ठेवण्यात आले होते. त्याने सुरुवातीचे शिक्षण हिंदी सेवा मंडळ न्यू प्रायमरी स्कूल आणि सोमैया माध्यमिक शाळेतून घेतलं. झहीरने बारावीनंतर मेकानिकल इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला. झहीर खानला लहानपणीपासूनचं क्रिकेटचे वेड होते. त्याचे हे वेड बघून वडील लहानपणीच १७ व्या वर्षीच मुंबईला घेऊन आले.
मुंबईत झहीर राष्ट्रीय क्रिकेट क्लबमध्ये जायला लागला. तिथे त्याने सराव करत सामने खेळायला सुरुवात केली. झहीर हा सर्वात आधी तेव्हा चर्चेत आला होता जेव्हा त्याने शिवाजी पार्क जिमखाना विरुद्ध फायनल मध्ये ७ विकेट घेतल्या. यानंतर झहीरची निवड मुंबई आणि वेस्ट झोनच्या अंडर १९ संघात झाली. पुढे त्याने लवकरच रणजी मध्ये देखील पदार्पण केले. १९९९-२००० मध्ये त्याने मुंबईच्या संघात स्थान न मिळाल्याने बडोदा कडून रणजी सामना खेळत पदार्पण केले. या सिरीजमध्ये त्याने सर्वांचं मन जिंकलं आणि पुढे यशस्वी डावखुरा गोलंदाज बनला.
झहीरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६१० विकेट घेतल्या आहेत. ज्यामध्ये टेस्टमध्ये ३११, वनडे मध्ये २८२ आणि टी२० मध्ये १७ विकेट घेतल्या आहेत. याशिवाय झहीरच्या नावावर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ६५२ विकेट आहेत. क्रिकेटचे धडे मुंबईत घेणाऱ्या झहीरला मुंबईत अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. असाच एक खास किस्सा जाणून घेऊया. झहीर जेव्हा मुंबईत क्रिकेटचे धडे घेत होता तेव्हा त्याला भीतीमुळे मुंबई सोडायची वेळ आली होती. पण शिवसेनेमुळे तो मुंबईत राहू शकला. जाणून घेऊया तो किस्सा..
शिवसेनेने हमी दिली म्हणून मुंबईत राहिला झहीर-
१९९२ चा तो काळ होता. बाबरी मशिदीच्या पतनानंतर मुंबईत धार्मिक दं गल झाली. या धक्क्यातून मुंबईला सावरायला बराच काळ लागला. पण मुंबईकर हळूहळू सावरला आणि धर्मपंथ विसरून एकमेकाना मदत करायला लागला. त्यावेळी झहीर खानहा १९-२० वर्षाचा होता. तो मुंबईत क्रिकेटचे धडे घेण्यासाठी आला होता. पण नेमकं त्याच काळात हे सर्व घडल्यामुळे मुंबईत त्याच्या मनात भीती होती. त्याच्या एकट्याच्याच नाही तर असंख्य मुंबईकरांच्या मनात भीती होती.
झहीरला मुंबईत भीतीमुळे अस्वस्थ वाटायला लागलं. त्यामुळे त्याने मुंबई सोडून श्रीरामपूरला जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी तो कोच विद्याधर पराडकर यांच्याकडे क्रिकेटचे धडे घेत होता. झहीरने तेव्हा मुंबई सोडली असती तर तो क्रिकेटपासून दूर देखील जाऊ शकत होता. पण विद्याधर सरांनी त्याचं मन परिवर्तन केलं. पराडकर तेव्हा क्रिकेट क्लबमध्ये कोच म्हणून काम करायचे. त्यामुळे राजकीय पक्षांशी देखील त्यांचे चांगले संबंध होते. शिवाय दक्षिण मुंबईत मोठं नाव होतं.
१९९२ ला शिवसेनेचं राज्यात वजन वाढलं होतं. मुंबईत तर शिवसेनेची खूप चलती होती. पराडकर सरांनी झहीरला घेऊन आधी शिवसेनेची शाखा गाठली. त्यांनी तेथील स्थानिक शिवसेना नेत्यांना सांगितलं कि हा माझा विद्यार्थी असून एक गुणी क्रिकेटर आहे पण त्याला मुंबईत राहण्याची भीती वाटत आहे. पराडकर सर स्वत आल्यामुळे शिवसेना नेत्यांनी सरांना तत्काळ शब्द दिला कि ‘काहीही काळजी करु नका, याच्या केसालाही धक्का लागणार नाही याची काळजी आम्ही घेऊ.’
झहीरने देखील शिवसेना नेत्यांनी हक्काने हमी दिल्यामुळे आपला विचार बदलला आणि मुंबईत राहायचं ठरवलं. याचं फळ म्हणजे पुढे त्याचं नाव सुरुवातीला मुंबईत आणि पुढे देशात आणि जगात देखील झळकलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठे नाव झाले. झहीरने मुंबईच्या रणजी संघाचं देखील अनेक वर्ष नेतृत्व केलं. या प्रसंगातून दिसून येते कि संकट काळात मुंबईकर माणूस मदतीला धावून येताना समोरच्या व्यक्तीचा धर्म किंवा जात पाहत नाही.