राजकारण्याच्या घरातील हि मुलगी. तसं तर आई आणि वडील दोघे शिक्षण क्षेत्रातले. वडील प्राध्यापक तर आई हि शिक्षिका. वडील राजकारणात मोठे प्रस्थ. लग्न झाल्यानंतर सासू सासरे चांगले मिळाले. शिक्षण चालूच ठेवून खूप संघर्ष घरून DySP पदापर्यंत मजल मारली. या पदाला गवसणी घालण्यात प्रेरणा देण्यामागे होता एक अपमान. या अपमानामुळेच हि मुलगी आज पोलीस अधीक्षक म्हणून काम करत आहे. एक वेळ तर अशी होती कि तिने मनाला ठरवलं कि हि परीक्षा आता पास झाली नाही तर आ युष्य संपल्यासारखं आहे. जाणून घेऊया तिचा संपूर्ण जीवनप्रवास..
सातारच्या पाटण तालुक्यातील मानेगाव हे गाव. गावातील प्राचार्य उत्तमराव माने हे एक मोठं नाव. राजकारणात त्यांचं मोठं वजन. जिल्हा परिषदचे सदस्य असलेले उत्तमराव सातारा जिल्हा परिषदचे अर्थ व शिक्षण सभापती देखील राहिले. उत्तमरावांची पत्नी देखील जिल्हा परिषदच्या शिक्षिका. सुसंस्कृत आणि शैक्षणिक क्षेत्रात असलेले हे कुटुंब. उत्तमरावांना ३ मुली आणि एक मुलगा. घरात मुलांच्या शिक्षणाबरोबर शारीरिक शिक्षण आणि व्यायामाकडे देखील खूप लक्ष दिलं जायचं.
उत्तमराव हे कबड्डीचे राष्ट्रीय खेळाडू देखील होते. कुटुंबातील वैशाली हि मुलगी अभ्यासात हुशार होती. वैशालीने लहानपणी एका सिनेमात हेमा मालिनीची वकिलाची भूमिका बघून वकील बनण्याची गाठच मनाशी बांधली. वैशाली स्वप्न बघतच मोठी होत होती. वडील राजकारणात असल्याने त्यांच्याकडून बाळकडू मिळत होतं. वैशालीचे प्राथमीक शिक्षण सातार्यातील हत्तीखाना येथे झाले. वडिलांमुळे इतर लोकांचं उठणं बसणं घरी असल्याने वैशाली त्या वातावरणात मोठी झाली.
वैशालीचे माध्यमिक शिक्षण कन्या शाळेत झाले तर महाविद्यालयीन शिक्षण सायन्स कॉलेज मधून झाले. पुढे तिने स्वप्न बघितल्याप्रमाणे इस्माईल मुल्ला लॉ कॉलेजमधून बीएस एलएलबीची पदवी संपादन केली. वकिलीचे स्वप्न पूर्ण होणार होतं. वडिलांमुळे वैशालीला राजकारणाची देखील आवड निर्माण झाली. राजकारणात देखील मोठी ताकद आहे असं तिला वाटायला लागलं. त्यामुळे वकील झाल्यानंतर राजकारणात जायचं देखील तिने ठरवलं.
उत्तमराव १९९२ साली सातारा जिल्हा परिषदचे शिक्षण आणि अर्थ समितीचे सभापती झाले. जिल्हाभर वजन निर्माण झालं. घरी मंत्र्यांचं आणि जिल्ह्यातील मोठ्या नेत्यांचं उठणं बसणं सुरु झालं. हे बघून तर वैशालीने पक्के ठरवलं कि काही झालं तरी राजकारणात जायचं. वैशाली ५ वि पासून टू व्हीलर चालवायची. दहावी अकरावीत जाईपर्यंत ती फोर व्हीलर देखील शिकली. ११-१२ सायन्समध्ये असताना वैशालीला पायलट बनण्याची देखील आवड लागली होती.
विमान चालवायचं स्वप्न वैशालीने बघितलं. त्यासाठी तिने पायलट होण्यासाठी काय पात्रता लागते हे तपासलं. त्यामध्ये तिच्या लक्षात आलं कि पायांची उंची हि कंबरेवरच्या शरीराच्या उंचीपेक्षा जास्त पाहिजे. हि पात्रता तिच्यात असल्याचे तिनेच तपासलं आणि ती परफेक्ट असल्याचं कळलं. पण तिच्या नशिबात वकिलीच होती. आणि ती वकिलीकडेच गेली. तिच्या मैत्रीचे वडील मोठे वकील होते. त्यांच्याकडे तिने सराव केला. जिल्ह्यातील लोक ओळखायला लागले.
वैशालीचे वडील तिला नेहमी MPSC करण्याचा सल्ला द्यायचे. पण तिला काही त्याची आवड नव्हती. वकिली झाल्यानंतर वैशालीच्या लग्नाचं ठरलं. दरम्यान एक चांगलं स्थळ आलं आणि लग्नही झालं. मुलगा कोल्हापुरातला होता. नवऱ्याने वकिली करण्यास देखील परवानगी दिली. लग्नानंतर सर्व व्यवस्थित चालू होतं. पण एक असा प्रसंग वैशालीच्या आयुष्यात घडला ज्यामुळे ती आज पोलीस अधीक्षक आहे.
वैशाली एका उपजिल्हाधीकाऱ्यांच्या कार्यालयात गेली. तिथं तिला त्यांना भेटण्यासाठी खूप जास्त वाट बघत बसावं लागलं. राजकीय घरातील असल्याने तिला वेटिंगची सवय नव्हती. त्यामुळे वैशालीला आपला अपमान झाल्याचे वाटले. तिने त्याच दिवशी ठरवलं कि आता याच खुर्चीवर बसायचं. त्याच दिवशी वकिली बंद केली. MPSC काय हे जाणून घेतलं. क्लास वन ऑफिसर व्हायचं हेच तिने ध्येय ठेवले. त्यावेळी तिच्यासमोर अनेक अडथळे होते. वैशालीला एक सव्वा वर्षाची मुलगी होती.
ज्यावेळी वैशाली पहिल्यांदा गरोदर होती तेव्हाच तिने MPSC ची तयारी सुरु केली. पहिली परीक्षा सि झेरिअन मुळे हुकली. नंतर मुलगी ६ महिन्याची झाल्यावर घरीच तयारी सुरु केली. तिने क्लास देखील जॉईन केले. पण तिथं वेगळे अनुभव आल्याने क्लास बंद करून स्वतःच अभ्यास चालू केला. पहिल्या प्रयत्नात मुलाखतीत थोड्या मार्काने ती हुकली. पुन्हा दुसऱ्या प्रयत्नात ती पूर्व मुख्य परीक्षा पास झाली. पण ९ मार्काने क्लास २ पद हुकलं. त्याच दरम्यान पीएसआय परीक्षा देखील दिली. वडिलांची इच्छा होती कि तिने पीएसआय व्हावं. ती पास देखील झाली पण तिने मुद्दाम शारीरिक परीक्षेत खराब कामगिरी केली. अन हे पद घालवलं.
वैशालीने एका पेपरवर लिहिले होते कि वैशाली माने डीवायएसपी/ डेप्युटी कलेक्टर २००७. तिने हे खरं ठरवत २००७ मधेच वैशाली डीवायएसपी झाली. या यशामध्ये तिचे ७-८ वर्षाचे कष्ट. कुटुंबाची साथ. आणि बरंच काही होतं. वैशालीच्या सासूबाई चौथी पास असून त्यांनी नेहमीच वैशालीला प्रेरणा दिली. वैशाली माने या राज्य गु न्हे अन्वेशन विभागाच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होत्या. काही महिन्यांपूर्वी त्यांना अमरावतीमध्ये पोलीस अधीक्षकपदी पदोन्नती मिळाली आहे.