परिस्थिती हि माणसाची परीक्षा घेत असते. त्या परिस्थितीचा सामना करून त्यातून मार्ग काढून यश मिळवण्याची जिद्द आपल्यात हवी. यश हे नक्कीच मिळतं. आज एका अशा व्यक्तीला भेटूया ज्याने शाळा शिकताना ७-१० वि मध्ये रोजगार हमी योजनेत काम केलं. या कामातुन मिळणाऱ्या पैशात शिक्षण घेतलं. एकेकाळी राहायचे हाल होते म्हणून एसटी स्टॅण्डवर दिवस काढले. राहायचे खायचे हाल होते. याच व्यक्तीने रात्री ११ ते पहाटे ५ कॅंटीनमध्ये वेटरचे काम केले. दिवसा ITI करून शिक्षण घेतलं. आयटीआयला पहिला येत यशाकडे पहिले पाऊल ठेवले. आज या व्यक्तीचा करोडोंचा उद्योग आहे. याच एसटी स्टॅण्डवर दिवस काढलेल्या व्यक्तीची वार्षिक उलाढाल आज करोडोंमध्ये आहे. जाणून घेऊया कोण आहेत हे व्यक्ती आणि त्यांचा प्रवास.
हे व्यक्ती आहेत सातारा जिल्हातील मान तालुक्यातील लोधवडे गावचे रामदास माने. त्यांचा भाग हा अतिशय दुष्काळी. वडिलांना अवघी २० गुंठे शेती. जुन्या दीड खण माळवदात ते राहायचे. पण तेही पडल्याने ते शेतात राहायला गेले. वडिलांनी शेत नांगरून घेतलं आणि आईला ते ढेकळं फोडायला सांगितले. अंगभर कपडे नसायचे. आईसोबत रामदास यांनी पण ढेकळं फोडले. पण उन्हाच्या कडाक्याने त्यांच्या शरीरावरची कातडी देखील जळाली. त्यानंतर त्यांनी आईकडे शाळेत जायचा आग्रह केला.
आईने बाजारातून कपडे आणले आणि रामदासला शाळेत नेले. तिथं त्याचा दाखल घातला. सातवीपर्यंत शिक्षण झालं. ७२ चा भयंकर दुष्काळ तेव्हा पडला होता. तेव्हा रामदास यांचे आईवडील रोजगार हमीच्या कामाला जायचे. वडिलांनी रामदासला शाळा बस झाली म्हणून सांगितलं. त्यांनी कामाला चल म्हणून सांगितलं. पण रामदास शाळा सोडण्यास तयार नव्हते. त्यांच्या तिथं एका डॅमचं काम सुरु होतं. तिथल्या इन्चार्ज मुल्ला साहेबाना भेटून त्यांनी आपल्याला काम द्या म्हणून सांगितलं. फक्त वह्या पुस्तकापुरते पैसे मिळाले तरी बस असं सांगितलं. तेव्हा रामदास यांचं वय अवघ १३ वर्ष होतं.
त्या मुल्ला साहेबानी वयामुळे आधी काम नाकारलं होतं पण नंतर त्यांनी रामदास यांची परीक्षा घेतली. त्यांनी रामदास यांना दिलेले काम करायला सांगितले. रामदास यांनी दीड तास खूप जिवतोडून काम केल्यावर त्यांना खोरं पुन्हा उचलत नव्हतं. पण मुल्ला साहेबानी त्यांना सांगितलं कि तुम्ही ८ तासांचं काम दीड तासात केलं आहे. नंतर त्यांना सुट्टीच्या दिवशी काम दिलं आणि ते आपली दहावीपर्यंत शाळा या पैशातून शिकू शकले. त्यानंतर गावातल्या एका व्यक्तीच्या सल्ल्याने बटन दाबलं कि लाईट लागतो याचा कोर्स करायला साताऱ्याला गेले. तेव्हा खेड्यात लाईट पोहचलेली नव्हती.
आईने सर्व सामान पेटित टाकून दिलं. ते सातारला पत्र्याची पेटी घेऊन गेले. तिथं वाचमनला विचारलं बटन दाबलं कि लाईट लागेल याचा कोर्स करायचा. त्याने मध्ये पाठवलं. तिथं सरानी वायरमनचा अर्ज करायला सांगितला. ८ दिवसांनी आयटीआयला निवड झाली म्हणून पत्र आलं. रामदास हे तेव्हा एस्टीस्टँड्वर दिवस काढत होते. पोलिसांनी हाकललं कि ते थोडावेळ बाहेर थांबून ते जायची वाट बघायचे. सातारच्या एसटी कॅंटीनमध्ये जॉबसाठी ते तिथल्या साहेबाना भेटले आणि परिस्थिती सांगितली. त्या साहेबानी कॅंटीनमध्ये रात्री ११ ते पहाटे ५ वेटरची ड्युटी दिली. दिवसा त्यांनी आयटीआय केला. बघता बघता २ वर्ष गेली.
आयटीआयला ८२ टक्के घेत पहिला येत ते पास झाले. प्राचार्यानी त्यांना २-३ मोठ्या कंपन्यांमध्ये अप्रेन्टिससाठी लेटर दिले. ३ रुपयात ते महिना भागवायचे. पुण्याला जायला पैसे देखील नव्हते. सायकलवर ते सातारवरून ४५ किमी गावाकडे गेले. आजीकडून २० रुपये उसने मागितले. आजीकडून हट्ट करून २० रुपये घेतले. पुणे गाठलं आणि महिंद्रा मध्ये मुलाखत दिली. ते कळवतो म्हणाले. पण रामदास यांनी सत्य परिस्थिती त्यांना सांगितली. ते म्हणाले साहेब मी आजीकडून २० रुपये उसने घेऊन आलो आहे. आता १२ रुपये खर्च झालेत. पुन्हा गावाला गेलो अन तुम्ही बोलावलं तर माझ्याकडे पैसे नसतील.
रामदास ६ वाजेपर्यंत तिथेच सर्व मुलाखती होईपर्यंत तिथंच थांबले. ६ वाजता शिपाई आला आणि साहेबांकडे नेलं. त्यांना १०० रुपये महिन्यांनी अप्रेन्टिस मिळाली होती. १ वर्ष त्यांनी पाण्याच्या टाकीखाली राहून उघड्यावरती अप्रेन्टिस पूर्ण केलं. त्यातही ते पहिले आले. महिंद्रा मध्ये त्यांना पर्मनंट नोकरी मिळाली. त्यांनी नोकरी करत इतर कोर्स देखील पूर्ण केले आणि वायरमनचे सुपरवायझर झाले. पुढे इंजिनिअर मॅनेजर पदापर्यंत ते गेले. सुखाचे दिवस आले होते.
त्यांच्या डोक्यात स्वतःच काही करायचा विचार तेव्हा आला. भोसरीमध्ये अनेक वर्कशॉपमध्ये त्यांनी काम केलं. धंद्यात अपयश येत होतं. बायकोने धंद्याचं वेड सोडून द्या म्हणून सांगितलं. माहेरी जाईल म्हणून सांगितलं. पण ते त्यांच्या कामात अडकून राहिले. अखेर मद्रासमधून बोलावणं आलं. चेन्नईला पहिली मिटिंग झाली. इंग्लिश काही येत नव्हती. त्या कंपनीने विमानाचे तिकीट पाठवले. विमानाने चेन्नईला गेले. तिथं मोठा बोर्ड घेऊन स्वागताला उभे होते. दुसऱ्या दिवशी ६ लाखाची ऑर्डर भेटली.
रामदास यांचा व्यवसाय तेव्हापासून वाढतच गेला. आज भारतामध्ये जेवढं थर्मोकोल बनतं त्यातलं ८० टक्के थर्मोकोल रामदास माने यांच्या मशीनमध्ये बनतं. भारतात त्यांचे १२८ प्रोजेक्ट दिले आहेत. ह्यातून १२००० लोकांना रोजगार दिला. बाहेरच्या ४५ देशांमध्ये त्यांनी ३५२ थर्मोकोलचे प्रकल्प निर्यात केले आहेत. मस्क़त च्या राजाला त्यांनी सर्वात मोठा थर्मोकोल प्रकल्प दिला ज्याचं गिनीज बुक मध्ये नोंद झाली. आज रामदास माने हे करोडोंची उलाढाल करतात. गावचे नाव त्यांनी सातासमुद्रापार नेले आहे. ते आपल्या दुष्काळी भागासाठी देखील मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्य करतात.