Monday , June 5 2023
Breaking News
Home / ट्रेंडिंग / मराठी माणूस मोठे उद्योग करू शकत नाही हा डाग त्यांनी खेड्यात मोठा उद्योग उभा करून पुसला!

मराठी माणूस मोठे उद्योग करू शकत नाही हा डाग त्यांनी खेड्यात मोठा उद्योग उभा करून पुसला!

हि प्रेरणादायी गोष्ट आहे उद्योग विश्वास क्रांती घडवणाऱ्या एका मराठमोळ्या अवलियाची. त्याकाळी कारखाने मराठी माणूस सुरु करू शकत नाही. तो फक्त नोकऱ्याच करू शकतो हा लोकांमध्ये गैरसमज होता. हा समज खोटा ठरवण्याचे काम केले लक्ष्मणराव किर्लोस्करांनी. मराठी माणूस उद्योग उभा करू शकत नाही हा डाग त्यांनी एका खेड्यात मोठा उद्योग समूह उभा करून पुसला.

लक्ष्मणराव काशिनाथ किर्लोस्कर यांचा जन्म २० जून १८६९ रोजी झाला. कर्नाटकात गुर्लहोसूर येथे त्यांचा जन्म झाला. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण धारवाड व कलादगी येथे घेतले. मुंबईला शिक्षणाला घरच्यांनी विरोध केला. पण त्यांनी तो न जुमानता चित्रकलेच्या अभ्यासाला अभ्यासक्रमाला मुंबईच्या जे.जे. स्कूल ऑफ आर्टस येथे प्रवेश घेतला. पण ते थोडे रंगआंधळे (कलर ब्लाइंड) होते. त्यामुळे त्या क्षेत्रात पुढे भविष्य नाही हे त्यांनी ओळखलं.

पुढे यंत्र अभियांत्रिकीला प्रवेश घेतला. नंतर ‘जिजामाता संस्थे’मध्ये बाष्प अभियांत्रिकीचे अध्यापक म्हणून नोकरी सुरू केली. उठाठेवी करणाऱ्या लक्ष्मणरावांना यंत्र खोलून जोडण्याची सवय होती. शिक्षक म्हणून मन रमलं नाही. १८८७ मध्ये मुंबईतून सायकली खरेदी करून त्या बेळगावमध्ये वडील बंधू रामण्णा यांच्या मदतीने विकण्यास सुरूवात केली.

इंग्लंडच्या मूळ सायकल उत्पादक कंपनीशी थेट करार करून सायकली विकण्यास सुरुवात केली. पुढे नोकरीत पदोन्नती नाकारल्याने ती सोडून गावी बेळगावला आले. सायकलचे रिपेरिंग सुरु केलं. भावासोबत ‘किर्लोस्कर ब्रदर्स’ अशी कंपनी त्यांनी चालू केली. या कंपनीच्या माध्यमातून परदेशातून पवनचक्क्या आणूनही विकल्या. लाकडाच्या खिडक्या आणि दरवाजे करून विकले. औंध संस्थानिकांच्या घरातील कुलदैवताच्या मूर्तीला इलेक्ट्रोप्लेटिंगने मुलामा चढवून देण्याचे काम करून दिले.

पुढे शेतकऱ्यांसाठी कृषी यंत्रे बनवण्याचे ठरवले. त्यांचे पहिले यंत्र होते कडबा कापण्याचे. पुढे ओतीव नांगर बनवण्याचे ठरवले. जागा व भांडवल हवं होतं. औंध संस्थानने त्यांना दहा हजार रूपये आणि बत्तीस एकर जमीन देऊ केली. ती जागा म्हणजे संस्थानातील कुंडल या गावाजवळील ओसाड जमीन होती. निवडूंग आणि सराटाचे साम्राज्य असलेल्या त्या जमिनीवर लक्ष्मणरावांनी उभा केलेली उद्योगनगरी आज जगात ओळखली जाते. या उद्योगनगरीचं नाव आहे किर्लोस्करवाडी.

बिहारमध्ये जमशेदपूर मध्ये जमशेद टाटा यांनी जमशेदपूर उभारले होते. त्याप्रमाणे लक्ष्मणरावांनी देखील स्वतःच्या उद्योगांसाठी अशी वसाहत उभारण्याचे ठरवले आणि १९१० मध्ये किर्लोस्करवाडी’चे काम सुरु झाले. हि औद्योगिक वसाहत जमशेदपूरनंतरची देशातील दुसऱ्या क्रमांकाची वसाहत होती.

कारखान्यात जातिभेदाच्या दरी मिटवल्या. अनंत अडचणींचा सामना करत टीम बनत गेली. पाण्याची समस्या होती तर सुरुवातीला रेल्वेच्या लाईन मधील गळतीमधून पाणी आणले जात असे. नंतर एका शेतकऱ्याच्या विहिरीवरून गाडीतून पाणी आणले जाई. त्यांना अनेक मित्रांनी देखील आर्थिक मदत यामध्ये केली. किर्लोस्करवाडीत सुरुवातीला फक्त पाण्याचे पंप बनत. किर्लोस्करांचे पंप इतके लोकप्रिय झाले की, पुढे ‘पंप म्हणजे किर्लोस्करांचे’ अशी ख्याती झाली.

पुढे उत्पादनं वाढत गेली. डिझेल, विजेवर चालणारे पंप, यांत्रिक नांगर, ट्रॅक्टर्सची निर्मिती सुरु झाली. परिसरात शाळा क्रिडांगणे, पोस्ट ऑफिस तयार केले. सर्व सुविधा आल्यावर येथे भरभराट झाली. लक्ष्मणरावांनी रंगाचा देखील कारखाना काढला. १९१८ मध्ये ५ लाख भाग भांडवल असलेल्या या कंपनीची २०१५ मध्ये एकूण भाग भांडवल ९६८४.८ कोटींवर पोहचले.

किर्लोस्कर समूहाने ऊसाचा रस काढण्याचे यंत्र, छिद्र पाडण्याचे मशीन, वीस विविध प्रकारचे नांगर, दहा प्रकारचे हातपंप यांसह चाळीस उत्पादने बनवायला सुरुवात केली. इंग्लंडच्या ऑइल कंपनीबरोबर करार केला. ऑइल इंजिनचे उत्पादन सुरु केले. असा करार करणारी भारतातील पहिली कंपनी. कृषी यंत्रांमुळे किर्लोस्कर नाव शेतकऱ्यांच्या हृदयावर कोरले गेले. १९६९ मध्ये त्यांच्या कार्याची दखल घेऊन भारत सरकारने त्यांच्यावर पोस्टाचे तिकीट काढले होते.

मराठी माणूस देखील मोठा उद्योग करू शकतो हि ख्याती जगभरात पसरवणाऱ्या या उद्योजकाने २६ सप्टेंबर १९५६ ला जगाचा निरोप घेतला. त्यांचे चिरंजीव शंतनुराव देखील शिक्षणानंतर कंपनीच्या कामात उतरले होते.

About Mamun

Check Also

मोठ्या नेत्यांसोबत पंगा घेणारी महिला IPS अधिकारी, २० वर्षात ४० वेळा झाली बदली..

UPSC परिक्षेत पास होऊन IAS IPS होण्याचं अनेकजण स्वप्न बघतात. यामध्ये काहीजण असतात जे चांगली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *