६ जून म्हणजे शिवराज्याभिषेक दिन ! १६७४ साली याच तारखेला आपले शिवाजीराजे छत्रपती बनून ३२ मणांच्या सोनेरी सिंहासनावर आरुढ झाले होते. हा दिवस म्हणजे शेकडो वर्षे परकीयांच्या गुलामीत खितपत पडलेल्या प्रजेसाठी पहिला स्वातंत्र्यदिनच होता. याच दिवसाची आठवण म्हणून शिवप्रेमींकडून दरवर्षी ६ जून या दिवशी किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा सुरु करण्यात आला. आजमितीला हा सोहळा इतका मोठा झालाय की दरवर्षी लाखो शिवप्रेमी या सोहळ्याला हजेरी लावण्यासाठी किल्ले रायगडावर जात असतात.
शिवराज्याभिषेकाच्या दिवशी किल्ले रायगडावर जाणाऱ्या शिवप्रेमींमध्ये एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करत बहुतांश जण पायीच गड चढायला सुरुवात करतात. रायगडाची चढण चढताना घामाघूम झालेले शिवप्रेमी ज्यावेळी अध्येमध्ये विश्रांती घेण्यासाठी थांबतात तेव्हा त्यांच्यात जी चर्चा होते त्यातला एक प्रश्न हमखास कॉमन असतो.
“आज आपल्याला वर चढायला इतका त्रास होतोय, मग महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी त्याकाळी एवढ्या बिकट मार्गावरुन इतके अवाढव्य हत्ती कसे नेले असतील ?” हा प्रश्न तिथेच सोडून शिवप्रेमी पुढचा मार्ग चालायला लागतात. पण या प्रश्नाचे नेमके उत्तर आहे तरी काय हे शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला.
हा प्रश्न केवळ आपल्यालाच पडतो असे नाही. महाराजांच्या राज्याभिषेकाला उपस्थित असणाऱ्या इंग्रजी वकील हेन्री ऑक्झेंडन यालाही हा प्रश्न पडला होता. आपल्या वर्णनामध्ये हेन्री म्हणतो, “आम्ही राजसदरेच्या बाहेर आलो असताना त्यावेळी आम्हाला दरवाजात दोन हत्ती उभे असलेले दिसले. गडाचा मार्ग इतका बिकट होता, तरी हे पशु इथे कसे वर आले असतील याचा आम्हाला तर्कच करवत नव्हता.”
मुळात कुठल्याही राजाच्या राजवाड्याच्या बाहेर उभे असणारे हत्ती हे त्या राज्याच्या आर्थिक संपन्नतेचे प्रतीक मानले जाते. साहजिकच शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाला हत्ती असणारच. पण हत्ती या प्राण्याचा आकारच इतका अवाढव्य असतो की त्याला फूटभरही उडी मारता येत नाही. शिवरायांच्या राज्याभिषेकाला जे हत्ती आणले होते, ते रायगडाचे काम सुरु असतानाच आणण्यात आले होते.
ज्यावेळी ती पिल्ले होती त्यावेळी चाऱ्याचे आमिष दाखवत दाखवत त्यांना गड चढून वर आणण्यात आले आणि नंतर वरच त्यांना सांभाळण्यात आले. पुढे हेच हत्ती मोठे झाले आणि राज्याभिषेक प्रसंगी उपयोगात आणले गेले.