जवळपास ४६ वर्ष सार्वजनिक जीवनात राहणाऱ्या दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ना कधी निवडणूक लढली ना कधी एखाद्या राजकीय पदाचा स्वीकार केला. एवढंच काय तर त्यांना योग्य पद्धतीने शिवसेना प्रमुख हे पद देखील मिळालं नव्हतं. पण बाळासाहेब हे महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या राजकारणातील एक असं नाव होतं जे सर्वाना प्रभावित करत असे. महाराष्ट्राच्या राजकारणात आणि खासकरून मुंबईत तर त्यांचा जास्त प्रभाव होता.
त्यांचा राजकीय प्रवास देखील खूप आगळावेगळा होता. एक व्यंगचित्रकार असलेले बाळासाहेब एका वर्तमानपत्रात नोकरी करायचे. पुढे नोकरी सोडली आणि १९६६ साली मराठी माणसाच्या हक्कासाठी शिवसेना या संघटनेची स्थापना केली. दक्षिण भारतीय लोक तेव्हा मुंबईत येऊन मराठी माणसांच्या नोकऱ्या मिळवायचे. याविरुद्ध बाळासाहेबांनी मोठं आंदोलन छेडलं होतं.
शिवसेना अशाच वेगवेगळ्या आंदोलनातून वाढत गेली आणि मराठी माणसांच्या हक्काची बनत गेली. सुरुवातीला महानगरपालिकेत वजन वाढलं. मुंबई आणि परिसरात शिवसेनेचं वजन वाढलं पण म्हणावं तसं यश राज्यात मिळत नव्हतं. बाळासाहेब ठाकरे हे ८०-९० च्या दशकात खूप वेगाने प्रसिद्ध झाले. कारण त्यांनी हातात घेतला होता हिंदुत्वाचा मुद्दा. ते एक कट्टर हिंदुत्ववादी नेते होते.
८० च्या दशकात शिवसेना एक मोठा राजकीय पक्ष म्हणून उदयास आला. पुढे शिवसेनेचं वजन अधिकच वाढत गेलं आणि शिवसेनेची १९९५ ला भाजपसोबत राज्यात पहिल्यांदा सत्ता आली. बाळासाहेब हे या सत्तेचे शिल्पकार होते. बाळासाहेबांनी त्यावेळी एक अशी गोष्ट केली होती जी आजपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणात कुणी करू शकलं नाही. बाळासाहेबांनी एकदाच नाही तर अनेकदा ती गोष्ट केली आहे. जाणून घेऊया ती गोष्ट सविस्तर..
मुंबईपाठोपाठ शिवसेनेचं वजन राज्यात सर्वत्र वाढलं होतं. शिवसेनेने स्वतः असे अनेक राजकीय नेते घडवले जे शिवसेनेच्या वाढीत महत्वपूर्ण ठरले. त्यापैकीच एक म्हणजे एका सामान्य कुटुंबात जन्मलेले औरंगाबादचे ४ वेळा खासदार राहिलेले आणि राज्यात मंत्री राहिलेले चंद्रकांत खैरे. चंद्रकांत खैरे यांच्या मागे औरंगाबादेत त्यांच्या जातीची २-३ हजार मते देखील नाहीत. पण बाळासाहेबांचं हेच वैशिष्ट्य होतं. ते कधी कुणाची जात बघत नसत. त्यांनी फक्त कर्तृत्व बघून नेते मोठे केले.
बाळासाहेबांनी अशी मोठी केलेली अनेक उदाहरण आज आहेत. बाळासाहेबांनी मराठी माणसाकडे बघताना कधी कुणाची जात बघितली नाही तर नेहमीच कर्तृत्व बघितलं. अजून एक उदाहरण म्हणजे कट्टर हिंदुत्ववादी ओळख असलेल्या बाळासाहेबांनी साबीर शेख या मुस्लिम नेत्याला देखील शिवसेनेकडून मंत्री केलं होतं. बाळासाहेबांच्या समोर कधीच जात धर्म आडवं आलं नाही. आज मात्र एखाद्याला तिकीट द्यायचं म्हंटलं तर आधी जातीय समीकरणं लक्षात घेतली जातात. त्यानंतरच त्या व्यक्तीला तिकीट दिलं जातं.
बाळासाहेब ठाकरे हे एकमेव राजकीय होते ज्यांनी अशा अनेक व्यक्तींना त्याच्या मागे कुठलाही मोठा जनाधार नसताना मोठं केलं. अल्पसंख्याक असलेल्या बुरूड समाजातील (वीरशैव लिंगायत) एका सर्व सामान्य कुटुंबात जन्मलेले चंद्रकांत खैरे एका कंपनीमध्ये कामगार होते. शिवसेनेत सुरुवातीपासून जोडल्या गेलेल्या खैरेंना बाळासाहेबांनी आमदारकी, खासदारकी आणि मंत्रिपद देखील दिलं.