राज्यात कोरोनाने मागील महिनाभरात हाहाकार उडाला होता. ५ एप्रिलपासून राज्यात सरकारने कडक निर्बंध लावले. त्यानंतर यामध्ये बदल करत १४ एप्रिलपासून हे निर्बंध अधिक कडक करण्यात आले. कडक निर्बंध करूनही नागरिक रस्त्यावर येत असल्याने अखेर २२ एप्रिलपासून राज्यात कडक लॉकडाऊन लावण्यात आला. यामध्ये जिल्ह्यांतर्गत प्रवासास देखील बंदी घालण्यात आली. तर इ पास देखील पुन्हा लागू करण्यात आली. तसेच लोकल आणि बससेवा देखील सर्वसामान्यांसाठी बंद करण्यात आली. राज्यात लागू करण्यात आलेला लॉकडाऊन ४ दिवसानंतर म्हणजे १ मे ला संपणार आहे.
१ मे नंतर राज्यात लॉकडाऊन राहणार का नाही यावरून सध्या चर्चा सुरु झाल्या आहेत. राज्यातील कोरोना रुग्णांची मागील ३-४ दिवसातील वाढ घटली असली तरी राज्यातील परिस्थिती अजूनही गंभीर आहे. ऑक्सिजन बेड, रेमेडिसीवीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा जाणवत असून वैद्यकीय यंत्रणेवर देखील मोठा ताण पडला आहे. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी १ मे नंतर लॉकडाऊनमध्ये १५ दिवसांची वाढ होणार असल्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान आता केंद्र सरकारकडून नवीन गाईडलाईन्स आल्या आहेत ज्यामध्ये लॉकडाऊन लागणार का उठणार याचं उत्तर दडलं आहे.
केंद्र सरकारने २५ एप्रिलला एक पत्रक जारी केलं आहे. राज्य सरकारने लॉकडाऊन लावताना कोणते निकष बघितले पाहिजे हे त्या पत्रकात सांगण्यात आले आहे. या पत्रकानुसार जर राज्य सरकारने निर्णय घेतला तर महाराष्ट्रातील ९ जिल्ह्यात १५ दिवसांचा कडक लॉकडाऊन लावला जाऊ शकतो.
केंद्राच्या निकषानुसार एखाद्या जिल्ह्यात टेस्ट पॉसिटीव्हिटी रेट जर आठवडाभरासाठी १० टक्के किंवा त्याहून अधिक असेल किंवा ऑक्सिजनवर किंवा आयसीयूमध्ये असलेल्यांच प्रमाण ६० टक्क्याहून अधीक असेल तर अशा जिल्ह्यांमध्ये कोरोनाची साखळी तोडण्यासाठी १५ दिवस कडक निर्बंध लावले जाऊ शकतात असे म्हंटले आहे.
या नव्या निकषानुसार कोणत्या जिल्ह्यामध्ये कडक लॉकडाऊन ची स्थिती आहे जाणून घेऊया. या निकषानुसार पुणे जिल्ह्यात पॉसिटीव्हिटी रेट १७.९५ टक्के आहे. म्हणजेच पुण्यात टेस्ट केल्यानंतर १०० पैकी १७.९५ लोक पॉसिटीव्ह येत आहेत. पुणे प्रमाणे अजून ८ जिल्ह्यात हा रेट १० टक्के पेक्षा अधिक आहे. मुंबईत रुग्णसंख्या कमी होत असल्याचे मागील ३-४ दिवसांपासून दिसत आहे. तरीही मुंबई मधील पॉसिटीव्हिटी रेट ११.८६% आहे.
मुंबई पुण्याशिवाय ठाण्यात १२.८१%, नागपूरमध्ये ३१.५२%, चंद्रपूरमध्ये सर्वाधिक ३२%, नाशिक २७.२७%, औरंगाबाद १५.४४%, लातूर १५.०८% आणि बीडमध्ये १२.८५% पॉसिटीव्हिटी रेट आहे. या ९ जिल्ह्यात सर्वाधिक पॉसिटीव्हिटी रेट आहे आणि तो १० टक्के पेक्षा अधिक आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या सूचनेनुसार लॉकडाऊन वाढवला जाऊ शकतो. दरम्यान आता राज्य सरकार या निकषाणूसार या जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन लावते का पूर्ण राज्यात लॉकडाऊन वाढवते याकडे राज्याचं लक्ष आहे.
टास्क फोर्समधील काही सदस्यांच्या मते राज्यातील कोरोना स्थिती पूर्णपणे नियंत्रणात आणण्यासाठी अजून १५ दिवसांचा लॉकडाऊन आवश्यक आहे. राज्य सरकार देखील अजून १५ दिवस कडक लॉकडाऊन साठी सकारात्मक असून एखादा निर्बंध कमी केला जाऊ शकतो. देशातील कोरोनाची परिस्थिती देखील सध्या बिकट असून केंद्र सरकार देखील याविषयी काही नवीन घोषणा करते का हे येत्या काही दिवसात बघावे लागेल.