दिल्लीच्या मालवीय नगर मधील बाबा का ढाबा बद्दल नव्याने काही सांगण्याची गरज नाही. प्रत्येक जण या बाबा का ढाबा ला आणि त्याचे मालक कांता प्रसादला ओळखतच असेल. सोशल मीडियावर या बाबाचा व्हिडीओ खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. युट्युबर गौरव वासन याने हा व्हिडीओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर व्हायरल केला होता.
गौरवने या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं कि लॉकडाऊनमुळे कशाप्रकारे छोटं मोठं काम करून पोट भरणाऱ्यांवर उपासमारीची वेळ येत आहे. या व्हिडिओमध्ये ८० च्या आसपासचे एक वयस्कर कुटुंब होते जे एक छोटीशी टपरीमध्ये हॉटेल चालवायचे. या बाबा का ढाबा मधून रोज ५०० ग्राम तांदळाचा भात देखील विकला जात नव्हता. त्यांनी सकाळी बनवलेला अन्न रात्रीपर्यंत तसंच राहत होतं. कोरोनामुळे कोणीच खायला येत नव्हतं. व्हिडिओमध्ये ढाबा वाले बाबा कांताप्रसाद आपली कहाणी सांगताना खूप रडले होते. त्यानंतर व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता आणि त्यांना मदतीचा ओघ सुरु झाला होता.
मोठ्या बॉलिवूड सेलिब्रिटींनी देखील हा व्हिडीओ शेअर केला होता. सेलिब्रिटींनी लोकांना त्या बाबा का ढाबा वर जाऊन जेवण करायला सांगितलं होतं. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी प्रचंड गर्दी या धाब्यावर केली होती. लोकांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत देखील कांता प्रसाद ला केली होती.
बाबा का ढाबा वाले कांता प्रसाद सध्या काय करतात?
सोशल मीडियातून व्हायरल झालेल्या या दांपत्याने आता मालवीय नगर मध्ये एक रेस्टोरंट उघडलं आहे. नव्या रेस्टोरंटचं नाव देखील बाबा का ढाबा दिलं आहे. अगोदरच्या छोट्या टपरीजवळच हे नवीन रेस्टोरंट उघडलं आहे. जुना ढाबा देखील चालू असून आता कांताप्रसाद हे नव्या रेस्टोरंट मध्ये गल्ल्यावर बसतात. त्यांनी २ शेफ देखील कामाला लावले आहेत.
रेस्टोरंटमध्ये कांता प्रसाद यांना त्यांचे कुटुंबीय आणि सामाजिक कार्यकर्ते तुशंत अदलखा हे रेस्टोरंट चालवण्यास मदत करत आहेत. एका मोठ्या खुर्चीवर बसून आता कांता प्रसाद आपल्या हॉटेलचा कारभार बघणार आहेत. ते खूप खुश असून लोकांच्या प्रेमासाठी आणि मदतीसाठी आभार व्यक्त करतात. या रेस्टोरंट मध्ये भारतीय आणि चायनीज फुड मिळणार आहे. कोविड १९ ने कांताप्रसाद आणि त्यांच्या कुटुंबियांचे आयुष्य तरी शेवटी सुधरवले आहे.
बाबावर झाली होती नंतर मोठी टीका-
या बाबाला प्रसिद्धी देणाऱ्या युट्युबर गौरव वासन याच्यावर बाबाने आर्थिक फसवणूक केल्याचे आरोप केले होते. पोलिसात देखील बाबाने तक्रार दिली होती. पण गौरवने आपण काहीच फसवणूक केली नसल्याचे पुरावे दिल्यानंतर बाबावरच टीकेची झोड उठली होती. गौरवने बाबासाठी आलेले पैसे सर्व त्यांना दिले होते. तरी देखील बाबाने पैसे मिळाले नाही असा आरोप केला होता.
गौरव वासनने डोनेशन आलेले २ लाख कांता प्रसादला दिले होते. पण कांता प्रसादचं म्हणणं होतं कि अजून जास्त पैसे आले आहेत आणि ते गौरवने दिले नाही. गौरवने आपल्या भावाच्या आणि बायकोच्या खात्यात पैसे घेतले म्हणून आरोप केला होता. पण बाबाने स्वतःच्या खात्यात देखील २५ लाख रुपये आल्याचे लपवले होते. हे तेव्हा उघड झाले जेव्हा गौरव त्यांच्या सोबत ७५ हजार रुपये जमा करण्यास बँकेत गेला. पासबुक प्रिंट केल्यानंतर त्यात २५ लाख असल्याचे गौरवला कळले होते. बाबावर पैशाचा मोह लागल्याचा आरोप झाला होता.
काही असो एकेकाळी पोट भरण्यासाठी महाग असलेला बाबा, रोज २००-३०० कमावणारा बाबा आज मालवीय नगरमध्ये स्वतःच हॉटेल टाकून ऐषोआरामचं आयुष्य जगत आहे.