इंग्रजांच्या काळात मुंबईत अनेक इमारती उभारण्यात आल्या. मुंबईतील सर्वात पॉश एरिया मानला जाणाऱ्या मलबार हिल परिसरात राज्यपाल भवन, महाराष्ट्राच्या मंत्र्यांची, प्रमुख सरकारी संस्थांच्या अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांसोबतच अनेक उच्चभ्रू लोकांचे आलिशान बंगले या भागात स्थित आहेत.
इंग्रजांच्या काळात बांधकाम झालेले अनेक बंगले महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात गेले, त्यापैकीच “डग बिगन” हा बंगला आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचे निवासस्थान “वर्षा” या नावाने ओळखला जातो. या वर्ष बंगल्याच्या अगदी समोर एक बंद करण्यात आलेला एक ऐतिहासिक बंगला आहे ज्याची आजच्या बाजारभावाने किंमत ३००० कोटी रुपयांपर्यंत आहे. कोणाचा आहे हा बंगला आणि कशामुळे तो बंद असेल ? हे जाणून घेऊया…
काय आहे या बंद असणाऱ्या बंगल्याचा इतिहास ?
मुख्यमंत्र्यांच्या वर्ष निवासस्थानाशेजारी बंद असणारा हा बंगला पाकिस्तानचे निर्माते मोहम्मद अली जिना यांचा आहे. १९३६ साली जिनांनी हा बंगला बांधला. त्यावेळी त्याला साऊथ कोर्ट या नावाने संबोधले जायचे. जवळपास अडीच एकर जागेवर हा बंगला पसरला आहे. क्लाउड बॅटली नावाच्या इंग्रज वास्तुविशारदाने युरोपियन शैलीत या बंगल्याची डिझाईन तयार केली.
खुद्द जीनांच्या देखरेखीखाली आणि खास इटलीवरुन मागवलेल्या गवंड्यांच्या हातून या बंगल्याचे काम पूर्ण करण्यात आले. अरबी समुद्राच्या दिशेला प्रवेशद्वार असणाऱ्या या बंगल्याच्या कामासाठी इटालियन मार्बल आणि अक्रोडच्या लाकडाचा वापर करण्यात आला होता. त्या काळात या बंगल्याच्या कामासाठी २ लाख रुपये खर्च आला. त्याकाळी भारताचा रुपया आणि अमेरिकेचा डॉलर यांचे मूल्य समान होते यावरुन त्याच्या किंमतीचा अंदाज येईल.
जिनांनी हा बांगला सोडल्यानंतर त्याचे काय झाले ?
जिना यांनी या बंगल्यात जवळपास दहा वर्षे निवास केला. त्यांनी हा बंगला आपल्या बहिणीच्या नावावर केला होता, भारत-पाकिस्तान विभाजनाच्या एक वर्ष आधी म्हणजेच ऑगस्ट १९४६ मध्ये जिना आणि त्यांच्या बहिणीने हा बंगला सोडला आणि ते कराचीला राहायला गेले. स्वातंत्र्यानंतर जिनांनी आपला बंगला युरोपियन दूतावासासाठी देण्याची विनंती केली. नेहरुंनी त्यांची विनंती मान्य केली, पण त्यानंतर अल्पावधीतच जिनांचे निधन झाले आणि त्यांचा बंगला भारत सरकारची मालमत्ता बनली. त्यानंतर १९८१ पर्यंत हा बंगला ब्रिटिश हाय कमिशनला दिला. १९९७ मध्ये भारत सरकारने हा बंगला इंडियन कल्चरल रिलेशन्स काउन्सिलला हस्तांतरित केला.
आजमितीला या बंगल्याची काय स्थिती आहे ?
१९७९ पासून पाकिस्तान जिनांचा बंगला त्यांच्या वाणिज्य दूतावासासाठी मागत आहे, पण भारताने त्यांची मागणी मान्य केली नाही. मुंबईतील एका पारशी उद्योगपतीसोबत लग्न करणाऱ्या जिनांच्या दिना नावाच्या मुलीनेही २००७ साली या प्रॉपर्टीवर आपला हक्क सांगून हायकोर्टात याचिका दाखल केली, पण २०१७ साली तिचा मृत्यू झाला.
आश्चर्याची बाब म्हणजे बलुचिस्तानमधील नेत्यांनीही पाकिस्तानपासून बलूच प्रांत स्वतंत्र करण्यासाठी जिना हाऊस आपल्याला द्यावा अशी मागणी केली. २०१७ मध्ये भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा यांनी हे जिना हाऊस तोडून त्याठिकाणी सांस्कृतिक केंद्र करण्याची मागणी केली. त्यानंतर केंद्रातील सरकारने त्याठिकाणी आंतरराष्ट्रीय केंद्र बनवण्याचा निर्धार केला आहे.