घरची अगदी सामान्य परिस्थिती असलेला एक तरुण. अभ्यासात खूप हुशार. इंजिनिअरिंग पर्यंत कॉलेजचा टॉपर राहिला. शिक्षण झाल्यावर पुण्यात एका आयटी कंपनीमध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळाली. घरी परिस्थिती जेमतेम होती. वडिलांना अवघा २५०० पगार असल्याने त्याला मिळालेली ती पगार कुटुंबासाठी खूप मोठी होती. सर्व काही व्यवस्थित सुरु होतं. पण पुण्यात त्याच्या आयुष्यात एक मुलगी आली. त्याने तिच्यावर जिवापेक्षा प्रेम केलं. पण तिला काही वेगळच हवं असावं. सतत भांडत राहायची. एवढं भांडण वाढलं कि त्याने नोकरी सोडून घर गाठलं. पण ती सतत पगारामुळे हिणवत होती. त्यामुळे त्या लायकी काढणाऱ्या मुलीचा मोठं अधिकारी होऊन बदला घ्यायचं ठरवलं.
अहमदनगर मधील पोखरना कुटुंब. चंद्रकांत पोखरना यांना ४ मुली आणि एक मुलगा. चंद्रकांत यांना असणाऱ्या अडीच हजार पगार संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह चालायचा. एका मुलीने लव्ह मॅरेज केलं. त्यांनी तिचा हा निर्णय मान्य केला पण समाज नाव ठेवत होता. समाजाकडून नातेवाईकांकडून त्यांना टोमणे ऐकावे लागले. मुलगा त्यावेळी १३ वर्षाचा होता. मुलाचे नाव धीरज. धीरज लहान असला तरी त्याला कुटुंबाच्या परिस्थितीची जाण होती. नातेवाईकांचे बोलणे त्याच्या बालमनावर खोलवर परिणाम करत असे.
धीरज शाळेत खूप हुशार होता. दहावीत ९१ टक्के मार्क घेऊन पास झाला. नंतर गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मधून डिप्लोमा केला. तिथंही चांगल्या मार्काने पास झाला. पुण्यात एखाद्या मोठ्या कॉलेजला प्रवेश घेण्याचं त्याच स्वप्न होतं. पण ऑप्शन फॉर्म चुकल्याने नागरमधीलच प्रवरानगर च्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घ्यावा लागला. खूप दुःख झालं पण तो हिम्मत हरला नाही. प्रवरानगरच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये खूप अभ्यास करून तो शेवटच्या वर्षी कॉलेजमधून दुसरा आला. कॅम्पस प्लेसमेंट मधूनच त्याला पुण्याच्या आयटी कंपनीमध्ये नोकरी मिळाली.
एका सामान्य कुटुंबातल्या मुलाला २५ हजार पगाराची नोकरी कॉलेजमधूनच मिळाल्याने सर्व जण खुश होते. धीरज पण खूप खुश होता. सर्वकाही सुरळीत चाललं होतं. पुण्यात आयटी कंपनीत जॉब करताना आयुष्याला कलाटणी मिळाली. एक मुलगी धीरजच्या आयुष्यात आली. कंपनीमधीलच मुलीच्या तो प्रेमात पडला. धीरज प्रेमात अक्षरशः आंधळा झाला. तो कुटुंबाला जॉबला आणि मित्रांना देखील त्या मुलीमुळे वेळ देत नव्हता. पण त्या प्रेमात त्याला दुःख झेलावे लागलं. त्या मुलीसोबत सतत भांडण व्हायला लागलं. वाद एवढे वाढले कि धीरज खचून गेला. त्याने प्रेमासह जॉब देखील सोडण्याचा निर्णय घेतला.
धीरज नगरला घरी आला. घरी कुटुंबाला खोटं सांगितलं कि १५ दिवस सुट्टी घेतली. पण नंतर न राहवून त्याने वडिलांना झालेली सर्व गोष्ट सांगितली. वडिलांनी समजावून सांगितलं. धीरजणे वडिलांना एक वर्षाचा वेळ मागितला. त्यावेळी धीरजचं वय फक्त २३ होतं. मित्रांच्या मार्गदर्शनाने त्याने बँकिंग ची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. तो हुशार असल्याने त्याला वाटलं कि आपण सहज या परीक्षेत यश मिळवू.
धीरजने बँकिंगची तयारी सुरु केली. एक क्लास जॉईन केला. क्लास आणि लायब्ररी मध्ये त्याने दिवसरात्र अभ्यास केला. त्याने SBI क्लार्कची पहिली परीक्षा दिली. पूर्व परीक्षा पास झाला. मेन्सची खूप तयारी केली. पेपरला त्याला थोडा दबाव आल्यासारखं वाटलं. खूप घाम फुटला. पेपरमध्ये काहीच जमलं नाही. त्यामुळे अपयश येणार हे निश्चित होतं. निकालही तसाच आला. सतत टॉपर येणाऱ्या धीरजला पहिल्यांदा अपयश आलं. तो खूप रडला. अपयश सहन होत नव्हतं. जीव द्यावासा वाटत होता. सात महिने निघून गेले. अजून ५ महिन्यात पुन्हा मेहनत करण्याचं ठरवलं.
त्याला ब्रेकअपची आठवण झाली आणि पुन्हा त्या आगीने त्याला पेटून उठवलं. बदला घ्यायचा हे त्याच्या मनात होतं. तो सतत अच्छी मजा आई आणि ठुकराके मेरा प्यार हे २ गाणे ऐकत असे. त्याला हि गाणी खूप बूस्ट देत असत. अभ्यासात हि आग दिसून आली. पुढची न्यू इंडिया अशुरन्स असिस्टंटची परीक्षा रेकॉर्डब्रेक मार्काने पास केली. आठव्या महिन्यात त्याने यश मिळवलं. त्याने मेन्स मध्ये देखील यश मिळवलं. आनंद गगनात मावत नव्हता. न्यू इंडिया अशुरन्स कंपनीमध्ये तो जॉईन झाला. त्या दरम्यान त्याने ४ परीक्षेत यश मिळवलं होतं.
मुंबईत तो जॉईन झाला. सर्व सुरळीत झालं. घरचे देखील खूप खुश होते. पण पुन्हा त्या पुण्यातील एक्स गर्लफ्रेंडचा कॉल आला. ज्या मुलीमुळे तो खचला होता तिचा कॉल आल्याने तो विचारात पडला. तिला कळलं होतं त्याच्या जॉब बद्दल. तिने अभिनंदन न करता पुन्हा हिणवलं. तिने म्हंटले कि पुण्यात देखील तुला २५ हजार पगार होती अन आता या कंपनीत देखील तेवढाच पगार. मग तू काय कमावलं आयुष्यात? तीच बोलणं एवढं टोचलं कि त्याला ते सहनच होत नव्हतं. सरकारी नोकरी मिळून तो दुखी झाला. मग त्याने अशी परीक्षा पास करण्याचं ठरवलं ज्यातून त्या मुलीला उत्तर देता येईल.
धीरजला ती परीक्षा मिळाली. LIC क्लास वन ऑफिसरची ऍड त्याला दिसली. त्वरित फॉर्म भरला. हि परीक्षा पास करून त्या मुलीचा बदला घ्यायचं त्याने ठरवलं. त्याने खूप मेहनत घेऊन परीक्षेची तयारी केली. पूर्व आणि मुख्य परीक्षेत अपेक्षेपेक्षा जास्त मार्क घेऊन यश मिळवलं. मुलाखतीत अडचणी आल्या पण त्याने आपल्या आत्मविश्वासाच्या बळावर त्यात देखील यश मिळवलं. क्लास वन ऑफिसर होत धीरजने त्या मुलीचा बदला तर घेतलाच पण आपल्या आईवडिलांना देखील सुखद धक्का दिला.