शरद पवार हे नाव ५० हुन अधिक वर्षांपासून देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी राहिलं आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात काटेवाडी या गावात गोविंदराव पवार आणि शारदाबाई पवार यांच्या पोटी शरद पवारांचा जन्म झाला. शरद पवारांचे आई वडील हे १९४०-५० च्या काळात सामाजिक कार्यात आणि चळवळीत अग्रणी होते. आई शारदाबाई यांनी ३ वेळा जिल्हा मंडळाची निवडणूक लढवून ती जिंकली देखील होती. पवारांना एकूण ११ भावंडं. सर्वजण उच्चशिक्षित पण पवारांना मात्र जास्त शिक्षणाचा गंध नव्हता. त्यांचं मन तारुण्यातच राजकारणाशी जोडलं गेलं.
सामाजिक चळवळीपासून सुरुवात करत ते १९५८ मध्ये काँग्रेसचे युवक कार्यकर्ते म्हणून राजकारणात उतरले. पवारांच्या कुटुंबात सर्वच जण शेतकरी कामगार पक्षाच्या विचारांचे होते. पवार मात्र काँग्रेसकडे आकर्षित झाले. त्यामुळे बंडाचे गुण तेव्हाच दिसले. १९५६ मध्ये पवारांनी शाळेत गोवामुक्ती सत्याग्रहाला पाठिंबा देण्यासाठी विद्यार्थी मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला त्यांनी मुख्यमंत्र्यांना निमंत्रित केलं होतं. तेव्हा पवारांनी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यासमोर भाषण केलं. जे ऐकून यशवंतराव खूप प्रभावित झाले होते. यशवंतरावांनी त्यांच्यातील राजकारणाचा सुप्त गुण हेरला आणि पवारांना बोलवून घेऊन मार्गदर्शन केले. त्यानंतर अनेकदा पवारांना त्यांनी मुद्दाम भेटायला बोलवून घेतलं. यशवंतरावांचे शिष्य असलेले पवार पुढे त्यांचेच वारसदार बनले.
त्यांनी कमी काळातच आपली छाप पाडली. पवारांकडे २४ व्या वर्षीच युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद आले. १९६७ साली पवारांनी १ ऑगस्ट रोज रणजी क्रिकेटपटू असलेल्या सदू शिंदे यांच्या मुलीशी लग्न केलं. प्रतिभा शिंदे यांच्याशी लग्न केलं त्याच वर्षी पवारांना बारामतीमधून आमदारकीचे तिकीट मिळाले. काँग्रेसकडून निवडणूक लढवत २७ व्या वर्षीच ते आमदार बनले. २ वर्षांनी १९६९ मध्ये काँग्रेसचे विभाजन झाले. त्यावेळी शरद पवारांनी यशवंतरावांसोबत इंदिरा गांधींच्या काँग्रेस आर मध्ये प्रवेश केला. राज्यात वसंतराव नाईक मुख्यमंत्री झाले.
१९७० साली पवारांना पहिल्यांदा वसंतरावांच्या मंत्रिमंडळात मंत्रिपद मिळालं. पुढे शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री झाल्यावर त्यांच्या मंत्रिमंडळात देखील पवारांना गृहखातं मिळालं. १९७७ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा देशात पराभव झाल्यानंतर शंकरराव चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. वसंतदादा पाटील त्यावेळी मुख्यमंत्री झाले. पण तेव्हा राष्ट्रीय काँग्रेसमध्ये पुन्हा फूट पडली आणि पवारांनी यशवंतरावांसोबत काँग्रेस सोडली.
१९७८ मध्ये दोन्ही काँग्रेस वेगळे लढले पण पुन्हा सत्तेसाठी एकत्र आले. पण पवारांनी १२ आमदारांना सोबत घेऊन सरकार पाडलं आणि शेकाप जनता पार्टीचे सरकार राज्यात आले. शरद पवार वयाच्या ३८व्या वर्षीच महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री बनले. शरद पवारांनी कमी वयातच राज्याच्या राजकारणात मोठा दबदबा निर्माण केला होता. त्यांच्या काटेवाडी गावाचे नाव नकाशावर झळकले होते. गावकऱ्यांना देखील त्यांच्या या कार्याचं खूप कौतुक होतं.
काटेवाडी गावात एक हनुमानाचं प्रसिद्ध मंदिर आहे. त्यांच्या राजकारणातील यशामुळे गावकऱ्यांनी पवारांना या मंदिरात अभिषेक घालण्याचा आग्रह केला. गावकऱ्यांच्या आग्रहास्तव पवार अनेक वर्षं या हनुमानाला अभिषेक करत होते. पत्नी प्रतिभा यांच्या आग्रहामुळे पवारांनी एकदा भीमाशंकरला देखील अभिषेक घातला होता. झाले असे कि पवार भीमाशंकर गेस्टहाऊसला झोपलेले असताना त्यांच्या अंगावरून साप गेला. त्यात त्यांना काही इजा झाली नाही. त्यामुळे पत्नीने अभिषेक घालण्याचा आग्रह केला.
शरद पवारांनी ४ वेळा राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषवले आहे. १९८४ साली ते पहिल्यांदा खासदार बनले होते. पण राष्ट्रीय राजकारणात मन न रमल्याने ते पुन्हा राज्यात परतले होते. त्यानंतर पवार पुन्हा १९९१ ला राष्ट्रीय राजकारणात गेले होते. पुढे ते काही वर्ष राज्यात तर नंतर पुन्हा राष्ट्रीय राजकारणात ते गेले. १९९७ साली पवार काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक हरले होते. पवारांनी केंद्रात अनेक महत्वाची मंत्रीपदे भूषवली. त्यांची पंतप्रधान संधी देखील थोडक्यात हुकली होती. शरद पवारांनी क्रिडा क्षेत्रात देखील अनेक मोठे पद भूषवले आहेत. ICC ह्या क्रिकेटच्या सर्वोच्च संस्थेचे देखील ते अध्यक्ष होते.