२८ सप्टेंबर १९५३ च्या नागपूर करारानुसार विदर्भाचा समावेश महाराष्ट्रात झाला. महाराष्ट्रात विदर्भ हा महत्वाचा भाग आहे. पण गेल्या अनेक वर्षांपासून विदर्भ हे वेगळे राज्य व्हावे यासाठी अनेक आंदोलने झाली. मागील अनेक वर्षांपासून हि मागणी आहे. विदर्भात असलेला कापूस, कोळसा आणि वीज हे घटक विदर्भाच्या विकासासाठी पुरेशी असल्याचे विदर्भवाद्यांचे मत आहे.
वेगळ्या विदर्भाच्या मागणीला भाजप पक्षाचा मोठा पाठिंबा आहे. भाजपचे अनेक दिग्गज नेते वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनात आजपर्यंत सहभागी झाले आहेत. यामध्ये माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सुधीर मुनगुंटीवार, राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे या दिग्गजांची नावे सामील आहेत.
वेगळ्या विदर्भाचा आवाज हा भाजपच्या १९९७ च्या राष्ट्रीय अधिवेशनात देखील घुमला होता. याच अधिवेशनात वेगळ्या विदर्भाचा ठराव मंजूर झाला होता. त्यानंतर अनेक राजकीय नेते वेगळ्या विदर्भासाठी मैदानात उतरले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी नितीन गडकरींनी स्वतंत्र विदर्भासाठी हमी दिली होती.
वेगळ्या विदर्भासाठी मार्च २०१० मध्ये सुधीर मुनगुंटीवार यांनी चंद्रपूर येथून आणि देवेंद्र फडणवीस यांनी शेगाव येथून युवा जागर यात्रा देखील काढली होती. नंतर भाजपचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी आणि भाजपचे ३ राज्यांचे मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत नागपुरात विदर्भ जनजागरण यात्रेचा समारोप झाला होता.
वेगळ्या विदर्भाचे फडणवीस किती कट्टर पुरस्कर्ते आहेत याचा प्रत्येय त्यांच्या २००४ च्या एका शपथेवरुन येतो. विदर्भ राज्य समितीचे मुख्य संयोजक राम नेवले यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार २००४ मध्ये देवेंद्र फडणवीसांनी वेगळा विदर्भ झाल्याशिवाय लग्न करणार नसल्याची घोषणा केली होती. पण पुढच्याच वर्षी २००५ मध्ये फडणवीसांनी लग्न केले.
देवेंद्र फडणवीस यांची मित्र शैलेश जोगळेकर यांच्या घरी अमृता रानडे यांच्यासोबत पहिली भेट झाली. त्यावेळी पहिल्या भेटीतच दोघांमध्ये तासभर गप्पा रंगल्या. त्यांनतर देवेंद्रांनी अमृताला “तू काजोल सारखी दिसतेस” असे म्हणून प्रपोज मारला होता. त्यांनतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला.
अमृता या नागपूरमधील डॉ.चारु रानडे आणि नेत्रतज्ञ डॉ.शरद रानडे यांच्या कन्या आहेत. देवेंद्र दुसऱ्या वेळेस आमदार म्हणून निवडून आल्यानंतर मार्च २००५ मध्ये दोघांचे लग्न झाले.