दादा कोंडके हे मराठी मातीला लाभलेले एक दिग्गज कलाकार होते. दादा कोंडके यांनी अनेक वर्ष मराठी माणसांच्या हृदयावर अधिराज्य गाजवलं. त्यांच्यावर महाराष्ट्रातीलच नाही तर देशातील लोक खूप प्रेम करत. त्यांच्या अभिनयात एवढी शक्ती होती कि ते चाहत्याला त्यांच्याकडे ओढून घेत असत. अभिनयसम्राट अशी दादा कोंडके यांची ओळख बनली ती आजही कायम आहे. दादांच्या आयुष्यातील एक असं प्रसंग जाणून घेऊया जेव्हा दादांना घरी सोडवण्यासाठी शिवसैनिकांचा ताफा त्यांच्यासोबत येत असे..
दादा कोंडके हे नाटकांच्या माध्यमातून रंगभूमीत आले. आपल्या अभिनयाच्या बळावर त्यांनी सुरुवातीलाच नाटकांमध्ये धुमाकूळ घातला. त्यावेळी ते वसंत सबनिस लिखीत ‘विच्छा माझी पुरी करा’ काम करत होते. त्यांच्या अभिनयाने हे नाटक धुमाकूळ घालत होते. दादा कोंडके हे नाटकात काम करता करता भालजी पेंढारकरांच्या ‘तांबडी माती’ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात आले. अभिनयाची छाप सोडलेल्या दादांनी चित्रपट निर्मिती करण्याचे ठरवले.
१९७३-७४ चा तो काळ होता. त्याकाळी हिंदी भाषिकांची जास्त चलती असायची. मराठी माणूस हा चित्रपट निर्मिती करायचा खरा पण त्याच्या चित्रपटाना थिएटर मिळत नसत. मराठी बॅनर असलेले चित्रपट थिएटर मालक लावत नसत. कुठलाही अनुभव नसलेले दादा या क्षेत्रात उतरले. पहिलाच सिनेमा बनवला सोंगाड्या. पहिलाच चित्रपट त्यात न पैसा होता न अनुभव. चित्रपट जेव्हा थिएटरला लावायची वेळ आली तेव्हा कोहिनूर या प्रसिद्ध थिएटरच्या मालकाने नकार दिला. हिंदी चित्रपट तीन देवीया त्यांनी लावला होता.
आता दादा कोंडके या हुरहुन्नरी कलाकाराचा पहिलाच चित्रपट सोंगाड्या थिएटर न मिळाल्रयाने खडणार अशी चिन्ह दिसत होती. पण त्याच काळात शिवसेना हि मराठी माणसांच्या हक्कासाठी लढा देणारी संघटना उदयास आली होती. सर्वत्र संघटनेचा बोलबाला दिसत होता. एका व्यंगचित्रकार व्यक्तीने हि शिवसेना सुरु केली होती. त्या व्यक्तीचं नाव बाळासाहेब ठाकरे. दादा कोंडके यांनी बाळासाहेबांना भेटायचं ठरवलं.
मराठी चित्रपट लावण्यास थिएटर मालक नकार देतो म्हणून ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना भेटायला गेले. बाळासाहेबांना आपली अडचण सांगितली. बाळासाहेब यांनी तत्काळ तुम्ही चिंता करू नका मी बंदोबस्त करतो म्हणून सांगितले. बाळासाहेबांनी शिवसैनिकांना आदेश दिला. शिवसैनिकांनी कोहिनूरबाहेर “राडा” घातला. कोहिनूरच्या मालकांना सेनेचा दणका मिळताच ‘सोंगाड्या’ प्रदर्शित त्याने लावला. सोंगाड्या सुपर डुपर हिट्ट ठरला.
दादा कोंडके यांचं वलय त्यानंतर वाढत गेलं. दादांच्या “कामाक्षी प्रॉडक्शन” ह्या चित्रपट निर्मिती कंपनीतर्फे १६ चित्रपट बनवण्यात आले. त्यातले बहुतांश हिट ठरले. पहिल्या चित्रपटाला थिएटर मिळवून दिल्यानंतर दादा कोंडके आणि बाळासाहेब ठाकरे यांची खूप मैत्री झाली. दोघे हळू हळू अत्यंत जिवलग मित्र बनले. अगदी एवढे घट्ट नाते झाले कि बाळासाहेब जेव्हा नाराज असत तेव्हा त्यांच्या खोलीत एकाच माणसाला प्रवेश असे, ते म्हणजे दादा कोंडके.
पुढे दादा कोंडके यांचे शिवसेनेवर प्रेम वाढत गेले. चित्रपटांतून भाषणांतून ते यशवंतराव चव्हाणांपासून ते शंकरराव चव्हाण, शरद पवार यांच्यापर्यंत सर्व नेत्यांची खिल्ली उडवायला लागले. राज्यात युतीचं सरकार आल्यावर बाळासाहेबांनी दादांना कोणते मंत्रिपद पाहिजे अशी विचारणा देखील केली होती. तेव्हा दादांनी बाळासाहेबांना प्रश्न केला तुम्हाला कोणतं पद हवं. तेव्हा बाळासाहेब म्हणाले मी शिवसेनाप्रमुखच राहणार. दादाही म्हणाले मी पण शिवसैनिकच राहणार.
दादा कोंडके अनेकदा शिवसेना उमेदवारांच्या प्रचाराला जात. भाषणात देखील ते अनेकदा डबल मिनिंग बोलायचे. डबल मिनिंग बोलून राजकीय नेत्यांवर टीका करायचे, खिल्ली उडवायचे. त्यामुळे दादांवर कोणी ह ल्ला करू शकत अशी चर्चा होती. या चर्चेमुळे दादांना घरापर्यंत पोहोचविण्यासाठी शिवसैनिकांचा एक ताफाच दादांच्या सोबत असायचा. पाच पन्नास शिवसैनिक जोपर्यंत दादा सुरक्षितपणे घरी पोहोचल्याची खात्री होत नाही तोपर्यंत दादांचा पिच्छा करायचे.