गोपीनाथ मुंडे हे भाजपचे महाष्ट्रातील एक दिग्गज नेते होते. भाजपला महाराष्ट्रात वाढवण्यात गोपीनाथ मुंडे यांचा मोठा वाटा आहे. भाजपच्या सभेला गर्दी खेचणारे वक्ते मुंडे होते. त्यांनी खूप मोठा संघर्ष करून महाराष्ट्रात भाजप पक्ष वाढवला. मुंडेंचे राष्ट्रीय राजकारणात देखील चांगले वजन होते. केंद्रीय मंत्रिपदापर्यंत मजल मारलेल्या मुंडेंना काळाने लवकर हिरावून नेले.
लोकनेते अशी ओळख मिळवलेल्या मुंडेंचा जन्म बीड जिल्ह्यातील नाथ्रा या परळी तालुक्यातील गावात झाला. एका शेतकरी कुटुंबात १२ डिसेंबर १९४९ रोजी त्यांचा जन्म झाला. वडील पांडुरंग मुंडे आणि आई लीलाबाई हे वारकरी आईवडील. अखंड वारी करणारे त्यांचे कुटुंब. मुडेंनी देखील १४ व्या वर्षी पंढरपूरची वारी केली होती.
वडिलांचे अकाली निधन झाल्यानंतर बंधू पंडितअण्णांनी स्वतःचे शिक्षण अर्धवट सोडून गोपीनाथरावांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली. मुंडेंना व्यंकट हे धाकटे बंधू आहेत. गोपीनाथरावांनी प्रमोद महाजन यांच्या बहीण प्रज्ञा यांच्याशी १९७८ ला लग्न केलं. अंबाजोगाईत हे लग्न झालं. गोपीनाथरावांना पंकजा, प्रीतम आणि यशश्री या ३ मुली आहेत.
गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन या जोडीने भाजपची पाळेमुळे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात घट्ट रुजवली. मुंडेंची राजकीय कारकीर्द १८७८ मध्ये अंबाजोगाई तालुक्यातील उजनी गटातून जिल्हा परिषद निवडणुकीपासून झाली. १९८० मध्ये रेणापूर मधून ते पहिल्यांदा आमदार बनले. १९९०, १९९५ मध्ये ते येथूनच आमदार बनले. १९८०-८२ मध्ये ते युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष बनले. भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष पद त्यांनी भूषवलं. राज्यात युतीच्या सत्तेत ते उपमुख्यमंत्री होते.
२००९ मध्ये मुंडे लोकसभेवर पहिल्यांदा निवडून गेले. २०१४ मध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर त्यांना केंद्रात कॅबिनेट मंत्रिपद मिळालं. पण शपथ घेतल्यानंतर ९ दिवसांनीच ३ जून २०१४ रोजी नवी दिल्ली येथे रस्ते अपघातात त्यांचं निधन झालं.
‘जब प्यार किया तो डरना क्या’
१९९५ साली गोपीनाथ मुंडेंनी काँग्रेस सरकार विरुद्ध महाराष्ट्रभर रान पेटवलं होतं. मुंडेंनी काढलेल्या संघर्ष यात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला होता. १९९५ साली शिवसेना भाजप युतीची राज्यात सत्ता आली. गोपीनाथ मुंडेंना सत्तेचा शिल्पकार मानलं जायचं. त्यामुळेच मुंडेंना सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद मिळालं. तसेच ग्रहखात्याची देखील जबाबदारी त्यांच्याकडेच होती. त्यामुळे बऱ्याचदा जास्त टिकेचा सामना त्यांना करावा लागे.
१९९६ मध्ये जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी एक प्रकरण बाहेर काढलं. मुंडेंनी सरकारी पदाचा गैरवापर करून बरखा पाटील नावाच्या एका लावणी कलाकारास पुण्यात फ्लॅट दिला असल्याचा त्यांनी आरोप केला. गोपीनाथ मुंडे यांचं नाव एका महिलेशी जोडले गेल्याने खूप चर्चा त्यावेळी सुरु झाल्या. मुंडे आणि बरखा यांचं नातं काय याविषयी चर्चा सुरु झाल्या.
चौफुल्याच्या बरखा पाटील यांना गोपीनाथ यांच्यापासून एक मुलगा असल्याचा आरोप देखील त्यावेळी मुंडेंवर झाला. गोपीनाथ मुंडेंनी नंतर खुलासे केले, आपली बाजू मांडली. पण प्रकरणाची झाली आणि मुंडेंना प्रचंड राजकीय त्रास यामुळे सहन करावा लागला. पुन्हा काही दिवसांनी लातूरच्या एका वृत्तपत्रात मुलीचा दाखल घेऊन एक बातमी प्रसिद्ध झाली.
शीतल गोपीनाथ मुंडे असं मुलीचं नाव होतं. या मुलीचा मुंडेंशी काय संबंध आहे अशा चर्चा सुरु झाल्या. बरखा प्रकरणामुळे मुंडेंच्या व्यक्तिगत आयुष्याची मोठी चर्चा त्यावेळी झाली. गोपीनाथ मुंडे यांच्या राजीनाम्याची चर्चा त्यावेळी खूप मोठ्या प्रमाणात सुरु होती. त्याच दरम्यान बाळासाहेब ठाकरेंनी मात्र मुंडेंची पाठराखण केली होती.
शिवसेना आणि भाजप सत्तेत होतं. बाळासाहेब आणि गोपीनाथ मुंडे एका सभेत एकत्र आले होते. तिथे देखील गोपीनाथ मुंडेंच्या राजीनाम्याची कुकबुज सुरु होती. बाळासाहेबांनी भाषणात गोपीनाथरावांकडे बघून म्हंटलं होतं, गोपीनाथराव ‘जब प्यार किया तो डरना क्या’. ठाकरे शैलीतील या वक्तव्याने खूप चर्चा त्यावेळी झाली होती. कोणी म्हणत होते बाळासाहेबांनी पाठराखण केली, तर कोणी म्हणत होते बाळासाहेबांनी सांगितलं या प्रकरणाला जास्त महत्व देण्याचे कारण नाही.
गोपीनाथ मुंडे बाळासाहेबांचं वक्तव्य ऐकून हसले होते. पण बाळासाहेबांच्या या वक्तव्यानंतर हे प्रकरण जास्त चर्चेत राहीलं नाही. त्यावेळी सामनाच्या अग्रलेखाची हेडिंग आली होती, ‘प्यार किया तो डरना क्या’.