सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील बोरी या छोटाशा खेडेगावात एका शेतकरी कुटुंबात तिचा जन्म झाला. खंडाळा तालुका हा कायमच दुष्काळी पट्टा. बोरीमधील नानासाहेब धायगुडे हे पोलीस दलात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत. त्यांनी आपल्या मुलीला मुलांप्रमाणे शिक्षण दिलं. मुलापेक्षा जास्त मुलीच्या शिक्षणाला नानासाहेबांनी महत्व दिलं. तेव्हा सर्व गाव मुलीला कशाला शिकवताय म्हणत होता. पण त्याच मुलीने वयाच्या २३ व्या वर्षी कलेक्टर होऊन नानासाहेबांचेच नाही तर गावाचे तालुक्याचे नाव देशात पोहचवले आहे.
या तरुण कलेक्टरचे नाव आहे स्नेहल नानासाहेब धायगुडे. अपार मेहनत आणि जिद्दीच्या बळावर स्पर्धा परीक्षेची तयारी केलेल्या स्नेहलने पहिल्याच प्रयत्नात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत देशात १०८ वी रँक मिळवून कलेक्टर होण्याचा बहुमान मिळवला आहे. वडील हवालदार आणि आई शेती बघून घर सांभाळणारी. स्नेहलने एवढ्या कमी वयात हे यश मिळवले खरे पण त्यामागे तिचा मोठा संघर्ष आहे. जाणून घेऊया तिचा इथपर्यंतचा प्रवास..
बोरी या गावात स्नेहालचा जन्म झाला. १२ वी शिकलेले वडील पोलीस दलात कॉन्स्टेबल तर आईचं फक्त सातवीपर्यंत शिक्षण झालेलं. स्नेहल, तिचे आई वडील आणि भाऊ असं छोटंसं त्यांचं कुटुंब. स्नेहलने शिकावं यासाठी आईवडील नेहमी आग्रही होते. तिच्या बहीण भावांचे २०-२२ व्या वर्षी लग्न देखील झाले. स्नेहलवर देखील लग्न करावं म्हणून दबाव होता. कुटुंबातील इतर सदस्य देखील आता शिक्षण बस झालं या विचाराचे होते. मुलगी शिकून काय दिवे लावणार असे त्यांना वाटायचे.
गावातील ह्याच वातावरणामुळे स्नेहलला आईवडिलांनी आठवीतच हॉस्टेलला टाकले. शारदाबाई पवार शारदनिकेतन बारामती येथेच तिचं आठवी ते बारावी शिक्षण झालं. स्नेहल होस्टेलला गेल्यावर देखील बरेच जण बोलले ती मुलगी आहे तिला कशाला शिकवताय मुलाला शिकवा.
स्नेहलला नेहमीच त्यांनी स्वातंत्र्य दिलं. अगदी एका खेड्यातील असताना ती दुसऱ्या राज्यात कॅम्पला जाण्यासाठी वडिलांना आदल्या रात्री जातेय म्हणून सांगायची. अन वडीलही परवानगी द्यायचे. पूर्ण विश्वास त्यांनी स्नेहलवर टाकला होता. स्नेहलने जेव्हा बारावीनंतर बीएस्सी ऍग्रीला ऍडमिशन घेतलं त्यावेळी तिला अनेकांकडून ऐकावं लागलं. अनेकजण म्हणायचे तू हुशार होती तर मग ऍग्री कशी घेतली.
इंजिनिअर डॉक्टर न होता ऍग्री करून का हि शेती करणार आहे का असं देखील लोक म्हणायला लागले. स्नेहलने ऍग्रीला प्रवेश घेतल्यानंतर यूपीएससीच्या अभ्यासाला सुरुवात केली. पण ती नुकतंच एका खेड्यातून आल्याने आत्मविश्वास कमी होता. सोबत इंग्लिशची देखील बोलण्याची अडचण होती. त्यावेळी तिलाही न्यूनगंड यायचा आणि तिला वाटायचं आपल्याला आता खरंच जमेल का?
तिने थोडं मनाला खाल्लं पण जिद्द काही सोडली नाही. तिने आधी इंग्लिश बोलण्याचा निर्धार केला. सुरुवातीला इंग्लिश बोललं कि लोक हसायचे. बोलताना चुका व्हायच्या. पण तिने ते चांगलं म्हणून घेतलं आणि अजून जास्त मेहनत घेतली. स्नेहलला तेव्हा नाव ठेवणारी आणि तू हे करू शकत नाही म्हणणारी लोकं भेटली पण सोबतच तिला प्रोत्साहन देणारी देखील अनेक लोकं भेटली.
पुण्यातच ऍग्री करताना तिने सेकण्ड इअरला युनिक अकॅडमीला प्रवेश घेतला. शनिवार रविवार कॉलेजला सुट्टी असताना क्लास केले. तिला सुरुवातीला काही समजायचं नाही. पण करायचंच असं मनाशी ठरवलं होतं. तिने खूप मेहनत घेतली. ऍग्रीला गॅप पडला. पुढे जोरात तयारी केली. अभ्यासात हुशार होती. पण बोलणं मात्र चांगलं जमायचं नाही. त्यामुळे भीती वाटायची. स्नेहल ५-१२ वी पर्यंत मल्लखांब देखील खेळत होती. स्नेहलने २२ व्या वर्षी परीक्षा दिली आणि २३ व्या वर्षी ती कलेक्टर झाली.