ग्रामीण भागातील शेतकऱ्याचा एक मुलगा, वडील चौथी शिकलेले, आई दुसरी शिकलेली, गाव अगदी छोटं, लहानपणी जिल्हा परिषद मध्ये शिकला, नदीला जाऊन मासे पकडले. घरी आल्यानंतर म्हशीच्या धारा काढल्या. अगदी शेतकऱ्याच्या मुलांसारखे सर्व बालपण गेले. पण मनात निश्चय केला आणि तो मुलगा आयपीएस झाला.
हा मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून महाराष्ट्राला मिळालेला एक तडफदार अधिकारी विश्वास नांगरे पाटील आहे. आजकाल हजारो तरुण तरुणी विश्वास नांगरे पाटील यांची प्रेरणा घेऊन स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. विश्वास नांगरे पाटील हे महाराष्ट्राचे डॅशिंग आयपीएस आणि तरुणांसाठी आदर्श व्यक्तिमत्व आहेत. त्यांनी कष्ट आणि जिद्दीच्या बळावर जे यश मिळवले आहे ते शेतकऱ्यांच्या मुलांसाठी खास प्रेरणादायी आहे.
विश्वास नांगरे पाटील यांचा जन्म जन्म बत्तीस शिराळा तालुक्यातील कोकरूड या छोट्याशा गावी झाला. कोकरूड हे गाव वारणा नदीच्या काठावर व सह्याद्रीच्या कुशीत आहे. वडील नावाजलेले पैलवान व गावचे सरपंच होते. वडील पैलवान असल्याने साहजिकच त्यांना मुलगा देखील पैलवान व्हावा असे वाटायचे. विश्वासरावांनी शाळेत न जात तालमीत जावे असे वडिलांना सुरुवातीला वाटायचे.
विश्वास नांगरे पाटील हे शाळेत जायला लागले. गावातील जिल्हा परिषद शाळेतच त्यांचं शिक्षण सुरु होतं. वडील सरपंच आणि पैलवान असल्याने शाळेत त्यांचा वेगळा धाक असायचा. शिक्षण कोणीही कधी काही बोलायचे नाही. पण एका शिक्षिकेने मात्र एके दिवशी विश्वास कोण आहे हे काही न बघता सरळ त्याच्या २ कानशिलात लगावल्या आणि स्वतःच अस्तित्व निर्माण कर असं सांगितलं. तीच गोष्ट विश्वासरावांच्या मनाला लागली. घरी गेले वडिलांना सांगितले मला वेगळं काही करायचं आहे मी शाळेत जाणार नाही.
त्यांनी शाळेत जाणार नाही असा हट्टच धरला त्यामुळे वडिलांनी त्यांना समजावले आणि तालुक्याला शाळेत पाठवतो असे सांगितले. तेव्हा शिराळ्यातील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये जाण्यासाठी तयार झाले. दीड तास प्रवास करून बसने शाळेत जायला लागले. वडिलांना शाळेत अजिबात यायचं नाही असं बजावलं. पण प्रवासात बराच वेळ जात होता. गायकवाड म्हणून एक शिक्षक होते त्यांच्या हे लक्षात आलं. तेव्हा विश्वास दहावीत होते. गायकवाड सरानी त्यांना आपल्या घरी राहायला ये सांगितले.
गायकवाड सरांकडे विश्वास राहायला गेला. सर पहाटे ३ ला उठून व्यायाम करायचे. विश्वासला देखील उठवायला सरांनी सुरुवात केली. पहाटे ३ वाजताच त्यांना गार पाण्याने अंघोळ करावी लागे. नंतर ३.३० ते ८.३० असा पाच तास रोज ते अभ्यास करू लागले. सकाळी चार तास, दुपारी चार तास आणि संध्याकाळी चार तास असा अभ्यासाचा टाईमटेबल ठरवून ते अभ्यास करू लागले.
यामुळे दहावीत ८८ टक्के मार्क घेत ते तालुक्यात पहिले आले. हुशार असल्याने त्यांना सर्वजण बोलले सायन्सला ऍडमिशन घ्या. ऍडमिशन घेतलं. त्यावेळी इलेकट्रोनिक्स इंजिनिअरचं खूप फॅड होतं. म्हणून त्यांनी इलेकट्रोनिक्स हा विषय पण घेतला. पण पुढे त्यांना सायन्सचे विषय जड वाटू लागले. त्यांना सर्वच अवघड वाटू लागलं. बारावीला असताना भूषण गगराणी यांचं व्याख्यान ऐकलं आणि समजलं कि मराठी विद्यार्थी देखील स्पर्धा परीक्षांत यश मिळवू शकतो.
गगराणी यांचं भाषण ऐकल्यानंतर पहिल्यांदा विश्वास नांगरे पाटील यांना स्पर्धा परीक्षेची माहिती मिळाली. यामधून जिल्हाधिकारी, सचिव, आयुक्त बनता येतं, तसंच ही परीक्षा मराठीत देता येते याची त्यांना पहिल्यांदाच माहिती मिळाली. त्यांनी सायन्समध्ये बारावी करू इंजिनिअर न होता कोल्हापूरला शिवाजी विद्यापीठात बीएला प्रवेश घेतला. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी मुंबईला गेले.
वडील नेहमी पोस्टकार्ड पाठवत असत. या पत्राच्या शेवटी नेहमी भावड्या, माझे डोळे मिटण्याआधी तुला आयएएस अधिकारी होऊन लाल दिव्याच्या गाडीतून आल्याचं पहायचं आहे असं लिहिलेलं असायचं. याच ओळीने त्यांच्या मनात आग पेटवली. आपल्या त्या शेतकरी बापासाठी अभ्यास करायचा, स्वप्न पूर्ण करायचं हे लहानपणीच विश्वास नांगरे पाटील यांनी ठरवलं होतं.
१९९५ रोजी विश्वास नांगरे पाटील एमपीएससीच्या मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाले. पण मुलाखतीत त्यांना २१ वय असल्याने खूप तरुण असल्याचं सांगत लगेचच बाहेर पाठवून देण्यात आलं. लेखी परीक्षेत विश्वास नांगरे पाटील यांना ५३० मार्क होते. पण मुलाखतीत फक्त ७० मार्क दिले होते. विश्वास नांगरे पाटील यांना एकही पोस्ट मिळाली नव्हती.
१९९६ ला त्यांनी हार देखील मानली होती. एमए करुन शिक्षक होण्याचं विश्वास नांगरे पाटील यांनी ठरवलं होतं. हा त्यांचा प्लान बी होता. पण वडिलांनी त्यांना पुन्हा एकदा जिद्दीने उभं राहण्यास सांगितलं. १९९७ ला पुन्हा एकदा विश्वास नांगरे पाटील यांनी अभ्यास सुरुवात केली. अंबिवली येथे आपल्या आत्त्याकडे राहण्यास आले. रोज सकाळी ३.३० वाजता पहिली ट्रेन पकडून ते सीएसटीला पोहोचत. ग्रंथालयात पोहोचणारे ते पहिले असायचे. दिवसभर तिथे ते अभ्यास करायचे.
१९९७ साली त्यांनी ३ परीक्षा पास केल्या. एमपीएससीमधून उप-जिल्हाधिकारी पद, सेल्स टॅक्समध्येही इन्स्पेक्टर म्हणून निवड झाली होती. पीएसआयच्या फिजिकलपर्यंत गेले होते. त्यांनी अखेर आयपीएस पद देखील मिळवलं. विश्वास नांगरे पाटील १९९७ रोजी ३०० पैकी २१० गुण मिळवत महाराष्ट्रात पहिले आले होते.