अशा असंख्य आयुर्वेदिक वनस्पती असतात ज्याबद्दल आपणास खूपदा माहिती मिळत नाही. माहिती न मिळाल्याने त्या वनस्पतीचे फायदे देखील आपणास माहिती नसतात आणि ते वापरात देखील येत नाहीत. अशीच एक हि आयुर्वेदिक वनस्पती आहे जिचे फायदे तर असंख्य आहेत पण तिच्या बद्दल माहिती मात्र खूप कमी लोकांना असेल.
या वनस्पतीचं नाव आहे अक्कलकारा. अक्कलकाऱ्यास आकारकरभ, अक्कलकरो, आकल्लक, आकरकारा, आकिरकिऱ्हा(अरबी) अशी विविध नावे आहेत. खऱ्या अक्कलकाऱ्याचे लॅटिन नाव ऍनासायक्लस पायरेथ्रम आहे तर खोट्या अक्कलकाऱ्याचे स्पिनॅथस आलेरेसिया हे नाव आहे. खरा अक्कलकारा खासकरून अल्जेरिया आणि आफ्रिकेतील छोट्या देशातून सर्वत्र निर्यात होतो. खोटा अक्कलकारा आकाराने लहान असतो.
खरा अक्कलकारा हे सुकलेले मूळ आहे. हे मूळ साधे करंगळी एवढे जाड ३-४ इंच लांब व निमुळते असते. साल जाड, उदि, खरखरीत व सुरकुतलेली असून त्यावर काळे चमचमीत टिपके असतात. अक्कलकारा चावल्यास जिभेवर विरविर सुटते व उष्णता वाढते. याचा वास थोडा सुगंधी असतो.
तर खोटा अक्कलकारा हे लहान वर्षायू क्षुपची लागवड करतात. याचे दांडे गोल, गुळगुळीत, मांसल व विभक्त असतात. पाने समोरासमोर देठयुक्त, हृदयाकृती, फुलांची बोन्डे एकेरी व लांब देठावर, बोन्ड गोल असते. सर्वच भाग हा तिखट, बोन्ड देखील तोंडात धरल्यास तिखट लागते व विरविरी सुटून तोंडातून लाळ येते.
काय आहेत अक्कलकाऱ्याचे फायदे?
अक्कलकार्याचे मूळ हे उत्तेजक, वातहर, वेदनास्थापन आणि मज्जातंतूस बल्य देणारे आहे. अक्कलकाऱ्याचे थोडेसे चूर्ण सडक्या दातात भरल्यास लाळ पडून जो होणार त्रास किंवा दुःख आहे ते कमी होईल. तोंडदुखीत व दातदुखीत याचा लहानसा तुकडा तोंडात धरावा लागतो.
अक्कलकारा तोंडात धरल्यास जीभ व घसा याला काही त्रास असेल तर तो दूर होण्यास मदत होते. आवाज देखील अक्कलकारा खाल्ल्यानंतर खूप चांगला होतो. गायक मंडळी अक्कलकारा मोठ्या प्रमाणात खात असतात. बोलण्यात असणारे अडथळे देखील हे खाल्ल्यास दूर होतात.