काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांचं मागील रविवारी पुण्यात जहांगीर रुग्णालयात उपचार सुरु असताना निधन झालं. राजीव सातव यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांची प्रकृती खूप खालावत गेली. ते २३ दिवस व्हेंटिलेटरवर होते. देशपातळीवर उभरते युवा नेतृत्व म्हणून राजीव सातव यांच्याकडे पाहिलं जायचं. राजीव सातव यांची देशाच्या राजकारणात वेगळी छाप निर्माण झाली होती. काँग्रेसच्या महत्वाच्या शिलेदारांमध्ये त्यांचा समावेश होता. राहुल गांधी यांचे तर ते खूप जवळचे होते. दोघांमध्ये मैत्रीचे संबंध होते.
काँग्रेसचे आणि टीम राहुलचे राजीव सातव हे महत्वाचे शिलेदार होते. त्यांनी गुजरातचे प्रभारी म्हणून पार पडलेली कामगिरी तर त्यांना वेगळ्या उंचीवर घेऊन गेली होती. राजीव सातव गुजरातमध्ये काँग्रेसला सत्तेच्या अगदी जवळ घेऊन गेले होते. राजीव सातव यांना कोरोनाची लागण झाली असली तरी त्यांचं निधन हे कोरोना नंतर झालेल्या दुसऱ्या इन्फेक्शन मधून झालं. राजीव सातव हे कोरोनातून मुक्त देखील झाले होते. पण त्यांना सायटोमेगॅलो व्हायरसची लागण झाली. राजीव सातव यांना गिळलेला हा सायटोमेगॅलो व्हायरस नेमका काय आहे जाणून घेऊया..
सायटोमेगॅलो व्हायरसची ओळख एक संधीसाधू व्हायरस म्हणून आहे. याचं प्रमाण गरोदर महिलांमध्ये जास्त असतं. महिलांची जी TORCH टेस्ट केली जाते त्यात C हा या व्हायरसचा आहे. या व्हायरस मुळे महिलांचा गर्भपात देखील करावा लागतो. खासकरून HIV ग्रस्तांना या व्हायरसची लवकर लागण होते. ज्या रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते त्यांना हा व्हायरस लवकर अटॅक करतो.
या व्हायरसच्या संसर्गामुळे चेहऱ्यावर किंवा तोंडाच्या आतल्या भागात, ओठावर फोड येतात. प्रतिकार शक्ती कमकुवत असल्यास रुग्णाच्या डोळे, फुफ्फुस, यकृत, अन्न नलिका, पोट, आतडे आणि मेंदू सारख्या सर्व अवयवांवर परिणाम होतो. हा व्हायरस एकदा शरीरात प्रवेश केल्यानंतर, बरेच वर्षे टिकून राहू शकतो आणि पुन्हा सक्रिय होऊ शकतो. या व्हायरसचा संसर्ग फुफुसात झाला तर न्यूमोनिया होण्याचा धोका असतो.
हा व्हायरस पसरू देखील शकतो. एखाद्या लागण झालेल्या व्यक्तीच्या लाळ, लघवी यामधून व्हायरसचा संसर्ग होऊ शकतो. या व्हायरसची प्रामुख्याने ३ लक्षणं आहेत. एरवी जशी आपल्याला ताप येते तशीच यामध्ये ताप येते. प्रचंड डोकेदुखी आणि विकनेस येणे हे या आजाराची लक्षणं आहेत. या रोगामध्ये फुफुसामध्ये संसर्ग झाल्यास श्वास घेण्यास अडथळा निर्माण होतो. राजीव सातव याना देखील अशाच प्रकारे या व्हायरसची लक्षणे होती.
सातव हे २३ एप्रिलला जहांगीर रुग्णालयात ऍडमिट झाले होते. २९ एप्रिलला त्यांची तब्येत खालावली. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. १७ दिवसांनी त्यांनी कोरोनावर मात केली. ९ मे ला त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. काही दिवसात डिस्चार्ज होईल असे वाटत असतानाच त्यांची प्रकृती पुन्हा खालावली. त्यांना १५ मे रोजी पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. या सायटोमेगॅलो व्हायरसमुळे त्यांचे शरीरातील विविध अवयव निकामी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.