राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. यामुळे राज्यात स्थिती बिकट झाली असून मुख्यमंत्री ऍक्शन मोडमध्ये आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात काल मंत्रिमंडळातील प्रमुख मंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील व प्रवीण दरेकर यांच्यासोबत ऑनलाईन बैठक घेतली. या बैठकीला राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे हे देखील उपस्थिती होते.
या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात लॉकडाऊन आवश्यक असल्याचं मत व्यक्त केलं होतं. तर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी देखील राज्यात १४ दिवसांचा लॉकडाऊन न लावल्यास परिस्थिती गंभीर बनेल असा इशारा दिला होता. विरोधी पक्षाने देखील लॉकडाऊन लावण्यास पाठिंबा कालच्या बैठकीत दिला होता. सीताराम कुंटे यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना करोना परिस्थीतीचा अहवाल सादर केला. १५ एप्रिल ते २१ एप्रिलपर्यंत परिस्थिती गंभीर होऊ शकते. ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू शकतो. तसंच, राज्यात रेमडेसीव्हीरचा तुटवडा आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले होते.
त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज टास्कफोर्स सोबत बैठक घेऊन निर्णय घेऊ असे म्हंटले होते. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्ससोबत बैठक घेतली. दरम्यान आजच्या बैठकीत टास्क फोर्स ने आरोग्य यंत्रणेवर पडत असलेला ताण आणि रुग्णांची होणारी वाढ बघता राज्यात १४ दिवसांचा लॉकडाऊन आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले आहे.
कालच्याच बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १५ दिवसांचा लॉकडाऊन लावण्याबाबत निर्णय पक्का केल्याचे म्हंटले जात आहे. त्यामुळे आज पुन्हा एकदा टास्क फोर्सने लॉकडाऊन कसा गरजेचा आहे हेच मुख्यमंत्र्यांना सांगितल्याने आता राज्यात लॉकडाऊन निश्चित झाले आहे. आजच्या बैठकीत डॉ तात्याराव लहाने यांनी १४ दिवसांचा लॉकडाऊन कोरोनाची साखळी तोडेल असे मत व्यक्त केले आहे. शिवाय टास्क फोर्स देखील १४ दिवसांच्या लॉकडाउनच्या बाजूने आहे.
लॉकडाऊन हा जवळपास निश्चित झाला असून तो ८ दिवसांचा असावा का १४ यावर चर्चा आहे. दरम्यान लॉकडाऊन हा अचानक न लावता १-२ दिवसांचा वेळ दिला जाणार आहे. त्यामुळे कुठल्याही क्षणी १४ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबात निर्णय घेऊन आज किंवा उद्या हा निर्णय जाहीर करणार आहेत.
महाराष्ट्रात गेल्या नऊ दिवसात म्हणजे एप्रिल महिन्यात आतापर्यंत जवळपास ४ लाख ७५ हजार लोकांना कोरोनाची लागण झालीय. त्यामुले आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण वाढला आहे. कठोर निर्बंध लावूनही रुग्णसंख्या कमी झालेली नाहीये. त्यामुळे आता लॉकडाऊन हाच एक पर्याय राहिला आहे. आता जनतेनेही या लॉकडाऊनला सहकार्य करून रुग्ण संख्या कमी करण्यास मदत करणे अपेक्षित आहे. जवळपास प्रत्येकाने मागील २-३ दिवसात कोरोनाची भीषणता अनुभवली आहे. आता आपल्या कुटुंबियांच्या सुरक्षिततेसाठी या लॉकडाऊनला सहकार्य करणे खूप गरजेचे आहे.