रामदेव बाबा यांच्याबद्दल माहित नाही असा व्यक्ती भारतात क्वचितच सापडेल. पतंजली ब्रँडच्या माध्यमातून भारतातच काय तर विदेशातही त्यांनी आयुर्वेदिक उत्पादने खरेदी करणारा मोठा ग्राहकवर्ग कमवून ठेवला आहे. सुरुवातीच्या काळात शिबिरांच्या माध्यमातून योगाचे महत्व पटवून देणारे रामदेव बाबा आता पतंजलीच्या माध्यमातून आयुर्वेदिक औषधे आणि दैनंदिन घरघुती वस्तूंच्या उत्पादन आणि विक्रीत लक्ष देत आहेत. मध्यंतरी ऍलोपॅथीवर वादग्रस्त वक्तव्य करुन त्यांनी मोठा वाद ओढवून घेतला होता.
आधी ग्राहक जमवले मग उत्पादन केले
मार्केटमध्ये कुठलेही नवीन उत्पादन येणार असेल तर उत्पादकाला प्रचंड खर्च करुन त्या उत्पादनाची वारेमाप जाहिरात करावी लागते, मगच ते उत्पादन लाँच करावे लागते. टीव्ही, वर्तमानपत्रं किंवा सोशल मीडियावर आपण अशा उत्पादनांच्या जाहिराती बघितल्या असतील.
परंतु रामदेवबाबांच्या बाबतीत मात्र हे गणित उलटं आहे. बाबांनी योग शिबिरांच्या माध्यमातून आधी लोकांना आयुर्वेदिक वस्तू वापरण्याप्रती जागरुक केले आणि नंतर लोकांमधून आयुर्वेदिक वस्तूंना मागणी येऊ लागताच पतंजली नावाने आपला स्वदेशी ब्रँड तयार केला.
काय आहे रामदेव बाबांनी लग्न न करण्यामागचे गुपित ?
रामदेव बाबा यांच्यासारखा एवढा श्रीमंत माणूस पण त्यांनी लग्न का केले नसेल असा प्रश्न अनेकांना पडत असेल. त्या प्रश्नाचे उत्तर कौशिक डेका यांनी लिहलेल्या “द बाबा रामदेव फेनोमेनन : फ्रॉम मोक्ष टू मार्केट” या पुस्तकात दिले आहे. या पुस्तकात रामदेव बाबांच्या अनेक गुपितांचा उलगडा करण्यात आलं आहे. रामदेव बाबा ज्यावेळी शाळकरी वयात होते तेव्हा त्यांनी घर सोडले आणि हरियाणामधील खानपूर इथल्या गुरुकुलमध्ये प्रवेश घेतला.
गुरुकुलमध्ये शिक्षण घेत असताना स्वामी दयानंद सरस्वती यांचे “सत्यर्थ प्रकाश” हे पुस्तक त्यांच्या वाचण्यात आले. त्या पुस्तकाचा रामदेव बाबांच्या जीवनावर फार मोठा प्रभाव होता. या पुस्तकात वैदिक धर्मातील तत्वज्ञान सांगण्यात आले आहे. याच पुस्तकात सांगितलेला ब्रह्मचर्याचा नियम रामदेव बाबांनी कटाक्षाने पाळला आणि लग्न न करण्याचा निर्णय घेतला.