रायगड म्हणजे शिवरायांनी लक्ष घालून बांधून घेतलेला गड ! स्वराज्याची राजधानीचा ! या गडाने अनेक ऐतिहासिक घटना पाहिल्या. महाराजांच्या राज्याभिषेकासारखा क्रांतिकारी क्षण या गडाच्या दगडधोंड्यांनी आपल्या नजरेत साठवला आहे. या गडाने परकीय आक्रमकांच्या हल्ले पचवले.
काळाच्या ओघात या गडाच्या भिंती कोसळल्या, इमारती पडल्या. रायगडावर जाणाऱ्या शिवप्रेमींना वाटायचे आपल्याला महाराजांच्या राजधानीचे वैभव परत बघायला मिळणार नाही. परंतु रायगड विकास प्राधिकरण समितीमुळे रायगडचे संवर्धन कार्य सुरु झाले आणि रायगडाला पुन्हा एकदा जुने वैभव मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरु झाले.
रायगडच्या संवर्धनात गाढवांचेही योगदान
छत्रपती शिवाजी महाराजांनी राजधानी रायगडचे बांधकाम केले त्यावेळी असंख्य हातांची सेवा त्यामध्ये लाभली. आता साडेतीनशे वर्षांनंतर त्याच्या संवर्धनाचे काम सुरु झाले आणि त्यात गाढवासारखे मुके प्राणीही योगदान देत आहेत याबाबदल शिवराज्याभिषेकदिनी युवराज संभाजीराजे यांनी त्यांचे आभार मानले. रायगडावर सुरू असलेल्या संवर्धन कामासाठी गडाच्या पायथ्यापासून दगड, विटा, वाळू आणि इतर आवश्यक असणारे अवजड साहित्य आपल्या पाठीवरून वाहून नेण्याचे काम ही गाढवं करत आहेत.
ज्यावेळी रायगडच्या संवर्धनाचा विषय चर्चेत आला त्यावेळी रोपवेद्वारे अवजड वस्तू वाहून नेण्यासाठी प्रचंड खर्च येत होता. शेवटी गाढवांच्या साहाय्याने पाठीवर हे साहित्य वाहून नेण्याचे ठरले. या कामासाठी जवळपास १५० गाढवांचा ताफा तैनात करण्यात आला. गडाच्या पायथ्याला एक तळ करुन त्याठिकाणाहुन साहित्य गाढवांच्या पाठीवर लादून दिली जातात. उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून सकाळी लवकर कंची सुरुवात केली जाते. दिवसात त्यांच्या दोन फेऱ्या केल्या जातात.
कुठून आणली ही गाढवे ?
महाराष्ट्रात प्रामुख्याने ३ ठिकाणी गाढवांचा बाजार भरतो. त्यापैकी जेजुरी येथे पौष पौर्णिमेला भरणारा गाढवांचा बाजार मोठा असतो. दिवाळीच्या दरम्यान व्यापारी लोक गुजरात राज्यात ही गाढवे खरेदी करुन त्यांचा सांभाळ करतात आणि पौष पौर्णिमेला जेजुरीत त्यांची विक्री करतात. त्यापैकी काटेवाड गाढवांना जास्त मागणी असते, कारण ही गाढवे कष्टाची कामे करण्यासाठी वापरली जातात. रायगड किल्ल्यावरील दगड, विटा, वाळू वाहतुकीसाठी याच बाजारातून ७० गाढवे खरेदी करण्यात आली होती.