राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेब ! स्वराज्य संकल्पिका ! दोन छत्रपतींना घडवणाऱ्या स्वराज्यजननी ! ज्यांच्या नावाला आज “जय जिजाऊ” असा अभिवादनपर मूल्य प्राप्त झाले आहे अशा प्रेरणास्थान ! एका सरदाराची पत्नी म्हणून ऐषोआरामाचे जीवन असताना देखील आपले एकंदर आयुष्य इथल्या सर्वसामान्य रयतेची सेवा करण्यात घालवलेल्या या माऊलीचे महाराष्ट्रावर अनंत उपकार आहेत. त्यांच्या जीवनचरित्राकडे पाहिले तर खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या प्राकृतिक भूभागावर त्यांच्या नावाची छाप उमटली आहे.
१) जन्म विदर्भात : राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेबांचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी विदर्भाच्या बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे झाला. लखुजीराव जाधव हे त्यांचे वडील आणि म्हाळसाबाई या त्यांच्या आई होत. जिजाऊंच्या कुटुंबाला देवगिरीच्या यादव घराण्याचा वारसा लाभला होता. त्यांचे वडील लखुजीराजे आणि बंधू दत्ताजी, अचलोजी, राघोजी आणि बहादुरजी हे निजामशाहीत मोठे सरदार होते. अशा शूरवीर घराण्यात मुलगी असूनही जिजाऊंना लहानपणीच शस्त्र आणि शास्त्राचे शिक्षण मिळाले.
२) लग्न मराठवाड्यात : १६०५ साली जिजाऊंचा विवाह मराठवाड्याच्या वेरूळ प्रांतातील शहाजीराजे भोसले यांच्याशी दौलताबाद याठिकाणी झाला. वेरूळचे भोसले घराणे मातब्बर होते. शहाजीराजे हे आदिलशाहीतील प्रमुख सरदार होते. स्वराज्याची प्रेरणा त्यांचीच होती. त्यांना संभाजी आणि शिवाजी ही दोन मुलं. स्वराज्य स्थापनेच्या उदात्त कार्यासाठी थोरला मुलगा संभाजी यांनी शहाजीराजेंसोबत बंगळूरला तर शिवाजी महाराजांनी जिजाऊंसोबत पुण्याला वास्तव्य करुन त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवात केली.
३) कर्तृत्व पश्चिम महाराष्ट्रात : जिजाऊ माँसाहेब बालशिवबाला घेऊन पुण्याला आल्यानंतर त्यांनी शिवरायांना स्वराज्य स्थापनेच्या महान कार्यासाठी घडवले. त्यांना शिक्षण, प्रशिक्षण देऊन पारंगत केले. सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यातील बारा मावळातील देशमुख वतनदारांना स्वराज्य स्थापनेच्या कार्यात सहभागी होऊन बालशिवबाला सहकार्य करण्यासाठी राजी केले.
शिवरायांच्या मनात स्वराज्याची ठिणगी पेटवणाऱ्या जिजाऊच होत्या. महाराजांना मोठमोठ्या मोहिमांसाठी तयार करुन त्यांना स्वतः राज्यकारभार सांभाळला. स्वराज्यातील महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला आळा घालण्यासाठी त्यांनी शिवरायांना आणि मावळ्यांना स्त्री सन्मानाची शिकवण दिली.
४) निधन कोकणात : छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ले रायगडावर राज्याभिषेक सोहळा म्हणजे रयतेसाठी खऱ्या अर्थाने पहिला स्वातंत्र्यदिनच होता. स्वराज्याचे पहिले छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवण्यात जिजाऊ माँसाहेबांचे फार मोठे योगदान होते.
राज्याभिषेकानंतर १७ जून १६७४ रोजी या मातेने कोकणच्या मातीतील पाचाड येथे आपला अंतिम श्वास घेतला. रायगडाच्या पायथ्याला पाचाडमध्ये त्यांची समाधी आहे. खऱ्या अर्थाने विदर्भ ते कोकण हा त्यांचा प्रवास म्हणजे त्यांच्या कर्तृत्वाचा प्रवास आहे.