आयुष्यात यश मिळवायचं असेल तर प्रयत्न करत राहणं खूप महत्वाचं असतं. प्रयत्न केल्यावर कुठेतरी एक आशेचा किरण नक्कीच सापडतो. पण प्रयत्नच नाही केले तर तो मार्ग सापडणार नाही. प्रयत्न केल्यावर यश मिळतं हे दाखवून दिलेलं एक उदाहरण म्हणजे जालना जिल्ह्यातील सेलगावचा रिक्षाचालकाचा मुलगा अन्सार शेख.
अन्सारचा जन्म जालना शहरापासून जवळच असलेल्या शेलगाव मध्ये झाला. अन्सारचे वडील हे रिक्षा चालवायचे तर आई शेतात मजुरी करायची. अन्सार हा लहानपणीपासूनच हुशार होता. त्याला लहांपणीपासूनच काही तरी मोठं करायचं असं वाटायचं. घरी खूप गरिबी होती. कुटुंब एक मागास अल्पसंख्याक कुटुंब होतं. असंच अन्सारच्या वडिलांना देखील कोणी तरी म्हंटलं कि याला कुठे शिकून नोकरी लागणार आहे.
त्यामुळे काही तरी कामाला लावून द्या असं वडिलांना कोणी तरी म्हंटलं. त्यावेळी तो चौथीतच होता. वडिलांनी देखील मनावर घेतलं आणि शाळेत टीसी काढण्यासाठी गेले. तिथे असलेल्या पडूळकर सरानी जेव्हा हे ऐकलं तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. ते अन्सारच्या वडिलांना म्हंटले हा मुलगा खूप हुशार आहे. तो तुमची परिस्थिती बदलून टाकेल. त्यामुळे जेवढं जमेल तेवढं जास्त शिकवा असं सर म्हणाले.
वडील अडाणी होते. आई देखील शिकलेली नव्हती. पण शाळेतल्या शिक्षकांचा सल्ला अडाणी माणसाला लवकर पटतो. त्यांनी अनुसरला शिकवायचं ठरवलं. अन्सारला लहान भाऊ आणि बहिणी होत्या. त्यांना मात्र शिकता आलं नाही. भाऊ १४ व्या वर्षीच शिक्षण सोडून भाऊ एका मामाच्या किराणा दुकानावर कामाला लागला.
अन्सारचे १० वी पर्यंत शिक्षण जिल्हा परिषदच्या शाळेत झाले. त्याला शाळेत खूप चांगले शिक्षक मिळाले. ज्या गोष्टी कुटुंबीय देऊ शकत नव्हते त्या गोष्टी त्याला शाळेतून मिळत होत्या. शिक्षकांचा कधी डब्बा खायला मिळायचा तर कधी खर्चायला पैसे देखील मिळायचे. शिक्षण घेत असताना त्याला अनेक अडचणी देखील येत होत्या.
९ वी पर्यंतच शिक्षण अन्सारने एकाच वहीत घेतलं. त्याच अक्षरही खूप घाण होते. अन्सार दहावी पर्यंत ज्या शाळेत शिकला तिथे कॉप्या चालायच्या. त्यामुळे त्याला ७६ टक्के मार्क मिळाले. ते तेव्हा खूप असायचे. अन्सारला दहावीपर्यंत असं वाटायचं कि कलेक्टर व्हायला निवडणूक होत असावी. त्याबद्दल त्याला काहीच माहिती नव्हतं.
अन्सारला सर्वात आधी एमपीएससी करण्याची प्रेरणा वर्गशिक्षक मापारी सरांकडून मिळाली. ते सर mpsc मधून BDO झाले होते. तेव्हाच अन्सारला वाटलं आपण पण अधिकारी व्हायचं. अन्सार मापारी सरांकडे गेला. अधिकारी कसं व्हायचं विचारपूस केली. सरांनी एमपीएससी ची माहिती दिली. अन्सारला तेव्हा काहीही प्रश्न पडायचे. अगदी त्याने सरांना विचारलं होतं कि अधिकारी व्हायला मग किती पैसे भरले?
तेव्हा सरांकडून त्याला कळलं कि पैसे लागत नाहीत. तुमच्या मेहनतीवर सर्व अवलंबून आहे. पुढे जालन्यात बारवाले कॉलेजला प्रवेश घेतला. १२ वि केली. रिक्षाने कॉलेजला जायचा. वडील १० रुपये जायला यायला द्यायचे. पण रिक्षाचालकांच्या मुलाकडून बाकी रिक्षावाले कधीच पैसे घेत नसत. तेच १० रुपये त्याची पॉकेट मनी असायचे.
अकरावीला एका शिक्षकाकडून यूपीएससी बद्दल कळलं. १२ वीनंतर पुण्याला जायचं म्हणून खूप मेहनत घेऊन अभ्यास केला. अनेकांनी मदतीची घोषणा केली फक्त पण मदत मिळाली नाही. वडील रिक्षा चालवून आणि भाऊ दुकानावर काम करू त्याला पैसे देऊ लागले. अन्सारने १२ वी नंतर पुण्यात फर्ग्युसनला प्रवेश घेतला. फीस भरायला पैसे नसायचे. त्याने ग्रॅज्युएशन सोबतच यूपीएससीची तयारी सुरु केली.
युनिक अकॅडमीच्या सरांना भेटला. फी भरण्याची परिस्थिती नसल्याचे सांगितले. सरांनी देखील त्याला अर्धी फी माफ केली. खूप कमी वयाचा अन्सार जेव्हा क्लासमध्ये जायचा तेव्हा मुलं त्याची मजाक उडवायचे. पण त्याने खूप मेहनत घेतली. पुस्तकांना पैसे नसायचे तर अन्सार मित्रांच्या पुस्तकाच्या फोटोकॉपी करून अभ्यास करायचा. रोज १२-१४ तास अभ्यास केला.
अन्सार जेव्हा पुण्यात होता तेव्हा गावातील लोक खूप काही बोलायचे म्हणून तो जास्त गावात पण यायचा नाही. आला तरी रात्री सर्व झोपलेले असताना यायचा आणि झोपलेले असताना जायचा. अन्सारने पुण्यात असताना एका ब्राम्हण मुलीशी लग्न केली अशी देखील चर्चा होती. त्यामुळे त्याला गावातले लोक बिघडलेला समजायला लागले होते. पण त्याने दुर्लक्ष केलं.
त्याने पहिली पूर्व परीक्षा दिली. पास झाला. पण मुख्य परीक्षेच्या आधी बहिणीच्या पतीचे निधन झाले. त्या धक्क्यातून सावरत खूप अभ्यास केला आणि २०१५ मध्ये वयाच्या २१ व्या वर्षीच अन्सार IAS बनला. अन्सार म्हणतो कि १९ फेब्रुवारी चा तो दिवस कधीच विसरू शकत नाही. शिवजयंती होती. लायब्ररीत अभ्यास करत बसलो होतो. शिवजयंतीचा सगळ्यात मोठं गिफ्ट मिळालं आणि मित्राने कॉल करून तो मुख्य परीक्षा पास झाल्याचे सांगितले.