Monday , June 5 2023
Breaking News
Home / जीवनशैली / रिक्षा चालवली, मेणबत्ती अगरबत्त्या विकल्या, शेतकऱ्याच्या मुलाने उभा केला आज लाखोंचा व्यवसाय

रिक्षा चालवली, मेणबत्ती अगरबत्त्या विकल्या, शेतकऱ्याच्या मुलाने उभा केला आज लाखोंचा व्यवसाय

आपल्याला जर काही तरी करून दाखवायचं असेल तर सर्वप्रथम आपली संकट सोसण्याची मानसिकता असायला हवी. कारण तुम्हाला अभ्यास करून अधिकारी व्हायचं असेल तर तिथंही अनेकदा अपयश येऊ शकतं. तुम्हाला जर एखादा उद्योग उभा करायला असेल, व्यवसाय करायचा असेल तर तिथंही संकट हे येऊच शकतं. त्यासाठी तुम्हाला ते संकट दूर करून अपयशावर मात करून यश मिळवण्याची जिद्द बाळगणे खूप आवश्यक आहे. आज अशा एका व्यावसायिकाला भेटणार आहोत ज्याने असे अनेक संकट झेलून स्वतःचा व्यवसाय मोठा केला.

हा व्यक्ती आहे नाशिकपासून ८-१० किमीवर असलेल्या मुंगसरा गावचा दीपक मुरलीधर भोर. दिपकचा जन्म खूप सामान्य कुटुंबात झाला. वडील शेतकरी असल्याने तशी परिस्थिती बेताचीच होती. दिपकने गावातच ५ वि पर्यंत शिक्षण घेतलं. पुढे काही दिवस मामांकडे राहून शिक्षण घेतलं. कारण घरी राहून त्याला शेतात काम करावं लागलं असतं. अवघी १.५ एकर शेती त्यांना होती. लोकांच्या शेतात पण त्याने आणि भावाने मजुरी केली. अगदी ८-९ वि मध्ये असल्यापासून.

काम करत शिक्षण पूर्ण झालं. पण मोठा भाऊ १० वि आणि दीपक फक्त १२ वि पर्यंत शिकला. दिपकमध्ये काही तरी नवीन करण्याची जिद्द होती. त्याने १०-१२ वि मध्ये असतानाच मेणबत्ती अगरबत्ती बनवण्याचं ट्रेनिंग घेतलं. त्याच्यातून येणाऱ्या पैशातून स्वतःचा खर्च तो करायचा. तेव्हा ते काम करायला भांडवल देखील नसायचं. अगदी २-४०० रुपये मामा मावशींकडून घेऊन तो हे काम करायचा. त्या बनवलेल्या मेणबत्त्या अगरबत्त्या तो घरोघरी जाऊन विकायचा.

दिपकने २ वर्ष रिक्षा देखील चालवली. ९५ मध्ये जेव्हा कॉलेज चालू होतं तेव्हा तो रिक्षा देखील चालवायचा. कॉलेजला जाताना चालवायचा. पुन्हा कॉलेज झाल्यावर देखील तो रिक्षा चालवायचा. त्याच दरम्यान १९९५-९६ मध्ये त्यांनी १०० कोंबड्या घेतल्या होत्या. त्याने त्यासाठी प्रशिक्षण देखील घेतलं. पुढे त्यांनी २-३ हजार भांडवल जमा करून अजून कोंबड्या वाढवल्या. कोंबड्या व्यापाऱ्यांना देण्याऐवजी ते थेट स्वतः कापून विकू लागले. लोक त्यांना नाव ठेवू लागले. पण ते म्हणाले आपला व्यवसाय आपण निवडला आता लाज बाळगायची नाही.

पुढच्या वेळी ५०० पैकी ३५० कोंबड्या आजारामुळे मेल्या. जेवढं भांडवल लावलं होतं ते सर्व बुडालं होतं. त्याकाळी १५-२० हजारच नुकसान खूप होतं. पण त्यांनी हार मानली नाही खचले नाही. पुढे त्यांनी मग पोल्ट्री मध्ये जॉब करण्यासाठी मुलाखत दिली. २ लाख टार्गेट पूर्ण करतो म्हणून सांगितलं. एक वर्षात करतो म्हणून सांगितलं आणि २-३ महिन्यात दिपकने १-१.५ लाख कोंबड्या पोल्ट्री मध्ये वाढवल्या. पुढे लोक म्हणाले तू स्वतः का नाही करत. मग स्वतःची पोल्ट्री टाकण्याचं ठरवलं. घरच्या शेतीत तर द्राक्ष बाग होती. ती मोडून पोल्ट्री टाकायला वडिलांनी विरोध केला. त्यांच्यासोबत भांडण झालं. २-३ महिने बोलले नाहीत.

पोल्ट्री टाकली. गोदरेज सोबत टायअप केलं. पहिली बॅच ३ हजार कोंबड्यांची काढली. नोकरी करत करत काम चालू होतं. पोल्ट्री वाढवण्यासाठी कर्ज काढण्याचं ठरवलं. ३ लाखाची फाईल टाकली पण बँकेनं त्यांना फक्त घुमवलं. वर्षानंतर कर्ज भेटलं. मग ३ पक्षांचे १० हजार पक्षी झाले. पुढं २० हजार पक्षी झाले. स्वतःचा १ गुंठा तरी घ्यावा स्वप्न होतं. साडेतीन एकर घेऊन स्वप्न पूर्ण केलं. २४ तास काम चालू ठेवलं.

बायको भाऊ वाहिनी २४-२४ तास काम करायला लागले. आज १०० पक्षांपासून झालेली सुरुवात ५० हजार पक्षांच्या वर पोहचली आहे. एकेकाळी ३ लाख कर्ज ना देणाऱ्या बँका आज त्यांना १५ दिवसात एक कोटींपर्यंत कर्ज द्यायला तयार असतात. दीपक यांच्या मते कोणत्याही व्यवसायात उतरा फक्त तुमच्यामध्ये मेहनत करण्याची तयारी हवी. जे काम करतोय ते मनापासून करायला हवं. त्यामध्ये पार्ट टाइम न करता स्वतःला २४ तास झोकून द्यायला हवं.

कोणी कितीही आडवं आलं तरी आपण आपली मेहनत चालू ठेवायला हवी. मग यश मिळवण्यापासून आपल्याला कोणीही रोखू शकत नाही. लोकांचं बोलणं सोडून द्या. तुमच्या स्वतःवर विश्वास ठेवा. आपल्या घरातल्यांची मनं ओळखा. यश तुम्हाला निश्चितच मिळतं हेच दीपक यांनी दाखवून दिलं आहे.

About Mamun

Check Also

गरीब विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी नोकरी सोडून केली UPSC ची तयारी, टॉपर येऊन बनली IAS !

यूपीएससी ही देशातील एक अशी स्पर्धा परीक्षा आहे ज्यात दरवर्षी लाखो उमेदवार भाग घेतात. परंतु …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *