अनेकदा रेल्वे रुळावर चालत्या गाडीसमोर येऊन अनेकांना जीव गमवावा लागतो. चालत्या रेल्वे समोर येणारे लोक हे चालकाला दुरूनच दिसत असतात. मग प्रश्न पडतो हे चालक रुळावर गर्दी दिसूनही रेल्वे का थांबवत नसतील? त्यांच्यामध्ये माणुसकी नसते का? त्यांना गाडी थांबवता येत नाही का? यासारखे प्रश्न कधी न कधी तुम्हालाही पडले असतील.
रेल्वेचे ब्रेक कसे काम करतात हा देखील प्रश्न तुम्हाला कधी पडलाच असेल. रस्त्यावर धावणाऱ्या ट्रक बसप्रमाणे रेल्वेला देखील ब्रेक असतात. प्रत्येक डब्याच्या आणि इंजिनच्या चाकांना एअर ब्रेक असतात. हे सर्व चाकांचे ब्रेक एका मुख्य ब्रेक पाईपला जोडलेले असतात. ब्रेकमध्ये हाय प्रेशरने हवा भरलेली असते. नायलॉनच्या छोट्या पाईपने हि हवा ब्रेक शूला जोडली जाते.
या नायलॉन पाईपमधील हवेचा दाब कमी जास्त करून रेल्वेची गती नियंत्रित केली जाते. यासाठी ब्रेक लिव्हर दांड्याचा वापर होतो. ब्रेक शु चाकावर घर्षण करते त्यानंतर रेल्वे थांबायला लागते. रेल्वे मध्ये जी चैन असते ती चैन ओढल्यावर हवेचा दाब कमी होतो आणि अर्जंट ब्रेक लागून रेल्वे थांबते. मग एवढ सगळं असताना चालक समोर गर्दी दिसल्यावर ब्रेक का दाबत नाहीत? जाणून घेऊया यामागची कारणे.
रुळावर अचानक गर्दी दिसली तरी चालक रेल्वे का थांबवत नाही ?
भारतात रेल्वेचा सर्वाधिक वेग हा १६० किमी प्रति तास आहे. पण जास्तीत जास्त गाड्या या १००-१२० च्या स्पीडने चालतात. खरंतर चालकांना रुळावर समोर काही आल्यास इमर्जन्सी ब्रेक दाबण्याचा अधिकार आहे. पण हे ब्रेक दाबल्यानंतर गाडी हि ८००-९०० मीटर लांब जाऊन थांबते. म्हणजेच ब्रेक केल्यावर गाडी जवळपास १ किमी पुढे जाते.
पण बऱ्याचदा चालकाला समोर काही हि आलेलं दिसलं तर ते २००-५०० मीटरवर आल्यावर दिसते. अनेकदा समोर वळण असेल तर समोर काही आलेलं दिसत नाही. या कारणांमुळे चालकाला ब्रेक करण्यास वेळ मिळत नाही. चालक जाणूनबुजून कुणाला चिरडत नाहीत. त्यांना खूप दुरूनच रुळावर काही दिसले तर ते गाडी नक्कीच थांबवतात.
याशिवाय गाडी अचानक ब्रेक केल्यावर कधी कधी डबे रुळावरून खाली उतरण्याचा धोका देखील असतो. यामुळे रेल्वेत असणाऱ्या असंख्य लोकांना धोका निर्माण होऊ शकतो. रेल्वेचा चालक हा नेहमी समोर आलेल्या परिस्थितीनुसार इमर्जन्सी ब्रेक लावत असतो.