प्रत्येकालाच आयुष्यात यशस्वी व्हायचं असतं. पण ते यश मिळवणं एवढं सोपं नसतं कारण आयुष्यात अनेक संकट या यशाच्या मार्गामध्ये बाधा बनून येतात. पण या संकटांवर मात करून जो यशस्वी होतो तोच खरा योद्धा मानला जातो. आज आपण एका अशा व्यक्तीची संघर्षगाथा जाणून घेणार आहोत ज्याचे आयुष्य संकटांनीच भरलेले होते. कारण त्याचे लहानपणीच दोन्ही डोळे गेले. त्यामुळे लोक कुटुंबाला सल्ला देत कि त्याला आश्रमात सोडून या. पण कुटुंबाने मात्र त्याला सांभाळलं, लहानाचं मोठं केलं तोच मुलगा आज IAS अधिकारी बनला आहे. जाणून घेऊ त्याच्या जीवनप्रवास..
हि संघर्षगाथा आहे दोन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या राकेश शर्माची. राकेशने दृष्टिहीन असूनही मोठे अधिकारी होण्याचं स्वप्न बघितलं. आणि फक्त स्वप्न बघितलंच नाही तर ते पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र एक करून ते सत्यात उतरवलं. राकेश हा जेव्हा २ वर्षांचा होता तेव्हाच त्याच्या आयुष्यात संकटांची एंट्री झाली. ते संकट देखील छोटं नव्हतं. ते राकेशच्या डोळे घेऊन गेलं.
जन्माच्या वेळी दोन्ही डोळे चांगले असलेला राकेश २ वर्षाचा असताना औषधीच्या रिऍक्शन मुळे दोन्ही डोळ्यांनी अंध झाला. त्याची स्थिती खूपच खराब झाली होती. त्याची हि स्थिती बघून लोकांनी कुटुंबियांना सल्ला दिला कि त्याला एखाद्या आश्रमात सोडून द्या. पण लोकांचे म्हणणे कुटुंबाने मनावर घेतलं नाही. कुटुंबीयांनी त्याची पूर्ण साथ दिली आणि त्याला लहानच मोठं केलं.
राकेश शर्मा हा मूळचा हरियाणामधील भिवानी जिल्ह्यातील सांवड या छोट्याशा खेडेगावचा आहे. तो मागील १३ वर्षांपासून नोयडा सेक्टर २३ मध्ये स्थायिक झाला आहे. राकेशचं बालपण हे खूप त्रासदायक राहिलं. त्याच्यासमोर अनेक संकटं होती. सामान्य माणसाप्रमाणे जीवन जगणे त्याच्या नशिबात नाही आले. त्याच्या दोन्ही डोळ्यांची नजर जाऊनही त्यांचे कुटुंबीय मात्र मोठ्या धैर्याने आणि आत्मविश्वासाने त्याच्या सांभाळ करत राहिले. ते कधीच तुटले नाही. कुटुंबाने त्याला सामान्य मुलाप्रमाणे वाढवलं आणि त्याची हिंमत ते वाढवत राहिले.
राकेशवर खूप उपचार करण्यात आले पण त्याचा फायदा झाला नाही. राकेश २ वर्षाचा असताना त्याच्या डोळ्यावर गोळ्या औषधींमुळे रिऍक्शन झाली होती. कुटुंबाने खूप प्रयत्न करून उपचार करूनही त्याची नजर काही वापस आणता आली नाही. अनेक ठिकाणी उपचार घेतले पण काहीच फायदा झाला नाही. राकेशच्या त्या रिअक्शन मुळे दोन्ही डोळे पूर्णच निकामी झाले होते. त्याला थोडही दिसत नव्हतं.
पण राकेशमध्ये काही तरी वेगळं करून दाखवण्याची जिद्द होती. दोन्ही डोळे जाऊनही त्याने आपले शिक्षण कधी बंद केले नाही. तो सतत अभ्यास करत असे. राकेश सांगतो कि अनेक प्रयत्न करूनही त्याला सामान्य मुलांच्या शाळेत प्रवेश मिळाला नव्हता. मजबुरीत त्याला अंध मुलांसाठी असलेल्या विशेष शाळेत आपलं शिक्षण घ्यावं लागलं. बारावीपर्यंत असच चालू राहीलं. त्याने ब्रेल लिपीमधून आपलं शिक्षण सुरु ठेवलं.
बारावीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर राकेशने दिल्ली विश्वविद्यालयात प्रवेश घेतला. राकेश शर्माला या विश्वविद्यालयात खूप काही शिकायला मिळालं. तिथं होणाऱ्या ऍक्टिव्हिटी आणि शिक्षण आणि मित्रांच्या प्रोत्साहनामुळे तो जीवनातील अनेक महत्वाचे पैलू फक्त शिकलाच नाही तर त्याच्या मनात काही तरी मोठं करून दाखवण्याची जिद्द देखील निर्माण झाली.
या विश्वविद्यालयात शिक्षण घेतानाच राकेशने यूपीएससी बद्दल ऐकले. त्यानेही यूपीएससी करण्याचं ठरवलं. त्यानंतर त्याने तयारी देखील सुरु केली. राकेशने खूप मेहनत घेतली. त्याच्या मेहनतीचं फळ मिळालं ते २०१८ मध्ये. दोन्ही डोळ्यांनी अंध असलेला राकेश हा यूपीएससी परीक्षेत पास होत IAS बनला. त्याला यूपीएससी मध्ये ६०८ वि रँक मिळाली. राकेशच्या या यशात त्याच्या आईवडिलांचा खूप मोठा हात आहे. राकेश देखील आपल्या या यशाचे श्रेय आईवडिलानाच देतो. खरंच राकेशच्या मेहनतीला आणि अंध असूनही त्याला शिकवून कलेक्टर बनणाऱ्या त्याच्या आई वडिलांना सलाम.