राज्याचे माजी मंत्री राम शिंदे यांच्या मुलीचा मागील महिन्यात विवाहसोहळा पार पडला. पेशाने डॉक्टर असलेल्या आपल्या मुलीसाठी चांगल्या मुलाच्या शोधात असलेल्या राम शिंदेंना कलेक्टर जावाई मिळाला. सोलापूर जिल्ह्यातील IAS श्रीकांत खांडेकर यांच्याशी राम शिंदे यांची मुलगी डॉ. अक्षता शिंदे हीच विवाह सोहळा पार पडला. राम शिंदे हे यूपीएससी मध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यासाठी गेले होते. तेव्हा त्यांच्या हातून श्रीकांतच्या सत्कार झाला. तेव्हाच त्यांनी श्रीकांत मुलीसाठी योग्य असल्याचं मनात ठरवलं. आणि पुढे दोन्ही कुटुंबाच्या उपस्थितीतीत मोठ्या थाटात हा विवाहसोहळा पार पडला.
तुम्ही म्हणाल आता मंत्री राहिलेल्या शिंदेचा जावई म्हणजे एखाद्या मोठ्या कुटुंबातील मुलगा असेल. तर तसं अजिबात नाहीये. श्रीकांत खांडेकर हे अत्यंत गरीब कुटुंबातील असून त्यांनी खूप खडतर प्रवास करून IAS पदापर्यंत मजल मारली आहे. श्रीकांतचा कलेक्टर होण्यापर्यंतचा प्रवास सर्वाना स्तब्ध करणारा आहे. एका शेतकऱ्याचा मुलगा ज्याला लहानपणी चोऱ्यांचा नाद लागला होता. त्या मुलाला बापाने जमीन विकून शिकवलं. तो मुलगा पुढे कलेक्टर श्रीकांत खांडेकर झाला. जाणून घेऊया श्रीकांतच्या संपूर्ण जीवनप्रवास..
श्रीकांत कुंडलिक खांडेकर. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील बावची गावच्या मेंढ्या राखणाऱ्या कुंडलिकरावांचा मुलगा. घरची परिस्थिती अगदी सामान्य आणि बेताचीच. आई वडील दोघेही निरक्षर. वडील लवकर वारल्यामुळे कुंडलिकरावांवर लवकर जबाबदारी आली. त्यामुळे दुसर्यांकडे चाकरी करून गुरे मेंढ्या राखून उदरनिर्वाह करावा लागला. अडाणी असूनही शिक्षणाप्रती मात्र त्यांची तळमळ होती. श्रीकांत हा बालपणी खूप बिघडलेला होता. परिस्थितीमुळे गरजा पूर्ण होत नसत. ३-४ मित्रांनी मिळून अगदी छोट्या छोट्या चोऱ्या केल्या. एकदा तर गल्लीतील दुकानच फोडले. दुकानदाराला हे कळलं. ते घरी आले आणि त्यांना पकडलं.
त्यावेळी आई वडिलांची जी मान शरमेने खाली गेली ते श्रीकांतला पाहावलं नाही. त्यावेळी श्रीकांतला खुप वाईट वाटलं. हे सर्व सोडायचं ठरवलं. त्यावेळी आई दिवसभर शेळ्या राखायची. आई एवढं काम करायची ते देखील त्यांना बघवत नसायचं. ते आईला अगदी भांडे घासण्यापासून सर्व कामामध्ये मदत करायचे. श्रीकांतचं गावातच प्राथमिक शिक्षण त्यावेळी सुरु होतं. पुढे जवळच असलेल्या निंबोणी इंग्लिश स्कूलमध्ये प्रवेश घेतला. तिथं रोज सायकलवर येणं जाणं त्याने केलं. अभ्यास नाही केला तर आई वडिलांना सुख कसं देणार हे प्रश्न त्याला पडायला लागले.
घरातली काम करून, शेतात काम करून क्रिकेट खेळून अभ्यासही प्रचंड केला. श्रीकांत त्यावेळी शेतात रात्री पाणी द्यायला देखील जायचा. अभ्यासाचं फळ परीक्षेत मिळालं आणि दहावीत त्याला ९१ टक्के मार्क मिळाले. गावामध्ये मिरवणूक निघाली. गावकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या. पुढे अकरावी सायन्सला सोलापूरला दयानंद कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. १० वि पर्यंत मराठी मेडीयम असल्याने अकरावीचे वर्ष अवघड गेले. बारावीत खूप मेहनत घेतली. हॉस्टेलला राहत होता. तिथं मेसचा डब्बा पुरत नसे. उपासमार होत असे. मित्रांसोबत बाहेर जाऊन कुठं लग्न आहे का हे ते शोधायचे. लग्नामध्ये जेवून ते पोटाची भूक भागवायचे.
त्यावेळी कलेक्टर बद्दल वाचण्यात आलं. घरच्यांना याविषयी सांगितलं. घरचे म्हणाले त्याला खूप पैसे लागतात. ते आपलं काम नव्हे. यूपीएससी करायचीच या निर्धाराने श्रीकांतने दापोलीच्या कृषी विद्यापीठात कृषी अभियात्रिकीला प्रवेश घेतला. शिक्षण चालू होतं. शेवटचं वर्ष आलं. ३-४ वर्षांपासून दुष्काळ होता. घरची परिस्थिती बिकट झाली होती. श्रीकांतचा निर्धार पक्का होता. गेट परीक्षेत यश मिळवलं. आयआयटी सोडून कलेक्टरच व्हायचं हे मनात पक्के होते. मित्र म्हणाले निर्णय चुकतोय. पण तो मागे हटला नाही.
दिल्लीला तयारीसाठी एका परीक्षेतून नंबर लागला. तिथं एमटेकला प्रवेश घेतला. घरी कर्जाचा डोंगर वाढला होता. त्यावेळी वडिलांनी श्रीकांतला ३ एकर जमीन विकून दिल्लीला पाठवलं. दिल्लीत पुसा इन्स्टिट्यूट मध्ये एमटेक सोडून श्रीकांत पुण्याला आला. हा आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला. एक वर्षात पोस्ट काढायची हा निश्चय केला. पूर्व परीक्षा जवळ आली. ४ तास झोप बाकी अभ्यास असा दिनक्रम होता. तब्येत बिघडली. गोळ्या घेऊन तयारी केली. पूर्व परीक्षेत यश मिळालं.
पुन्हा मुख्य परीक्षेसाठी दिल्लीला श्रीकांत गेला. तिथं अनेक धक्के खाल्ले पण उमेदीने तो लढत राहिला. स्वतःच्या अभ्यासात सुधारणा केल्या. मराठी माध्यमात शिक्षण झाल्याने इंग्लिशची खूप अडचण होत होती. मनात इंग्लिशचा न्यूनगंड होता. शेवटचा प्रयत्न म्हणून सुधारणा केल्या. मॉक टेस्टमध्ये तो स्वतःला सुधारत गेला. श्रीकांतचं सुरुवातीला IFS मध्ये निवड झाली. पण त्याला सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये जायचं होतं. त्याची तो वाट बघत होता. निकाल हाती आला. अपयश आलं. पुन्हा परीक्षा दिली. आता मात्र दबाव जास्त होता. IFS साठी जॉईन व्हायचं होतं. दुसऱ्या प्रयत्नात मात्र श्रीकांतने यश मिळवले.
कोरोनामुळे यूपीएससीचे निकाल लांबणीवर पडले होते. मागील वर्षी ४ ऑगस्टला श्रीकांचा निकाल आला. त्याने आईला फोन केला तेव्हा आई शेतात खुरपत होती. श्रीकांत आईला म्हणाला मी कलेक्टर झालो. आईच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. बारावीत बघितलेले स्वप्न श्रीकांतने पूर्ण केलं होतं. प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यावर कितीही मोठं स्वप्न असलं तर ते पूर्ण होतं हे श्रीकांतने दाखवून दिलं आहे.