एका शेतकरी कुटुंबात जन्मल्यानंतर शिक्षणासाठी मोठा संघर्ष करावा लागतो. खासकरून तिचे वडील शेतकरीही होते म्हणता येणार नाही. कारण त्यांना ८ वर्षांपूर्वी शेतीही नव्हती. या माता पित्याने वडापाव विकून अन भाजीपाला विकून मुलीला शिकवलं आणि तीच मुलगी आज उपजिल्हाधीकारी पदापर्यंत जाऊन पोहचली आहे. ती फक्त उपजिल्हाधीकारीच बनली नाही तर राज्य सेवा परीक्षेत राज्यात मुलींमध्ये पहिली देखील आली. स्वाती हि २०१८ च्या राज्य सेवा परीक्षेत उपजिल्हाधीकारी बनली. १२ वि नंतर ४ वर्ष शिक्षण सुटलेल्या स्वातीचा उपजिल्हाधिकारी पदापर्यंचा प्रवास खूपच प्रेरणादायी आहे..
स्वाती किसन दाभाडे. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील माळवाडी गावची एक सामान्य शेतकऱ्याची मुलगी. स्वातीचे आई वडील या ७-८ वर्षात शेतकरी झाले. कारण त्यांना त्यापूर्वी शेतीही नव्हती. वडील किसन यांची वडापावची गाडी होती. तर आई हि भाजीपाला विकायची. स्वातीचं बालपण वडिलांसोबत त्या वडापावच्या टपरीवरच गेले. स्वाती शाळेतून थेट वडिलांकडे टपरीवर जायची. तिथंच ती आपला शाळेचा अभ्यास देखील करायची. रात्री वडिलांसोबत मग ती घरी जायची.
स्वातीला आपल्या परिस्थितीची जाणीव होती. २०१२-१३ मध्ये किसनरावांनी २ एकर शेती घेतली. ७-८ वर्षातच ते गावातील प्रगतशील शेतकरी म्हणून ओळखले जाऊ लागले आहेत. कारण त्यांनी भाजीपाल्याचे खुप चांगले उत्पन्न आपल्या शेतात घेतले. शेतात पिकवलेला माल ते मार्केटला स्वतः जाऊ विकायचे. त्यांनी स्वातीला मोठे कष्ट करून शिक्षण दिलं.
स्वातीचं प्राथमिक शिक्षण गावातच जिल्हा परिषद शाळेत झालं. पुढे अकरावीला तळेगाव दाभाडे येथे सायन्स मध्ये स्वातीने प्रवेश घेतला. तिच्या डोक्यात इंजिनिअर होण्याचं स्वप्न. बारावीपर्यंत शिक्षण झाल्यावर तिचं शिक्षण बंद पडलं. याला कारण म्हणजे ग्रामीण भागातील मानसिकता. मावळ तालुका पुण्याला लागून असूनही तिथं मुलींना शिक्षण देण्याचे फार महत्व नाहीये. फार फार तर १२ वि पर्यंत मुलींना शिकवलं जातं. स्वातीचं शिक्षण थांबलं पण तिने घरगुती शिकवण्या घ्यायला सुरुवात केली.
पुढे ती एका कोचिंग क्लास मध्ये देखील शिकवायला जाऊ लागली. १२ वि पर्यंत शिकलेली स्वाती तेव्हा ८ वि पर्यंतच्या मुलांना शिकवायची. तिला कोणी शिक्षण विचारलं तर सांगायला तेव्हा संकुचित वाटायचं. २०१२ मध्ये तिच्या आयुष्यात टर्निंग पॉईंट आला. तिला एका क्लासच्या मॅडमनी मोठा आत्मविश्वास दिला कि तू काहीही करू शकते. स्वातीने ग्रॅज्युएशन करण्याचं ठरवलं. पुढे तिने कॉमर्सला प्रवेश घेतला. तेव्हा तिच्या डोक्यात स्पर्धा परीक्षा नव्हत्या. पहिल्याच टर्ममध्ये ती टॉपर आली.
पुढे ती एमकॉम पर्यंत टॉपर राहिली. तिने कॉलेजमध्ये विद्यार्थी युनियनचे पद देखील भूषवले. तिचं व्यक्तिमत्व त्या काळात चांगलं घडत गेलं. प्रत्येक गोष्टीत ती भाग घ्यायची. जुलै २०१५ मध्ये तिची स्पर्धा परीक्षेची सुरुवात झाली. वडिलांच्या मित्रांनी याविषयी माहिती आणि मार्गदर्शन केलं. तेव्हा तिला याविषयी काहीच माहिती नव्हतं. पुण्यात येऊन तिने याविषयी माहिती घेतली. ६ महिने तिचे राज्य सेवा परीक्षेची प्रोसेस जाणून घेण्यातच गेले.
MPSC मधून उपजिल्हाधीकारी बनण्यापूर्वी स्वातीने विविध पदांना गवसणी घातली होती. स्वातीने पूर्वीच्या विविध स्पर्धा परीक्षात मंत्रालय कक्ष अधिकारी, जीएसटी अधिकारी, उत्पादन शुल्क अधिकारी ते नायब तहसीलदार अशा विविधपदांसाठी यश मिळविले होते. उपजिल्हाधिकारीपदावर निवड झालेली ती मावळातील पहिलीच मुलगी आहे. वडापाव विकणारे वडील असोत किंवा भाजीपाला विकून संसाराचा गाडा चालवणारी आई लक्ष्मीबाई असो. स्वातीने कधीच परिस्थितीचा बाऊ केला नाही.
स्वातीच्या मेहनतीचं फळ तिला मिळालं २०१९ मध्ये. तिने ऑगस्ट २०१८ मध्ये दिलेल्या परीक्षेचा निकाल १४ फेब्रुवारी २०१९ रोजी हातात आला. निकालाची पीडीएफ ओपन करताच मोठ्या अक्षरात हायलाईट केलेलं नाव दिसलं. स्वाती किसन दाभाडे मुलींमध्ये राज्यात प्रथम. राज्य सेवा परीक्षेत ९०० पैकी ५३६ गन मिळवत स्वाती हि उपजिल्हाधिकारी बनली. स्वातीच्या या प्रेरणादायी प्रवासास मानाचा मुजरा.