परिस्थितीचे चटके ज्याला बसलेले असतात त्याला यशाचं महत्व वेगळं सांगायची गरज पडत नाही. मनात जिद्द आणली तर कोणत्याही परिस्थितीतून यश मिळवता येते असंख्य उदाहरण आपण आजपर्यंत बघितले आहेत. आज अशाच एका तरुणाची यशोगाथा बघूया ज्याचे वडील शेळ्या चारायचे. हा तरुण आहे जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील कुसुंबे या खेडेगावचा.
कुसुंबे मधील अशोक भास्कर हे १० बाय १० च्या खोलीत राहणारे एक गरीब गृहस्थ. त्यांचे मुले देखील त्यांना काम करून संसाराचा गाडा हाकण्यास मदत करत होते. अशोक यांचा मुलगा राजू हा मात्र अभ्यासात हुशार होता शिवाय त्याला शिक्षणाची आवड देखील खूप होती. कुटुंबाने त्याची हीच आवड बघून त्याला शिकवण्याचं ठरवलं. यासाठी वडिलांनी शेळ्या राखून तर भावांनी रोजंदारी करून त्याच्या शिक्षणाचा खर्च उचलला.
राजुने लहांपणीपासूनच गरिबीचे चटके सहन केल्यामुळे त्याने खूप जीव तोडून मेहनत घेतली. त्यांचं कुटुंब घरकुल मिळालेल्या एका १० बाय १० च्या खोलीत राहायचे. राजुने अभ्यासाला सुरुवात केली. पूर्ण कुटुंबच मजुरी करायचं तर वडील शेळ्या राखायचे. तो गावातल्याच शाळेत होता. गावातल्या शाळेत प्राथमिक आणि माध्यमीक शिक्षण राजुने पूर्ण केलं. इंग्रजी मध्ये तर तो खूपच हुशार होता.
अत्यंत गरीब कुटुंबातून आलेल्या राजुने पोलीस खात्यात जाण्याचा निर्धार केला आणि त्यादृष्टीने प्रयत्न सुरु केले. त्याने अथक प्रयत्न घेऊन पोलीस दलात नोकरी मिळवली. त्याची सुरुवातीला पोलीस हवालदार म्हणून पुणे पोलीस दलात निवड झाली. शाळेत पहिल्या येणाऱ्या राजुने पोलीस प्रशिक्षणात देखील पहिला क्रमांक मिळवला. पोलीस खात्यात नोकरी मिळवल्यानंतर देखील त्याने अधिकारी होण्याचं स्वप्न पाहिलं. अधिकारी पदावर जाण्यासाठी त्याने आपले प्रयत्न सुरु ठेवले.
राजुने स्पर्धा परीक्षांची तयारी आपली नोकरी सांभाळत केली. त्याने नोकरी करत खूप कठोर परिश्रम घेतले. २०१६ MPSC परीक्षेत त्याची संधी अवघ्या २ मार्कानी हुकली. आयुष्यात पहिल्यांदा अपयश मिळाल्याने त्याला खूप बोचत होते पण तो थांबला नाही. २०१७ मध्ये निघालेल्या जाहिरातीत आपण यश मिळवायचच हा ध्यास त्याने धरला. स्वतःला एका खोलीत कोंडून घेऊन त्याने आपला अभ्यास केला.
२०१७ च्या परीक्षेत ३२२ जागांसाठी जाहिरात निघाली होती ज्यामध्ये त्याने यश मिळवलं आणि १०२ वि रँक मिळवली. त्याचे हे यश बघून कुटुंबाला तर आनंदाश्रू अनावर झाले होते. गावातला पहिला PSI तो बनला होता. राजुने साडेपाच वर्ष हवालदार म्हणून नोकरी केली. अखेर तो PSI म्हणून जॉईन झाला. तो जेव्हा हवालदार असताना पेट्रोलींगला जायचा तेव्हा वेळ मिळाला कि तो अभ्यास करत बसायचा. राजू भास्कर सध्या चिंचवड पोलीस स्टेशनला सायबर मध्ये काम करत आहे.