आयपीएलच्या चौदाव्या सिजनमध्ये भारतीय नवोदित खेळाडूंनी चांगली कामगिरी केल्याचं सध्या पहिल्या ५ सामन्यात चित्र आहे. राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्स सामन्यात राजस्थानचा थोडक्यात पराभव झाला. कर्णधार संजू सॅमसनच्या शतकी खेळीच्या बळावर राजस्थान विजयाच्या काठावर गेले होते. पण शेवटच्या चेंडूवर ५ धावांची आवश्यकता असताना सॅमसन बाद झाला. यापूर्वी या सामन्यात पंजाबने धावांचा डोंगर उभा केला. सर्व गोलंदाजांची धुलाई झाली असताना आपल्या आयपीएल करिअरची पहिलीच मॅच खेळणाऱ्या २३ वर्षीय चेतन सकारिया याने ४ ओव्हरमध्ये ३१ धावा देऊन ३ विकेट घेत आपली छाप सोडली. चेतन ज्या परिस्थितीतून आयपीएलपर्यंत पोहचला आहे ते थक्क करणारे आहे. जाणून घेऊया त्याचा जीवनप्रवास..
चेतन सकारिया चा जन्म २८ फेब्रुवारी १९९८ रोजी गुजरातच्या भावनगर मध्ये झाला. चेतनचे वडील हे टेम्पो चालक आहेत. २ वर्षांपूर्वी पर्यंत ते टेम्पो चालवत होते. त्यांच्या घरच्या परिस्थितीचा अंदाज यावरून येतो कि चेतनच्या घरी ३-४ वर्षांपूर्वीपर्यंत टीव्ही नव्हता. टीव्ही घेण्याची देखील त्यांची ऐपत नव्हती. टेम्पोचालक असलेल्या कांजीभाईला मुलगा चेतन क्रिकेट खेळावा हे पसंत नसे.
चेतनचे वडील क्रिकेटला श्रीमंतांचा खेळ आहे असं म्हणायचे. याच वर्षी जानेवारी मध्ये चेतनच्या छोट्या भावाने परिस्थितीमुळे आत्म ह त्या देखील केली. चेतन तेव्हा सैयद मुश्ताक अली रणजी चषकात खेळत होता त्यामुळे त्याला कुटुंबीयांनी याबद्दल सांगितले देखील नव्हते. त्याला घरी पोहचल्यावर याबद्दल समजलं होतं.
घरी टीव्ही नसल्याचे क्रिकेटची आवड असलेला चेतन शेजाऱ्यांकडे किंवा मित्राच्या घरी जाऊन क्रिकेट बघत असे. चेतनने आयुष्यात खूप काही सोसलं आहे. एक वेळ अशी होती कि त्याच्याकडे क्रिकेट खेळण्यासाठी बूट देखील नसायचे. वडिलांचा विरोध असतानाही चेतनने क्रिकेटची प्रॅक्टिस सुरु ठेवली. वडिलांची इच्छा होती कि आपली परिस्थिती गरीब असल्याने चेतनने चांगलं शिक्षण घ्यावं आणि लवकर एखादी नोकरी जॉईन करावी. चेतनच्या एका काकांनी त्याला क्रिकेट खेळण्यास मदत केली. चेतनला त्यांनी आपल्या दुकानावर ठेवून घेतलं आणि त्याचा शिक्षणाचा व खेळण्याचा खर्च उचलला.
चेतनच्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात देखील खूप भावनिक होती. जेव्हा त्याची निवड सौराष्ट्रच्या रणजी टीममध्ये झाली तेव्हा त्याला नेट्समध्ये प्रॅक्टिस करण्यासाठी बूट देखील नव्हते. तिथं त्याला शेल्डन जैक्सन हा युवा फलंदाज भेटला. जॅकसनने बघितलं कि चेतनकडे खेळायला बूट नाहीत. त्याने चेतनला सांगितलं कि तू मला नेट्समध्ये आऊट केलं तर मी तुला बूट देणार. चेतनने जॅकसनला आऊट केलं आणि नंतर त्याला खेळायला बूट मिळाले. शेल्डन जैक्सन आणि चेतन आज खूप चांगले मित्र आहेत.
चेतनने २०१८-१९ च्या सिजनमध्ये आपला रणजी सामन्यात डेब्यू केला. सौराष्ट्र कडून चेतनने १५ फर्स्ट क्लास सामने खेळताना ४१ विकेट घेतल्या आहेत तर १६ टी २० सामन्यात २८ विकेट घेतल्या आहेत. सोबतच त्याने ७ लिस्ट ए सामने खेळले ज्यात १० विकेट घेतल्या आहेत. चेतनच्या जबरदस्त गोलंदाजीच्या बळावर सौराष्ट्रने मागील वर्षी रणजी ट्रॉफी देखील जिंकली होती. त्याच्या कामगिरीमुळे त्याला मागच्या दुबई मध्ये झालेल्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने नेट बॉलर म्हणून संघासोबत नेलं होतं.
नुकत्याच झालेल्या सय्यद मुस्ताक अली ट्रॉफिमध्ये चेतनने खूप चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे त्याचे नाव चर्चेत आले. आयपीलच्या मिनी ऑक्शनमध्ये त्याच्यावर बंगळुरू संघाने सुरुवातीला बोली लावली होती. पण राजस्थान रॉयल्सने बोलीमध्ये बाजी मारली आणि चेतनला १.२० कोटींमध्ये आपल्या संघात खरेदी केलं. २ खोल्यांच्या घरात राहणाऱ्या, टेम्पो चालकाचा मुलगा असलेल्या चेतनने आपली हि किंमत सार्थकी ठरवत पहिल्याच सामन्यात धम्माल उडवून दिली. त्याने मयंक अग्रवाल, केएल राहुल आणि जाय रिचर्डसन या महत्वाच्या विकेट घेतल्या.