सध्या आयपीएलचं १४ वं सीजन सुरु आहे. या सिजनमध्ये अनेक भारतीय नवोदित खेळाडूंनी मैदान गाजवलं आहे. आयपीएलने भारतीय युवा खेळाडूंना चांगलं प्रदर्शन करून भारतीय संघात प्रवेश करण्यासाठी एक मोठा मंच दिला आहे. भारतीय संघात दबदबा निर्माण केलेले जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या हे खेळाडू आयपीएल मुळेच सुरुवातीला चर्चेत आले. त्यांनी जबरदस्त कामगिरी करून भारतीय संघात स्थान मिळवलं आणि तिथे पण संधीच सोनं करत भारतीय टीमचे महत्वाचे शिलेदार बनले. भारतीय संघात अशीच कामगिरी करण्यासाठी अजून एक खेळाडू तयार असून त्यानेही आयपीएल च्या प्रदर्शनामुळे भारतीय संघात स्थान देखील मिळवले आहे.
हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून मुंबई इंडियन्सचा सूर्यकुमार यादव आहे. सूर्यकुमार यादवच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्याची कामगिरी बघता त्याला भारतीय संघात यायला थोडा उशीरच झाला. त्याच्यावर निवडीच्या बाबतीत अन्याय झाला असेच म्हणावे लागेल. कारण वयाच्या ३० व्या वर्षी त्याने भारतीय संघात पदार्पण केलं. नुकतेच आयपीएल पूर्वी इंग्लंड विरुद्ध झालेल्या टी २० सिरीजमध्ये सूर्यकुमार यादवला संधी मिळाली होती. या संधीचे सोने करत त्याने दुसऱ्याच सामन्यात अर्धशतक झळकावले. त्याच्या खेळीच्या बळावर भारताने विजयही मिळवला.
१४ सप्टेंबर १९९० रोजी जन्मलेला सूर्यकुमार मागील १५ वर्षांपासून फर्स्ट क्लास क्रिकेट खेळत आहे. सूर्यकुमारचा जन्म मुंबईत एका सर्वसामान्य कुटुंबात झाला. सूर्यकुमार यादवचं कुटुंब मूळचं वाराणसीचं आहे. वडील अशोक यादव यांचं पूर्ण कुटुंब अजूनही गाझीपूरच्या हातोडा गावात राहते. अशोककुमार यादव हे नोकरीनिमित्त मुंबईत आले. अशोक यादव हे भाभा ऍटोमिक रिसर्च सेंटर मुंबई येथे इंजिनिअर आहेत. सूर्यकुमारचे शिक्षण मुंबईतच झाले. परमाणु ऊर्जा केंद्रीय विद्यालय येथून त्याच शालेय शिक्षण झालं तर पिल्लई कॉलेज आफ आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स मुंबई येथून कॉमर्सचे शिक्षण घेतलं.
सूर्यकुमारची आई स्वप्ना यादव आणि वडील अशोक कुमार यांचा तो एकुलता एक मुलगा आहे. सूर्याला दिनल हि एक बहीण आहे. सूर्यकुमारला लहानपणीपासून क्रिकेट आणि बॅडमिंटन खूप आवडायचं. याशिवाय त्याला टॅटूचा देखील खूप शौक आहे. आजही त्याच्या शरीरावर अनेक टॅटू आहेत. मुंबईमधून सूर्याने कॉमर्सची डिग्री घेतली आहे. शालेय जीवनापासूनच सूर्याने क्रिकेट खेळायला सुरुवात केली. सूर्याचे आजोबा विक्रमसिंग यादव हे CRPF मध्ये इन्स्पेक्टर होते. त्यांना १९९१ मध्ये राष्ट्रपती पोलीस मेडल देखील मिळालं होतं.
घरी एवढं शैक्षणिक वातावरण असताना सूर्या मात्र क्रिकेटकडे वळला. त्याला त्याचे काका विनोद यादव यांनी क्रिकेटचे धडे दिले. पुढे त्याने चंद्रकांत पंडित आणि एच एस कामत यांच्या कडून क्रिकेटचे धडे घेतले. सूर्याने २०१६ मध्ये त्याची मैत्रीण आणि डान्स कोच देविशा शेट्टी सोबत लग्न केलं. दोघांची पहिली भेट २०१२ मध्ये आर एम पोद्दार कॉलेज ऑफ कॉमर्स मुंबईमध्ये झाली होती. देविशा सूर्याच्या बॅटींगची खूप फॅन होती. तर सूर्या तिच्या डान्सचा चाहता होता. सूर्या क्रिकेट शिवाय भारत पेट्रोलियम मध्ये मॅनेजर म्हणून नोकरी देखील करतो.
२०१३ मध्ये सूर्याच्या नेतृत्वात भारतीय अंडर २३ टीमने इमर्जिंग एशिया कप जिंकला होता. २०११-१२ च्या रणजी सीजनमध्ये त्याने ओडिशाच्या विरुद्ध द्विशतक झळकावलं होतं. २०१० मध्ये त्याने अंडर २२ मध्ये त्याने १ हजारहुन अधिक रन केले होते. २०११-१२ रणजी सिजनमध्ये ७५४ रन करून तो सर्वाधिक धावा करणारा त्या सिजनचा खेळाडू बनला होता. एवढं चांगलं परफॉर्म करूनही भारतीय संघात संधी मिळायला त्याच्यावर अन्यायच झाला. २०११ मध्ये सर्वात आधी मुंबई इंडियन्सने त्याला आयपीएल मध्ये खरेदी केले होते. काही सीजन तो कोलकाता नाईट रायडर्स कडून देखील खेळला.
सूर्याला २०१४ मध्ये KKR ने खरेदी केले. तो चर्चेत तेव्हा आला जेव्हा त्याने २०१५ मध्ये ५ षटकार मारत मुंबई इंडियन्सविरुद्ध मोठ्या धावा करत KKR ला विजय मिळवून दिला. पुढे त्याला मुंबईने पुन्हा खरेदी केले. त्यानंतर त्याला टीममध्ये सतत संधी मिळत राहिली आणि त्याने संधीचे सोने केले. सूर्याने मुंबईकडून रणजी खेळताना पहिला सामना दिल्लीविरुद्ध खेळला होता. ज्यामध्ये त्याने ८९ बॉलमध्ये ७३ धावांची खेळी खेळली होती.
सूर्याने मागच्या २ सिजनमध्ये ४०० हुन अधिक धावा करून मुंबईच्या ट्रॉफी जिंकण्यात महत्वाचा वाटा उचलला होता. तेव्हाच त्याला भारतीय संघात संधी द्या म्हणून सर्वत्र मागणी वाढली होती. अखेर यावर्षी उशिरा का होईना त्याला भारतीय संघात संधी मिळाली आणि त्याने संधीच सोनं करत जबरदस्त फलंदाजीने चाहत्यांचे मन जिंकले. सूर्याने मुंबई रणजी संघाकडून खेळताना देखील धावांचा डोंगर उभा केला आहे. आता चाहत्यांना आशा आहे कि जे त्याने मुंबई आणि मुंबई इंडियन्स साठी केलं आहे ते भारतीय संघासाठी तो करेल.