कोणत्याही व्यक्तीने आयुष्यात काही ठरवलं कि ते मिळवणं त्याच्या मेहनतीवर अवलंबून असतं. खरंच एखादी गोष्ट मनापासुन ठरवली तर ती पूर्ण करणे काहीच कठीण नसते. कठोर परिश्रम, दुर्दम्य इच्छाशक्ती आणि आत्मविश्वास असेल तर मग कोणतंही संकट पार करून यशाला गवसणी घालता येते. हेच सर्व संकट झेलून एका खेड्यातील शाळेत चपराशी असलेल्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याच्या मुलीने IPS पदापर्यंत झेप घेतली आहे.
नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील आराई हे एक छोटंसं खेडेगाव. या गावचे रहिवाशी असलेले आणि मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेत तब्बल चाळीस वर्षे चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून नोकरी करत असलेले अशोक भदाणे एक सामान्य व्यक्ती. घरची परिस्थिती तशी प्रतिकूलच होती. अशोकरावांना ३ मुलं होती. २ मुली आणि एक मुलगा. सर्वात छोटी असलेली विशाखा तशी लहानपणीपासून जिद्दी आणि हुशार होती.
एका शाळेतच कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या अशोकरावांना शिक्षणाचे महत्व खूप चांगल्या प्रकारे माहिती होतं. त्यांना सुरुवातीपासूनच वाटायचं कि आपल्या तिन्ही मुलांनी खूप शिकावं आणि मोठं नाव कमवावं. अशोकरावांनी परिस्थिती जेमतेमच होती. त्यामुळे त्यांना तिन्ही मुलांचा शिक्षणाचा खर्च झेपेल अशी देखील परिस्थिती नव्हती. तिन्ही भावंडं मन लावून शिक्षण घेत होती. पण अनेकदा पैसे नसल्याने पुस्तक मिळायची नाहीत. पण तेव्हा ते सुट्ट्यांमध्ये शाळेत जाऊन लायब्ररीत पुस्तकं वाचून अभ्यास करत.
विशाखाच्या वडिलांना खूप कमी पगार होता. त्यामुळे तिच्या आईने मुलांच्या शिक्षणाला हातभार लावण्यासाठी विशाखाच्याच शाळेसमोर एक छोटंसं दुकान चालू केलं. यामधून तिन्ही भावंडांचा शाळेचा थोडा खर्च थकायला लागला. शाळेतील शिक्षक विशाखाची अभ्यासाची आवड बघून नेहमीच खूप मदत करत असत. तिला सुटच्या दिवशी देखील वाचायला पुस्तक मिळत.
विशाखाने शालेय शिक्षण पूर्ण केलं. चांगल्या मार्काने ती पास झाली. पण विशाखा १९ वर्षांची असताना आईचं निधन झालं. एक मोठा धक्काच विशाखा आणि कुटुंबाला बसला होता. मुलांना शिक्षण मिळावं म्हणून दुकान चालवणाऱ्या या माउलीला आपल्या मुलीचं यश बघणे नशिबात नसावे. विशाखा बारावी चांगल्या मार्काने पास झाली. विशाखा आणि तिच्या भावाने BAMS प्रवेश परीक्षेत यश मिळवलं. अशोकरावांनी या दोघांच्या डॉक्टरकीच्या शिक्षणासाठी लोन काढले. तर मोठ्या मुलीचं लग्न केलं.
लोन काढून विशाखा आणि तिचा भाऊ BAMS ला गेले. ४-५ वर्ष मन लावून अभ्यास केला आणि डॉक्टर झाले. एवढ्या कष्टाने डॉक्टर झाल्यावर आता साहजिकच पैसे कमवायचं त्यांना सुचायला हवं होतं. पण विशाखाच्या डोक्यात व्यवसाय नव्हता तर तिला मोठं अधिकारी बनून लोकांची सेवा करायची होती. तस बघायला गेलं तर वैद्यकीय पेशा पण लोकांच्या सेवेचा आहे. पण तिच्या मनात काही वेगळंच होतं.
तिने भारतीय प्रशासकीय सेवेची निवड करून देशातील सर्वोच्च सनदी सेवा म्हणजेच ‘आयएएस’ व्हायचेच, अशी खूणगाठ बांधली आणि अभ्यासाला लागली. खूप अभ्यास केल्यानंतर विशाखाला पहिल्या प्रयत्नात अपयश आले. पण ती खचून गेली नाही. पण दुसऱ्या प्रयत्नात २०१८ मध्ये मात्र विशाखा यूपीएससी परीक्षेत पास होऊन IPS बनली.
या यशामुळे दोन वर्षांच्या खडतर प्रशिक्षणानंतर मागील वर्षी डॉ विशाखा भदाणे यांची हरिद्वार येथे अतिरिक्त पोलिस अधीक्षक पदावर नियुक्ती झाली. नाशिक जिल्हा आणि बागलाण तालुक्यातील पहिली महिला ‘आयपीएस’ अधिकारी म्हणून नियुक्त होण्याचा बहुमानही डॉ. विशाखा यांनी मिळविला. या कर्तृत्वामुळे बागलाणचे नाव देशपातळीवर पुन्हा एकदा उंचावले आहे. जिद्द, आत्मविश्वास आणि कठोर परिश्रम करून प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात केले तर यश नक्कीच मिळतं हे विशाखाने दाखवून दिलं आहे.