आजही मुलींना शिक्षणापासून आणि नोकरीपासून वंचित राहावं लागतं. अनेक असे कुटुंब आहेत जिथे मुलाला शिक्षण दिलं जातं तर मुलगी शिकून काय करणार असं म्हंटलं जातं. खासकरून ग्रामीण भागात मुलींना शिक्षण देण्याचे प्रमाण खूप कमी आहे. पण मुलींनी मात्र अनेकदा सिद्ध केले आहे कि त्या देखील कशातच कमी नाहीत. मग ते शिक्षण असो किंवा अन्य काही. मुलींनी देखील अनेक क्षेत्रात भरारी घेतलेले लाखो उदाहरण आपल्याला बघायला मिळतात. आज आपण अशाच एका मुलीची वाटचाल बघणार आहोत जिने दुग्धव्यवसायात गरुडझेप घेतली आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोज हे गाव. या गावातील ढवण कुटुंबातील श्रद्धा हिचं नाव २१ व्या वर्षीच देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचलं आहे. श्रद्धाचे वडील अपंग आहेत. तर भावंडं लहान आहेत. घरात दुसरं कोणी कमावणारे नाही. कुटुंबाचा उदरनिर्वाह काही म्हशींवर होत असे. आई वडील घरी काही म्हशी होत्या त्या सांभाळून छोटा दुधाचा व्यवसाय करत असत. श्रद्धाला देखील त्यांना कामात हातभार लावायला आवडायचं. ती देखील म्हशींना पाणी पाजण्यापासून त्यांचं शेण काढण्यापर्यंतचे काम करायची. शिवाय दूध देखील ती काढायला कमी वयातच शिकली.
तिने ११-१२ वी मध्ये असतानाच हा सर्व व्यवसाय आपल्या खांद्यावर घेतला. तिने सुरुवातीला वडिलांना मदत म्हणून हे काम सुरु केलं होतं. तिला हे काम आवडायचं देखील. श्रद्धा पिकअप चालवायला देखील शिकली. मोटारसायकलवर कॅरेट टाकून त्यावर दूध न्यायला तिला सुरुवातीला लाज वाटायची पण हळू हळू ती लाज देखील निघून गेली. सायकलवर शाळेत जायच्या वयात श्रद्धा गाडीवर दूध घालायला जायची. तिच्या कामाचे सर्वत्र कौतुक व्हायला लागले. त्यामुळे तिचा उत्साह देखील वाढत गेला. आणि तिच्यात आत्मविश्वास देखील खूप वाढला.
श्रद्धा आता दुधाच्या व्यवसायात एक्स्पर्ट झाली आहे. तिच्याकडे आज ८० हुन अधिक म्हशी आहेत. याशिवाय तिने आपल्या म्हशींसाठी दोन मजली गोठा उभारला आहे. या २ मजली गोठ्यातून तिचा दुधाचा व्यवसाय चालतो. हा नगर जिल्ह्यातील पहिला २ मजली गोठा आहे. श्रद्धाला वडिलांनी म्हशींबद्दल स्वतःचे सर्व अनुभव देऊन तिला ट्रेन केलं आहे. श्रद्धा एवढी तरबेज झाली आहे कि ती कॅन मधील दूध बघून देखील ते किती लिटर आहे सांगू शकते. श्रद्धाने डेअरीकडे लक्ष देता यावं म्हणून आणि व्यवसाय वाढावा म्हणून तिने शहराकडे देखील न जाण्याचा निर्णय घेतला.
श्रद्धाने व्यवसायाला टाइम देण्यासाठी शहरामध्ये ऍडमिशन न घेता गावातच निघोजमध्ये बीएससीचं शिक्षण घेतलं. श्रद्धाने गावातच चांगलं शिक्षण घेऊन स्वतःच्या स्किल सुधरवल्या. श्रद्धाच्या गोठ्यातून आज ४५० लिटर दूध निघतं. वडिलांचा छोटा व्यवसाय एवढा मोठा करण्यामागे श्रद्धाची प्रचंड मेहनत आहे. श्रद्धा या यशाचे श्रेय आपल्या आई वडिलांना देते. ती म्हणते त्यांच्या पाठिंब्यानेच हे शक्य झालं. श्रद्धाला भावाने शाळा करून मदत केली तर वडीलही अपंग असून दूध काढायला मदत करायचे. तर आई देखील गोठ्यात सतत काम करायची.
सध्याचा नित्यक्रम म्हणजे सकाळी लवकर उठून म्हशी धुणे, दूध काढणे, दूध स्वतः डेअरीवर नेऊन घालणे. याशिवाय म्हशींसाठी पेंढ घेऊन येणे ती त्यांना खाऊ घालणे देखील श्रद्धाकडे आहे. हे सर्व करून ती संध्याकाळी अभ्यास देखील करते. श्रद्धाच्या या कामाबद्दल तिच्या आई वडिलांनाच नाही तर संपूर्ण गावाला तिचा अभिमान वाटतो. गावातील लोक श्रद्धाचे कौतुक करतात. कमी वयात एखाद्या मुलाप्रमाणे श्रद्धाने ही जबाबदारी अंगावर घेतल्यामुळे समाजासमोर एक वेगळा आदर्श तिने ठेवला आहे.