काल UPSC चा निकाल जाहीर झाला. या परीक्षेत महाराष्ट्रातील ५० हुन अधिक जणांनी चांगली रँक मिळवत घवघवीत यश मिळवलं आहे. याच परीक्षेत चंद्रपूर जिल्ह्यातील वरोऱ्याच्या एका विद्यार्थ्याने जे यश मिळवलं आहे ते बघून तुम्हीही त्याचे कौतूक कराल. कारण त्याने कुठलेही क्लासेस न लावता UPSC ची तयारी केली. एवढंच नाही तर कोरोनाच्या लाटेत त्याला कोरोना झाला. HRCT स्कोर १८ झाला. पण मृत्यूच्या दाढेतून बाहेर येऊन त्याने आज UPSC परीक्षेत पास होत मोठा अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील प्राध्यापक असलेल्या चंद्रभान जीवने यांचा मुलगा आदित्य जीवने हा UPSC परीक्षेत ३९९ वि रँक मिळवत पास झाला आहे. आदित्यचे वडील आनंद निकेतन महाविद्यालयात वाणिज्य प्रमुख आहेत, तर आई जिल्हा परिषदेला शिक्षिका आहेत. आदित्यने अधिकारी होण्याचे स्वप्न जरी आज पूर्ण केले असले तरी त्याचा हा प्रवास सोपा नव्हता.
आदित्यचे दहावीपर्यंचे शिक्षण वरोऱ्यातच St. anne’s पब्लिक स्कुलमधून झाले. आई वडील शिक्षक असल्याने आदित्यला घरातून चांगले संस्कार मिळाले. तो अभ्यासातही लहापणीपासूनच हुशार होता. दहावीमध्ये जेव्हा त्याला ९२ टक्के मार्क मिळाले तेव्हा त्याच्या आयुष्यात UPSC करून अधिकारी होण्याचे स्वप्न मिळाले. कारण वडिलांनी त्याला तेव्हा यूपीएससीचे एक पुस्तक भेट दिले होते. यातूनच त्याला यूपीएससीची प्रेरणा मिळाली.
आदित्यला दहावी झाल्यावर आईवडिलांनी नागपूरला पाठवलं. तिथे तो नारायण पब्लिक स्कूल मधून चांगल्या मार्कांनी बारावी पास झाला. त्यानंतर त्याने यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालयात केमिकल इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला. २०१८ मध्ये आदित्यने UPSC ची तयारी सुरु केली. त्याने मोबाईलवरच इंटरनेटचा वापर करून तयारीला सुरुवात केली. त्याने पूर्ण सेल्फ स्टडी केला. मागच्या परीक्षेत मुलाखतीला जाऊन यश प्राप्त झाले नाही. मात्र, त्याने थोडंही विचलीत न होता अभ्यास सुरू ठेवला.
आदित्यला स्वतःच्या तयारीवर विश्वास होता. आणि अखेर त्याला २०२० च्या UPSC परीक्षेत यश मिळालं. पण आयुष्यात एक मोठं संकट आलं. दिल्ली येथे मे महिन्यात यूपीएससीच्या मुलाखती असल्याने एप्रिल महिन्यातच तो दिल्लीला गेला. त्याकाळात दिल्लीमध्ये कोरोनाचा कहर होता. त्यात त्याचा मित्र पॉझिटिव्ह आला. त्याला मदत करताना आदित्यसुद्धा पॉझिटिव्ह आला. त्याचा स्कोअर १८ होता. त्यानंतर महाराष्ट्रातील अधिकारी यांच्या मदतीने दिल्ली येथील रुग्णलयात भरती झाला आणि तिथेच त्याचा मृत्यूशी संघर्ष सुरू झाला.
आदित्यने कोरोनाला हरवले. महाराष्ट्रातील आयपीस अधिकारी स्वागत पाटील, हैदराबाद पोलिस अधीक्षक महेश भागवत, मुंबई आयआरएस नितेश पाथोडे, तामिलनाडूच्या राज्य पोलिस सचिव आनंद पाटील यांनी त्या काळात खूप मदत केली. कोरोनाला हरवून तो वरोऱ्याला परतला. काही दिवस येथील डॉ. खापणे यांच्या मार्गदर्शनात उपचार घेऊन त्यांनी परत मुलाखतीची तयारी सुरू केली. १७ ऑगस्टला मुलाखत दिली आणि तो ३९९ रँक प्राप्त करून आज यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आहे.