शरद पवार हे नाव देशाच्या राजकारणात वजनदार नाव आहे. दिग्गज राजकीय नेते असलेल्या शरद पवार यांचे विविध खेळांशी देखील जवळचे नाते राहिले आहे. शरद पवार यांनी आतापर्यंत खेळाच्या विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय समित्यांचे नेतृत्व केलं आहे. त्यांनी जागतिक क्रिकेट परिषद(आयसीसी), बीसीसीआय या मोठ्या परिषदांचे अध्यक्षपद भूषवले आहे.
शरद पवार यांनी खेळासाठी आजपर्यंत खूप काही दिले आहे. शरद पवारांनी क्रिकेटप्रेमींना एक यशस्वी कर्णधार देण्यात देखील मोठा वाटा उचललेला आहे. जाणून घेऊया सर्वात यशस्वी कर्णधार मिळण्यामागची कहाणी.
महेंद्रसिंग धोनी हे नाव घेतलं कि डोळ्यासमोर येतात भारतीय क्रिकेटला त्याने दाखवलेले सुवर्ण दिन. कधीकाळी खरगपूर रेल्वे स्टेशनवर तिकीट कलेक्टर म्हणून काम करणारा धोनी, त्याच्या क्रिकेट कौशल्याच्या बळावर भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार झाला.
मिळालेल्या संधीचे सोने कसे करावे ते धोनीकडे बघितल्यानंतर समजते. २००७ मध्ये टी-२० वर्ल्डकप, २०११ मध्ये वनडे वर्ल्डकप आणि २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी या तिन्ही प्रकाराच्या आयसीसी स्पर्धा भारताला जिंकुन देणारा सर्वात यशस्वी कॅप्टन ! सर्वाधिक स्टम्पिंग करणारा विकेटकीपर ! सहाव्या क्रमांकावर खेळताना सर्वाधिक धावा करणारा बॅट्समन ! सर्वोत्कृष्ट मॅच फिनिशर !
महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघ तिन्ही फॉरमॅट मध्ये रँकिंगमध्ये जगात एक नंबरला गेला. याच क्रिकेटपटूने आजपर्यंत अनेक अशक्य ते शक्य करून भारतीय क्रिकेटला वेगळ्या उंचीवर नेलं आहे. महेंद्रसिंग धोनीची सर्वप्रथम भारतीय क्रिकेट संघात निवड २००४-०५ मध्ये झाली.
२००४ मध्ये गांगुलीने महेंद्रसिंग धोनीमध्ये जो विश्वास दाखवला होता तो त्याने खरा करुन दाखवला. १५ वर्ष भारतीय संघाचा यशस्वी विकेटकीपर म्हणुन तो खेळला. धोनीला क्रिकेट खेळात असणारी जाण, त्याची गुणवत्ता आणि कामगिरी यांच्या जोरावर संघाचे नेतृत्व त्याच्याकडे आले. धोनीने ९ वर्ष भारताचा कर्णधार म्हणुन धुरा वाहिली. भारतीय संघाला त्याने एका वेगळ्या उंचीवर नेले.
शरद पवारांचा एक कॉल आणि भारताला मिळाला यशस्वी कर्णधार-
भारतीय संघ त्यावेळी इंग्लंडच्या दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी बीसीसीआयचे अध्यक्ष होते शरद पवार. इंग्लंड दौरा सुरु झाल्यानंतर १-२ मॅचेस झाल्या. त्यावेळी भारताचा कर्णधार होता राहुल द्रविड. त्यावेळी शरद पवार तिथेच होते. एकेदिवशी सकाळीच राहुल द्रविड त्यांना भेटायला आला. द्रविडने पवारांना सांगितले कि मला कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा.
राहुल द्रविडच्या खेळावर कर्णधारपदामुळे दबाव येत होता. त्यावेळी पवारांनी राहुल द्रविडला सांगितलं कि आपण आता इंग्लंड दौऱ्यावर आहोत आणि जर मध्ये कर्णधार बदलला तर जगात काय मॅसेज जाईल. द्रविडने मात्र मुक्त करण्याची विनंती लावून धरली. त्यानंतर पवारांनी सचिन तेंडुलकरला कप्तानी विषयी विचारलं. त्याने देखील ते स्वीकारण्यास नकार दिला.
सचिनला पवार म्हंटले जर तुम्हाला दोघांना जबाबदारी नको तर कर्णधार बनवायचं कोणाला? तेव्हा सचिन पवारांना म्हणाल आपल्याकडे असा एक खेळाडू आहे जो हे नेतृत्व करू शकतो. ते नाव होतं महेंद्रसिंग धोनीचं. पवारांनी नंतर महेंद्रसिंग धोनीकडे संघाचं नेतृत्व दिलं. त्यानंतर जे धोनीने केले ते वेगळं सांगण्याची गरज नाही.