धुळे जिल्ह्यतील सामोडे ह्या गावात भिल्ल वस्तीत जन्मलेला तो मुलगा. आईच्या पोटात असतानाच वडिलांचे छत्र हरवले. वस्तीवर एका लहानश्या पाचाटाच्या झोपडीत बालपण गेलेले. तो मुलगा आपल्या मेहनतीच्या आणि प्रचंड अभ्यासाच्या बळावर एकाच वर्षी वैद्यकीय पदवी आणि पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा पास होऊन IRS होतो. आणि नंतर ट्रेनिंगदरम्यान IAS होतो. हे वाचल्यानंतर डोळ्यासमोर उभा राहतो तो यामागचा संघर्ष. हा संघर्ष करून यश मिळवणारा तो मुलगा आहे डॉ. राजेंद्र भारूड.
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुकात सामोडे या गावी राजेंद्र यांचा जन्म झाला. सामोडे गावापासून थोड्याशा अंतरावर असलेल्या भिल्ल वस्तीत त्यांचं घर. त्या वस्तीत सर्व घरं हि उसाच्या पाचटापासून बनलेली होती. सर्व झोपड्या तिथे होत्या. त्या भिल्ल वस्तीतील सर्वांचा व्यवसाय म्हणजे एकतर मजुरी करायची किंवा मग महूपासून दारू विकायची. या २ गोष्टी उदरनिर्वाहाच्या साधनं होत्या.
या भिल्ल वस्तीत राजेंद्र यांचे वडील आई, मोठी बहीण भाऊ राहत होते. पण आईच्या पोटात असतानाच त्यांच्या वडिलांचं निधन झालं. त्यावेळी ते आईच्या पोटात ३ महिन्याचे होते. त्यावेळी गरिबीचा अंदाज यावरून येऊ शकतो कि त्यांच्या वडिलांचा साधा फोटो देखील त्यांना आयुष्यात कधी बघायला मिळाला नाही. वडिलांचा चेहरा राजेंद्र यांना बघायला मिळाला नाही.
वडील वारल्यानंतर त्यांच्या कडच्या मंडळींनी आधीच २ मुलं आहेत म्हणून आईला तिसऱ्या मुलाची गरज काय म्हणून दबाव टाकायला सुरुवात केली. त्यावेळी त्यांची मावशी जिला भिल्ल भाषेत मोठमाय म्हणतात ती समोर आली. ती म्हणाली तुम्हाला बाळ नको असेल तर मी सांभाळ करते. मावशी हट्टाने आईला, भाऊ बहिणीला घेऊन त्यांच्या झोपडीत आली. तिथेच मावशीच्या झोपडीत राजेंद्रचा जन्म झाला. ४ महिन्यातच आई मावशी मजुरीला जायला लागली. दुधासाठी राजेंद्र खूप रडायचे.
दुधाची तहान भागवण्यासाठी त्यांच्या तोंडात त्यावेळी दारूचे थेम्ब टाकले जायचे. जेणेकरून त्यांना झोप लागेल. हे त्यांचं बाळकडू होतं. त्यांच्याघरी कोणी कधी शाळाच बघितली नव्हती. त्यांच्या घरी पहिलीही कोणी शिकलेलं नव्हतं. पण त्यांच्या नशिबात मात्र शाळेत जायचा योग आला. शिक्षक त्यांच्या आदिवासी पट्ट्यात आले आणि त्यांना शाळेत घेऊन गेले. जिल्हा परिषदच्या कौलारू शाळेत ते गेले. सर्व पांढऱ्या कपड्यांमध्ये असणाऱ्या मुलात राजेंद्र हे एकटेच मळक्या कपड्यात होते. त्यांना दडपण आले. पण मुख्याध्यापकांनी गरम दूध आणि सुगडी दिली. त्यामुळे त्यांनी रोज शाळेत जायचं ठरवलं.
शाळेत तेव्हा ते एकदा थंडीत बिना स्वेटरचं बिना चप्पलचं भाषण करत होते. खूप थंडी होती. एका शिक्षकाने हे बघितलं. त्यांनी राजेंद्र घरी पोहोचायच्या आधी घरी चप्पल आणि स्वेटर आणून दिल. पाचवीला त्यांनी नवोदयला फॉर्म भरला. त्यावेळी फॉर्म भरण्यापासून, ट्युशन पर्यंत सर्व शिक्षकांनी केलं. स्वतःच्या पैशाने शाळेत घेऊन गेले. त्यांचा नवोदय विद्यालय अक्कलकुवा नंदुरबार येथे नंबर लागला.
त्यावेळी नुकतंच राजेंद्रच्या बहिणीचं लग्न झालं होतं तर भाऊ आश्रमात होता. आई पहाटेच दारू गाळायला जायची. तेव्हा राजेंद्र सकाळी उठल्यावर घर झाडणे, पाणी भरणे, भांडी घासणे हे सर्व कामे करायचा. आजूबाजूला सर्व लोक तसेच असल्याने त्यांना गरिबी म्हणजे काही माहितीच नव्हतं. सर्व सारखेच होते. पुढे ते नवोदयला गेले. तेव्हा आई खूप रडायची. खूप अभ्यास केला. दहावीला चांगले मार्क्स घेतले. बारावीला तर ९७ टक्के मिळवले. मुंबईच्या जी.एस. मेडिकल कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळवला.
खूप स्कॉलरशिप मिळाल्या. त्याच्या जोरावर शिक्षणाचा खर्च चालू होता. बारीकसारीक खर्चाचे पैसे माय पाठवत होती. आईचा व्यवसाय चालूच होता. एम.बी.बी.एस.च्या शेवटच्या वर्षाला असताना यूपीएससीचा अभ्यास सुरु केला. १ वर्षांनी हातात MBBS ची डिग्री आणि यूपीएससी क्रॅक केल्याचा निकाल होता. घरी मोठी मोठी मंडळी माझ्या अभिनंदनासाठी येत होती. कलेक्टर, तहसीलदार, पुढारी. मायला काही कळतच नव्हतं की इतकी लोकं का येताहेत.
नातेवाईक, गावातील भिल्ल समाजातील इतर समाजबांधव ‘आपला राजू कंडक्टर झाला’ म्हणत कौतुक करत होते. डॉ. राजेंद्र भारूड यांची पहिली पोस्टिंग कलेक्टर म्हणून नंदुरबार जिल्ह्यात झाली. राजेंद्र भारूड नावाचा भिल्लं समाजातला तरुण जेव्हा आयएएस ऑफिसर होतो, भिल्ल समाजातला पहिलाच कलेक्टर होतो तेव्हा तो आजूबाजूच्या लोकांना मोठी प्रेरणा देऊन जातो. लढायचं ठरवलं तर काहीच अशक्य नसतं हे राजेंद्र गारुड यांनी दाखवून दिलं आहे.