१ मे १९६० रोजी स्थापना झालेल्या महाराष्ट्र राज्याचे यशवंतराव चव्हाण हे पहिले मुख्यमंत्री होते. त्यांच्यानंतर मारोतराव कन्नमवार, वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार यांच्यापासून देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत अनेक मुख्यमंत्री लाभले. पण महाराष्ट्राला पहिले आणि एकमेव मुस्लिम मुख्यमंत्री लाभले ते म्हणजे बॅरिस्टर ए आर अंतुले. ९ जून १९८० ते १२ जानेवारी १९८२ या काळात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते.
ए आर अंतुले यांची कट्टर शिवप्रेमी अशी ओळख होती. अंतुले हे रायगड जिल्ह्यातील होते. रायगडचं पूर्वी नाव कुलाबा होतं. अंतुले यांनीच शिवाजी महाराजांच्या कर्मभूमीला कुलाबा हे नाव बदलून रायगड हे नाव दिलं. लंडनहून शिवाजी महाराजांची भवानी तलवार आणण्याची घोषणा त्यांनीच केली होती. याशिवाय मंत्रालयात जे शिवाजी महाराजांचं तैलचित्र आज आपल्याला दिसतं ते देखील अंतुले यांनीच लावलं. अशा अनेक प्रसंगातून त्यांचं शिवप्रेम त्यांनी दाखवून दिलं होतं.
मराठ्यांचा दबदबा असलेल्या महाराष्ट्रात हा शिवप्रेमी असलेला मुस्लिम मुख्यमंत्री प्रचंड ताकदीचा नेता होता. त्यांचा दिल्लीच्या वर्तुळात देखील मोठा दबदबा होता. झटपट निर्णय घेण्याची क्षमता हे त्यांचं वैशिष्ट्य. गरीबांच्या मदतीसाठी धावणारे नेते म्हणून त्यांची ओळख होती. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाबाबत अंतुले यांना विशेष जिव्हाळा होता. पक्षभेद विसरून त्यांनी याप्रश्नी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी चर्चाही केली होती. अंतुले हे कमी काळ मुख्यमंत्री होते पण अल्पकाळात त्यांनी आपला ठसा राज्याच्या राजकारणावर उमटवला.
सिंधुदुर्ग, जालना, लातूर, गडचिरोली या नव्या जिल्ह्यांची निर्मिती, संजय गांधी निराधार योजनेची मुहूर्तमेढ, गटांचं तालुक्यात रुपांतर असे अनेक निर्णय अंतुले यांनी वेगाने घेतले. जिल्हाधिकारी कार्यालयात लोकप्रतिनिधी आल्यास जिल्हाधिकाऱ्यांनी उठून उभे राहून त्यांना सन्मान द्यावा, असा आदेशही त्यांच्याच काळात काढण्यात आला. कोकणचा कॅलिफोर्निया करण्याची घोषणा अंतुले यांनीच सर्वप्रथम दिली होती.
आणीबाणीनंतर राज्यात आलेलं पुलोदचं सरकार २ वर्ष टिकलं. १९८० च्या लोकसभा निवडणुकीत जेव्हा इंदिरा गांधी या पुन्हा सत्तेत आल्या तेव्हा त्यांनी महाराष्ट्रातलं पुलोदचं सरकार बरखास्त केलं. त्यानंतर राज्यात काही काळ राष्ट्रपती राजवट लागू झाली. १९८० मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने मोठा विजय राज्यात मिळवला आणि पुन्हा सत्ता मिळवली. त्यानंतर एका निष्ठावंताला मुख्यमंत्रीपद मिळालं. कारण १९६९ मध्ये काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर यशवंत चव्हाणांसारखे अनेक दिग्गज नेते इंदिरा यांना सोडून गेले. पण अंतुले मात्र त्यांच्यासोबत राहिले.
१९८० मधील निवडणुकीत काँग्रेसने २८८ पैकी १८६ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले. सत्ता आल्यानंतर वसंतदादा पाटील आणि प्रतिभाताई पाटील हे मुख्य दावेदार समजले जात होते. पण इंदिरा गांधींनी निष्ठावान राहिलेल्या अंतुलेंना मुख्यमंत्री केले. त्यानंतर सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. अंतुले यांच्या कार्यकाळातच शेतकऱ्यांची पहिली कर्जमाफी झाली होती. RBI चा विरोध असतानाही त्यांनी ५० कोटींची कर्जमाफी केली होती.
त्यांचा जन्मच शिवरायांच्या कर्मभूमीतला असल्याने त्यांचं शिवप्रेम जगजाहीर होतं. पण अंतुलेंना एका घोटाळ्याच्या आरोपामुळे पायउतार व्हावं लागलं. ते मुख्यमंत्री असताना राज्यात सिमेंटची टंचाई निर्माण झाली होती. त्यांनी सरकारी कोट्यातील सिमेंट कारखान्यांना मिळवून दिलं. पण त्याबदल्यात इंदिरा गांधी प्रतिष्ठानसाठी देणग्या घेतल्याची बातमी आली. ३० कोटींचा हा कथित घोटाळा होता. लोकसभा अधिवेशनात हा मुद्दा गाजला. अखेर या प्रकरणात त्यांना राजीनामा द्यावा लागला. १६-१७ वर्ष सुप्रीम कोर्टात हे प्रकरण चाललं होतं. त्यानंतर यातून अंतुलेंची सुटका झाली.