छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय आरमार दलाचे जनक मानले जाते. पूर्वीच्या काळी भारतात आरमार असल्याचे उल्लेख सापडतात, पण काळाच्या ओघात भारतीयांनी आरमाराचा वापर बंद केला होता. याच पोकळीचा फायदा घेऊन युरोपियन लोक भारताच्या किनाऱ्यावर आले. त्यांनी आणलेल्या आरमाराच्या जोरावर आधी किनारपट्टी ताब्यात घेतली आणि नंतर देशाचा भूभाग हस्तगत करुन भारतीयांना गुलामगिरीत ढकलले. परंतु त्याआधी या सगळ्या युरोपियन लोकांवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराने आपली दहशत निर्माण केली होती, हे देखील विसरता काम नये.
१६५६ मध्ये जावळीचा मुलुख ताब्यात घेतला आणि शिवरायांचा कोकणात चंचुप्रवेश झाला. कोकणात सुरुवातीला त्यांना सिद्दीशी लढावं लागलं. या लढायांमध्ये महाराजांनी जवळपास १०० किलोमीटरची कोकण किनारपट्टी जिंकली. सिद्धीवर मात करायची असेल तर आरमाराशिवाय पर्याय नाही हे महाराजांनी जाणले आणि २४ ऑक्टोबर १६५७ रोजी आरमार दल स्थापन केले.
जहाजबांधणीचे तंत्रज्ञान माहित असणाऱ्या पोर्तुगीज लोकांना कामाला ठेवले. पण महाराजांच्या आरमारापासून भविष्यत आपल्यालाही धोका असल्याचे पोर्तुगालच्या राजाच्या लक्षात आल्यानंतर त्याने सर्व पोर्तुगीज कामगारांना गुपचूप पळून जाण्याच्या सूचना दिल्या. ते कामगार पळून गेल्यानंतरही शिवरायांनी आपले जहाजबांधणीचे काम थांबवले नाही.
१६५९ साली जागतिक इतिहासात फ्रांस आणि स्पेनमध्ये असणारे युद्ध संपून दोन्ही राष्ट्रांमध्ये तह झाला आणि फ्रांसने पोर्तुगालची साथ सोडली. त्यामुळे पोर्तुगालला एका नव्या मित्राची गरज होती. त्याकाळी भारतामध्ये पोर्तुगीज आणि इंग्रज व्यापाराच्या निमित्ताने संघर्ष सुरु होता. मुंबईवर पोर्तुगिजांचा कब्जा होता. पण सामरिकदृष्ट्या पोर्तुगीजांपेक्षा इंग्रजांचे बळ अधिक होते. पोर्तुगालच्या राजा जॉन चतुर्थच्या डोक्यात विचार आला, इंग्रजांशी आपले चांगले संबंध प्रस्थापित झाले तर युरोपात आपल्याकडे कोणी वाकड्या नजरेने बघणार नाही.
पोर्तुगाल आणि इंग्लंडमध्ये चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी पोर्तुगालच्या राजाने १९६१ मध्ये आपली मुलगी राजकुमारी कॅथरीन द ब्रॅगांझा हिचा विवाह इंग्लंडचा राजा चार्ल्स द्वितीय ह्याच्यासोबत लावून दिला. सोबतच शिवाजी महाराजांच्या आरमाराने मुंबई ताब्यात घेण्याआधी आपणच ती इंग्रजांना देऊन टाकू असे म्हणत आपल्या ताब्यात असणारे मुंबई हे बेट मुलीला लग्नात आंदण म्हणून दिले. अशा पद्धतीने मुंबई इंग्रजांची झाली. परंतु त्यावेळी मुंबई ही वेगवेगळ्या बेटांमध्ये विभागलेली होती.
इंग्रजांच्या मनात देखील शिवरायांच्या आरमाराची भीती होती. सुरुवातीला तर लग्नात आंदण मिळालेल्या मुंबई बेटांकडे तर इंग्रज फिरकले सुद्धा नव्हते. १६६४ साली शिवरायांनी सुरतेवर छापा मारल्याच्या घटनेननंतर मग त्यांना मुंबई बेटाकडे लक्ष देण्याची बुद्धी सुचली आणि त्यांनी मुंबई बेटांच्या विकासाला सुरुवात केली. पुढे छत्रपती संभाजी महाराजांनी इंग्रजांकडून मुंबई बेट विकत घेण्यासाठी वाटाघाटीही केल्याचा इतिहास आहे.