ठाण्याचे बाळ ठाकरे म्हणून संबोधले जाणारे आणि धर्मवीर म्हणून परिचित असलेले स्व. आनंद दिघे हे शिवसेनेमधील एक मोठं नाव होतं. त्याच ठाण्यात आज आनंद दिघे यांच्या तालमीत तयार झालेला नेता शिवसेनेचा वजनदार मंत्री आहे. या नेत्याकडे शिवसेनेमध्ये मुख्यमंत्री पदाचा दावेदार म्हणून पाहिलं जातं.
हा नेता म्हणजे ठाण्याचे एकनाथ शिंदे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या समाजसेवेला त्यांनी आदर्श म्हणूनच शिंदे राजकारणाशी जोडले गेले. दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील निष्ठेमुळे ते शिवसेनेसोबत जोडले गेले. एक रिक्षा चालक- शिवसेना शाखाप्रमुख ते शिवसेनेचा वजनदार मंत्री इथपर्यंतचा त्यांचा प्रवास हा खूप संघर्षमय राहिला आहे.
एकनाथ शिंदे यांचा जन्म ९ फेब्रुवारी १९६४ रोजी झाला. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील दरे हे एकनाथ शिंदे यांचे मूळ गाव. शिंदेंचे बालपण हे ठाण्यातच गेले. ते शिक्षणाच्या निमित्ताने ठाण्यात आले. त्यांचे प्राथमिक शिक्षण ठाणे येथील किसननगर क्र. ३ येथील ठाणे महानगरपालिकेच्या शाळा क्र. २३ येथे झाले. तर माध्यमिक शिक्षण ठाणे येथीलच मंगला हायस्कूल येथे झाले.
शिक्षणासाठी ठाण्यात आलेल्या शिंदे यांच्या कुटुंबाची परिस्थिती जेमतेम होती. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी त्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले. सुरवातीच्या काळात त्यांनी मच्छी कंपनीत सुपरवायजर म्हणून काम केले. पुढे त्यांनी स्वतःची रिक्षा घेऊन रिक्षा चालवायला सुरुवात केली. त्यावेळी आनंद दिघे यांचा ठाण्यात झंजावात सुरु झाला होता.
रिक्षाचालक असलेले शिंदे हे आनंद दिघेंचा झंजावात बघत होते. त्यांच दरम्यान ते विजू नाटेकर रिक्षा युनियनमध्ये सक्रिय झाले. याच दरम्यान त्यांनी किसननगर येथे शिवसेनेचे काम त्यांनी सुरु केले. हळू हळू शिंदे यांचा शाखाप्रमुख म्हणून शिवसेनेत वावर वाढत गेला. सन १९८६ साली सीमाप्रश्नी झालेल्या आंदोलनात एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील शिवसेनेच्या १०० कार्यकर्त्यांसह भाग घेतला होता. त्यावेळी बेल्लारी येथील तुरुंगात त्यांना ४० दिवस कारावास झाला होता.
शिंदेनी शिवसेनेत गोरगरिबांसाठी आपले काम सुरूच ठेवले. शिंदेंचे काम दिघे यांच्यापर्यंत पोहचले. दिघेंनी रिक्षाचालक असलेल्या शिंदेंना थेट महापालिकेच्या निवडणुकीला उभे केले. ते निवडूनही आले.
शिंदे १९९७ मध्येपहिल्यांदा ठाणे महानगरपालिकेत नगरसवेक म्हणून निवडून गेले. शिंदे हे २००० मध्ये सातारा येथे सहलीसाठी गेले असताना त्यांच्या २ मुलांचा नदीत बुडून मृत्यू झाला. हे दुःख एकनाथ शिंदेनी विसरण्यासाठी आनंद दिघेंनी महापालिकेत सभागृह नेतेपद एकनाथ शिंदे यांना दिले. तेव्हापासून एकनाथ शिंदे यांनी राजकारणात मागे वळून पाहिलेच नाही.
एकनाथ शिंदे आनंद दिघे यांना किती मानायचे याचा प्रत्येय त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेताना करून दिला. शपथ घेताना त्यांनी बाळासाहेबांसोबत आनंद दिघेंच्या स्मृतींना वंदन करून शपथ घेतली. परिस्थितीमुळे तरुणपणी स्वतःला शिक्षण अर्धवट सोडावे लागले तरी त्यांनी मुलगा श्रीकांत याला मात्र जिद्दीने शिकवले आणि डॉक्टर केले. श्रीकांत एकनाथ शिंदे हे एमएस (ऑर्थो) असून कल्याण लोकसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले आहेत.
शिंदे २००२ मध्ये दुसऱ्यांदा नगरसेवक बनले तर २००४ मध्ये ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर २००५ मध्ये त्यांची ठाणे शिवसेना जिल्हाप्रमुखपदी निवड झाली. २००९ आणि २०१४ आणि आता २०१९ मध्ये देखील ते मोठ्या मताधिक्याने निवडून येत आमदार बनले. २०१४ मध्ये शिंदे यांच्याकडे शिवसेना विरोधी पक्षात बसल्यावर विरोधी पक्षनेतेपद देखील आले होते. ते महिनाभर या पदावर राहिले.
पुढे शिवसेना सत्तेत सहभागी झाल्यावर त्यांची कॅबिनेट मंत्रीपदी नियुक्ती झाली. त्यांनी आजपर्यंत अनेक कॅबिनेट मंत्रिपद भूषवले आहेत. २०१९ मध्ये त्यांची शिवसेना गटनेते पदी निवड झाली. २०१९ मध्ये महाविकास आघाडीचे समीकरण अस्तित्वात आल्यानंतर एकनाथ शिंदे यांचे नाव शिवसेनेकडून मंत्रिपदावर आघाडीवर होते. पण उद्धव ठाकरे मैदानात उतरल्याने ते मुख्यमंत्री बनले नाही. भविष्यात त्यांना शिवसेनेकडून मुख्यमंत्रीपद मिळू शकतं. एक रिक्षाचालक ते वजनदार मंत्री हा एकनाथ शिंदे यांचा जीवनप्रवास खूपच प्रेरणादायी आहे.