महाराष्ट्राला आतापर्यंत चव्हाण आडनावाचे चार मुख्यमंत्री मिळाले. यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण ! यापैकी शंकरराव चव्हाण आणि अशोक चव्हाण हे पितापुत्र होत. शंकरराव चव्हाण यांच्याबद्दल सांगायचे झाले तर महाराष्ट्राची विधानसभा आणि विधानपरिषद तसेच देशाची लोकसभा आणि राज्यसभा या चारही सभागृहात त्यांना काम करण्याची संधी मिळाली. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासोबतच त्यांनी देशाचे गृहमंत्री, संरक्षणमंत्री, परराष्ट्रमंत्री, अर्थमंत्री अशी महत्वाची मंत्रिपदेही सांभाळली.
“पाणी आडवा पाणी जिरवा” ही घोषणा शंकरराव चव्हाणांची. जायकवाडी, उजनी, अप्पर वर्धा, काळ, काळीसरार, अरुणावती, विष्णुपुरी ही धरणे शंकरराव चव्हाण राज्याचे पाटबंधारे मंत्री असताना झाली. शेतीला आठमाही पाणी द्यायचे की बारमाही, या वादामध्ये त्यांनी शेतकऱ्यांची बाजू घेतली.
त्यांना राज्याच्या जलसंस्कृतीचे जनक मानले जाते. पैठणला असणारा जायकवाडी प्रकल्प करू नये म्हणून त्यांना खूप विरोध झाला. अगदी त्यांच्या खुनाचाही प्रयत्न झाला. पण शंकरराव गोदावरीवर नाथसागर साकारुन मराठवाड्याची तहान भागवण्याचे महान कार्य केल्याशिवाय थांबले नाहीत.
आज आपण ज्याला मंत्रालय म्हणून ओळखतो, त्याला पूर्वी सचिवालय म्हणलं जायचं. त्याचे मंत्रालय असे नामकरण करणारे शंकरराव चव्हाणच होत. एवढेच नाही, तर मंत्रालयाच्या प्रत्येक मजल्यावर चहागाडी ही देखील त्यांचीच संकल्पना होती.
पुण्यामध्ये जी “मराठवाडा मित्रमंडळ” संस्था आहे, तिचे संस्थापक शंकररावच आहेत. या संस्थेचे मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज, विधी कॉलेज आहे. त्या संस्थेचे वसतिगृह आणि कॉलेज इमारत उभी करण्यात शंकररावांचे मोठे योगदान आहे.
शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असताना १९७५ साली शेतकऱ्यांनी बँका, सावकार आणि अन्य ठिकाणी ठेवलेल्या भांडी, दागिने अशा वस्तू सोडवून आणून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम त्यांनी केले. त्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे ५० कोटी रुपयांचा निधी उभा केला. महाराष्ट्रामध्ये ही घटना कर्जमाफीसारखीच गणली जाते.