शेतकऱ्यांच्या मुलीही आजकाल शिक्षणात कुठेच मागे नसतात. ग्रामीण भागातही आज शिक्षणाचा चांगला प्रसार होत आहे. लोकांमध्ये शिक्षण देण्याविषयी जागृती होत असून शेतकरी आता मुलांसोबत मुलींनाही शिक्षण देत आहेत. शेतकऱ्यांचा मुलींनी आजपर्यंत अनेक मोठ्या पदावर मजल मारली आहे. पण देशात कदाचित असे पहिल्यांदाच घडले असेल कि एकाच शेतकऱ्याच्या ५ मुली या क्लास वन अधिकारी बनल्या. हि प्रेरणादायी घटना घडली आहे राजस्थान मध्ये.
राजस्थान प्रशासकीय सेवा(RAS) परीक्षा मध्ये यश मिळवून या ५ मुली आज विविध पदावर पोहचल्या आहेत. कदाचित राजस्थानमधीलच नाही तर देशातील हे पहिलेच कुटुंब असेल जिथे ५ मुली क्लास वन अधिकारी पदावर पोहचल्या. हे शेतकऱ्याचे कुटुंब आहे हनुमानगढ जिल्ह्यातील रावतसर तालुक्यातील भैरूंसरी गावचे. जिल्ह्यापासून ५० किमी अंतरावर असलेल्या भैरूंसरी गावातील शेतकरी सहदेव सहारन यांच्या मुलींनी हे अविश्वसनीय काम केलं आहे. ३ बहिणींनी राजस्थान प्रशासकीय सेवा परीक्षा २०१८ मध्ये सोबतच यश मिळवलं. दोघीनी सुरुवातीला जे यश मिळवलं होतं त्याच मार्गावर या बहिणींनी आपली वाटचाल केली.
RAS २०१८ पास झाल्यानंतर या ३ संख्या बहिणी आता जयपूरवरून गावाकडे येणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी गावात खूप मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आली आहे असे त्यांचे चुलत भाऊ मोहनलाल यांनी सांगितले. सहदेव यांच्या ३ मुली रितू अंशू आणि सुमन यांनी २०१८ च्या राज्य सेवा परीक्षेत सोबतच यश मिळवलं. तिन्ही बहिणींचा हा दुसरा प्रयत्न होता. तिघी देखील सध्या अविवाहित आहेत. विशेष म्हणजे सहदेव हे अशिक्षित असून त्यांच्या गावात पाचवीपर्यंत शाळा असल्याने त्यांनी मुलीला पाचवीनंतर शाळेत दूर असल्यामुळे पाठवलं नाही. पण मुलींनी घरीच बाहेर अभ्यास करून आपले पीचडी पर्यंत शिक्षण घेतलं.
सहदेव सहारन हे शेतकरी असून त्यांची पत्नी लक्ष्मी देवी या गृहिणी आहेत. शेतकऱ्याच्या या मुलींमुळे या कुटुंबाला आता क्लास वन अधिकाऱ्यांचे कुटुंब म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. या बहिणींचा भाऊ अभिराजने देखील आयआयटीचे शिक्षण पूर्ण केले आहे. तो सध्या यूपीएससीची तयारी करत आहे. या घरात लवकरच त्याच्या रूपाने अजून एक मोठं पद नक्कीच येणार आहे.
या पाच बहिणींमध्ये रितू सहारन हि सर्वात छोटी आहे. रितुने राज्य सेवा परीक्षा २०१८ मध्ये ९४५ वि रँक मिळवली. तर सुमन सहारनने या परीक्षेत ९१५ वि रॅन्क मिळवली. ओबीसी प्रवर्गातून तीला ९८ वि रँक मिळाली. तर अंशू सहारन हि ३४९ वि रँक मिळवत ओबीसीमध्ये राज्यात ३१ वि आली आहे. या तिघींनी आपल्या बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवून हे यश मिळवल आहे.
कारण या ५ बहिणीमध्ये सर्वात मोठी असलेली रोमा २०१० मध्येच राज्य सेवा परीक्षेत पास झालेली आहे. ती या कुटुंबातील पहिली क्लास वन अधिकारी बनली होती. तर दुसरी बहीण मंजू हिने २०१७ मध्ये राज्य सेवा परीक्षेत यश मिळवलं. या ५ बहिणींचे हे यश खरंच सर्वांसाठी खूप प्रेरणादायी आहे. सर्वच शेतकऱ्यांनी या कुटुंबाकडून नक्कीच प्रेरणा घेऊन आपल्या मुलींना शिक्षण देण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा.