आजच्या स्वार्थी असणाऱ्या युगात मानवता जणू मरणच पावली आहे. लोक इतके स्वार्थी आणि मतलबी झालेले आहेत की जर एखाद्याचा अपघात झाला किंवा सामान भरलेली गाडी पलटी झाली तर ८०% अनुभवांमध्ये असं समोर आलं आहे की प्रत्यक्षदर्शी तिथं थांबत नाहीत. काही थांबतात तर चोरी करण्यासाठी थांबतात जसं की सोन, मोबाईल चोरणे आणि काही थांबतात आणि योग्य ती मदत करतात.
मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून अजूनही माणुसकी जिंवत आहे असे दर्शवणारे अनेक किस्से समोर येत असतात. ज्यामुळे आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून काहीतरी चांगले बघायला मिळते. डोळ्यांनाही समाधान मिळते की आज तुम्ही काय पाहिले, काय वाचले. ते पाहून किंवा वाचल्यावर मन प्रसन्न होते.
मध्य प्रदेशातील विदिशा येथून असेच एक चित्र डोळ्यासमोर आले आहे. जिथे जिल्हाधिकारी साहेब स्वतः एका सामान्य शेतकऱ्यापुढे नतमस्तक झाले. हे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. सोशल मीडियावर हा फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांबद्दल लोक कौतूकास्पद गोष्टी सांगत आहेत.
झाले असे की शेतकरी गंगाराम यांचे मोठे नुकसान झाले होते . त्यांचे घर कोसळले होते आणि अन्न, पेय, कपडे इत्यादी सर्व काही उध्वस्त झाले होते. जिल्हाधिकारी डॉ.पंकज जैन स्वतः शेतकऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पोहोचले होते. या दरम्यान, भावनिक होऊन शेतकरी गंगाराम यादव यांनी आपल्या समस्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगितल्या आणि त्यांना मदतीची विनंती केली.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी कामाबाबत सकारत्मकता दाखवत घर, अन्न व धान्य इत्यादींची व्यवस्था करण्याचे आदेश दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी असा आदेश दिल्यानंतर गंगाराम यांना विश्वासच बसत नव्हता. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या पाया पडण्याचा प्रयत्न केला.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी गंगाराम यांना अडवले आणि स्वतः त्यांना वाकून नमस्कार केला. की शेतकरी जगाचा पोशिंदा आहे. आज तुमच्यावर संकट आले आहे आणि मी अधिकारी या नात्याने तुम्हाला मदत करत आहे. तुम्ही मला धन्यवाद म्हणण्याची कोणतीही गरज नाही. हे माझे कर्तव्य आहे असे म्हणत सर्वतोपरी मदत मिळेल असे आश्वासन जिल्हाधिकारी डॉ. पंकज जैन यांनी शेतकऱ्याला दिले.